महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,282

पाणचक्की

By Discover Maharashtra Views: 3775 6 Min Read

पाणचक्की…

महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराजवळ पाणचक्की हे पाण्याच्या प्रवाहातील उर्जा वापरुन चालणारे यंत्र आहे. पूर्वी या यंत्रावर पीठ दळण्यात येई त्यामुळे याला पाणचक्की हे नामाभिधान प्राप्त झाले. हे यंत्र आता फारसे उपयोगात नाही बाबा-शाह-मुसाफिर हे एक सुफी संत ह्या पाणचक्कीवर पीठ तयार करून एक अन्नछत्र चालवत अशी ही एक कहाणी आहे. ह्या पाणचक्कीच्या परिसरात त्यांचा एक दर्गाही आहे. आपल्या देशात आलेल्या आक्रमक, साम्राज्य विस्तार करणाऱ्यांनाही पाण्याची दैनंदिन गरज भागवण्यासाठी पाणचक्कीच्या निर्मितीतून जल अभियंत्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याचा प्रयोग मराठवाडा भूमीत औरंगाबाद येथे चारशे वर्षापुर्वी झाला. जलप्रपातातून निर्माण होणाऱ्या पाण्याच्या दाबाचा योग्य वापर करून त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या आधारावरती दगडी जाते फिरते ठेवणे आणि त्यावर दळण दळून सैन्याची रसद भागवणे ही कल्पना चारशे वर्षांपूर्वी अमलात आणण्याचा प्रयोग औरंगाबादमध्ये झाला. चार शतकांपूर्वीचे हे जल अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि त्यासाठी उभारलेली वास्तू बघितत्यावर त्यावेळच्या अभियंत्यांच्या कल्पकतेची जाणीव होते. खाम नदीच्या काठावर असलेल्या पाणचक्की या ठिकाणी पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा हे दोन्हीही उद्देश साधले आहेत.

१६१० मध्ये या जुन्या खडकी गावाच्या जागी त्याच नावाच्या एका शहराची स्थापना झाली. त्या वेळचा अहमदनगरचा राजा मूर्तुझा निजामशहा याचा वजीर मलिक अंबर नावाचा एक हबशी सरदार होता त्याने हे शहर स्थापन केलं. हा मलिक अंबर जसा गनिमी युद्धात पारंगत होता तसाच तो नागरी सुविधाशास्त्रात आणि स्थापत्यशास्त्रातही निपुण होता. त्याने खडकी शहराचा चांगला विकास घडवला. प्रशासनाच्या दृष्टीने सोयीच्या अशा अनेक वास्तू त्याच्या काळात बांधल्या गेल्या. कैक उद्यानं , स्मारकं, हमामखाने, मनोरे, महाल आणि मशिदी इथे उभ्या राहिल्या. या पुरातन शहराभोवती असणाऱ्या तटबंदीचे भव्य असे बावन्न दरवाजे इथल्या जुन्या अफगाणी वास्तुकलेचं वैभव सिद्ध करतात. भाजलेल्या मातीच्या नळकांड्यांचं जाळं शहरभर पसरवून डोंगरमाथ्यावरच्या टाक्यांत साठवलेलं पाणी गुरुत्वाकर्षणाने शहरात खेळवण्याची एक अभिनव योजना मलिक अंबरने त्या काळात यशस्वी रीतीने राबवली. नहर-ए-अंबरी असं त्या योजनेचं नाव होतं. तिचे जिवंत अवशेष आजही शहरात आढळतात. निजामाचा एक नवाब इवाजखान बहादूर याच्या नावाने बांधलेली बारादरी नहर किंवा तुर्कताजखान याने बांधलेली आणि पाण्याच्या प्रवाहावर चालणारी पाणचक्की या जलयंत्रणा आजही चालू अवस्थेत आढळतात.

जेथे पाणचक्की आहे त्याच्या प्रांगणात सुफी संत बाबा शहा मुसाफिर हे अवतारी पुरुष राहात असत. तेव्हा या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यांचे शिष्य बाबा शहा महदूम यांनी पाणचक्कीचे बांधकाम पूर्णत्वास नेले. याव्यतिरिक्त दर्गा,, खामनदीवरील वेस व वाहतुकीसाठी पूल ही बांधकामेदेखील त्यांच्याच कल्पकतेने पूर्ण झाली. कोणत्याही अभियांत्रिकी, तंत्रज्ञानाची जोड नसताना मनुष्यबळाच्या साह्याने खामनदीच्या उगमस्थानी प्रथम पाणी अडविण्यासाठी तलाव बांधण्यात आला. त्यासाठी जी भिंत उभारली आहे त्यासाठी विटा आणि चुन्याचा वापर केला गेला. या तलावात साठवलेले पाणी सुमारे चार मैल अंतरावरील ऐतिहासिक मकबरा वास्तूपर्यंत आणण्यासाठी नहर म्हणजेच कालवा खोदून ते पाणचक्कीपर्यंत आणले गेले. या पाणीपुरवठा योजनेसाठी त्या काळी चार लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. औरंगाबादच्या उत्तरेकडे ५ कि.मी. अंतरावर भरपूर पाणी साठय़ाचे जटवडय़ाचे पहाड आहेत. येथील पाणीसाठा एकत्रित करून कालव्यांनी बीबीच्या मकबऱ्यापर्यंत आणण्यात यशस्वी झाल्यावर त्या पाणी प्रवाहाला बंदिस्त करून भूमिगत मातीच्या नळांनी हे पाणी पाणचक्की प्रांगणात आणले गेले. हा जलप्रवाह नळाच्या साह्याने उंच भिंतीवर चढवून एका मोठय़ा हौदात सोडला गेला. पाणचक्कीच्या पातळीपेक्षा पाण्याच्या उगमस्थानाची पातळी उंचावर असल्याने कोसळणाऱ्या पाण्याच्या दाबाने निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर करण्यात अभियंते यशस्वी झालेत. सायफन पद्धतीचा वापर करून जे पाणी भिंतीवर नेण्यात आले तेथून ते ज्या हौदामध्ये पडते तो हौद सुमारे १६२ फूट लांब, ३१ फूट रुंद व चार फूट खोल आहे. तसेच त्यामध्ये १ लाख २८ हजार गॅलन पाणी साठवण्याची त्याची क्षमता आहे. या हौदाच्या नजीकच पुरातन मशीद असून त्याचे बांधकाम म्हणजे बंगाली-ईस्लामी वास्तुशास्त्राचा अनोखा मिलाफ आहे.

जो जलप्रवाह कोसळतो तेथून उतरंडीच्या भिंतीत नळ बसवून हे पाणी एका छोटेखानी खोलीत आणले गेले आहे. याच ठिकाणी भव्य लोखंडी पात्याचे चक्र भक्कम लोखंडी दांडय़ावर बसवले आहे. भिंतीवरून कोसळणाऱ्या पाण्याचा दाब लोखंडी पात्यावर पडल्याने त्या लोखंडी पंख्याला गती प्राप्त होऊन लोखंडी दांडा फिरता राहतो. त्या दांडय़ाच्या मध्यभागी जे भलेमोठे दगडी जाते आहे ते या दांडय़ाच्या गतीच्या आधारे सतत फिरते राहिल्याने धान्य दळण्याचे काम विनासायास पार पाडले जाते. थोडक्यात, पाणी प्रवाहातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर करून दळणाच्या दगडी जात्याला गती प्राप्त होते. इथे तयार केलेल्या भिंतीवरून पाणी कोसळणाऱ्या कृत्रीम धबधब्यामुळे इथले चक्कीतील वातावरण थंड असते. औरंगाबादच्या गरमागरम हवामानात हा पाण्याचा नैसर्गिक थंडावा आपल्याला थंडगार करतो. पाणचक्की हे ठिकाण फक्त जल व्यवस्थापनासाठी सर्वश्रुत होते असे नव्हे तर ते एक यात्रेकरू आणि धार्मिक अध्यापन करणाऱ्यांचे सांस्कृतिक शैक्षणिक केंद्रही होते. मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळी पाणचक्कीला जोडून निवास व्यवस्थेसाठी बांधकाम करण्यात आले. या बांधकामाला खानका असे म्हणतात. या निवासात अध्ययन पठण करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास-भोजनाची सोय होती. येथे अरबी, फारसी ग्रंथसंपदेचे ग्रंथालय आशियातील सर्वात मोठे ग्रंथालय होते. पाणचक्कीच्या परिसरात बाबा शहामुसाफीर व त्यांचे शिष्य बाबा महदूम यांच्या कबरी आणि दर्गावास्तू असून त्यांच्या बांधकामासाठी काळय़ा पाषाणाचा वापर केला असून त्याला विटांसारखा लाल रंग दिला आहे.

औरंगजेबाने तर या शहरात दीर्घकाळ वास्तव्य केलं. त्यानेच या शहराचं नाव बदलून ‘औरंगाबाद असं ठेवलं. पुढच्या एका टप्प्यावर, १७२० मध्ये औरंगजेबाचा एक सरदार निजाम-उल- मुल्क आसफजहॉं हा दक्षिणेत स्वत:ची गादी स्थापन करण्याच्या हेतूने औरंगाबादेत आला. त्याच्यानंतर गादीवर आलेला त्याचा मुलगा निजाम अली खान आसफजहॉं (दुसरा) याने १७६३ साली स्वत:ची राजधानी औरंगाबादेहून हैदराबाद इथे हलवली. या हैदराबादच्या निजाम घराण्याची सत्ता औरंगाबाद शहरावर आणि मराठवाडा विभागावर १९४८ सालापर्यंत होती. सध्या या पाणचक्की आणि त्याचे व्यवस्थापन तथा नियंत्रण महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे आहे. ही पुरातन जलव्यवस्थापन पद्धती आणि वास्तुकला बघण्यासाठी देशविदेशी पर्यटक वर्षभर या ठिकाणी येत असतात.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment