महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,84,898

किल्ला म्हणजे काय..?

By Discover Maharashtra Views: 2790 2 Min Read

किल्ला म्हणजे काय..?

किल्ला म्हणजे काय ? (what is fort ?) त्याचे प्रकार किती ? महाराष्ट्रासह देशात असे किती किल्ले आहेत ? कुठे आहेत ? तिथे पोचायचे कसे ? ते किल्ले पहायचे कसे ? त्यांचे ऐतिहासिक महत्त्व काय ? त्यांची आजची परिस्थिती कशी आहे ? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम किल्ला म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वत आहेत. आणि याच परिसरात आपल्याला सर्वाधिक किल्ले पहायला मिळतात. डोंगर, कडे कपारीमध्ये किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश काय असावा, असा प्रश्न देखील आपल्या समोर येतो. परंतु जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येईल, वेळ प्रसंगी शत्रूवर हल्ला करता येईल आणि नैसर्गिक किंवा बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण ही होईल, अशा ठिकाणीच किल्ले बांधलेले दिसून येतात. म्हणजेच इतिहासात स्वतःचे साम्राज्य शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वेळ प्रसंगी राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या अशा ठिकाणांना किल्ला असे म्हणतात.

किल्ल्याचे प्रकार

किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलेल्या स्थानावरून त्याचे प्रकार पडतात. आपल्याला किल्ल्याचे मुख्य तीन प्रकार माहित असतात.

गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ला, जलदुर्ग म्हणजेच समुद्रात बेटांवर बांधण्यात आलेला किल्ला आणि भुईदुर्ग म्हणजेच सपाट भू भागावर बांधण्यात आलेला किल्ला. परंतु या व्यतिरिक्त देखील किल्ल्यांचे काही प्रकार आहेत.

वनदुर्ग म्हणजे अरण्यात असलेला किल्ला, गव्हरं म्हणजेच एखाद्या गुहेचा उपयोग करून त्याचा वापर किल्ल्यासारखा होत असेल तर, कर्दमं म्हणजे चिखलात किंवा दलदलीच्या प्रदेशात बांधण्यात आलेला किल्ला, तसेच केवळ कोट किंवा गढी स्वरूपातील इमारती किल्ल्याप्रमाणेच मानल्या जातात.

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास

महाराष्ट्र हा असा प्रदेश आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशातील परकीयांनी राज्य केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बांधण्यात आलेल्या किल्ल्यांवर या परकीयांच्या बांधकाम कौशल्याची छाप दिसून येते. महाराष्ट्रात बांधण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये आफ्रिकन लोकांपासून ते युरोपीय लोकांपर्यंत सर्वांच्या कौशल्याचा सहभाग आहे. दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहन राजवंशापासून ते राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, कदंब, बहमनी, मोगल, दक्षिणी पातशाह्या, मराठेशाही, पेशवाई, हबशी, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज अशा वेगवेगळया काळातल्या सत्ताधीशांनी हे किल्ले बांधलेले आहेत.

– नागेश कुलकर्णी

Leave a comment