महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,55,246

वीरगळ म्हणजे काय ?

By Discover Maharashtra Views: 2523 2 Min Read
Pc - Atul Chavan

वीरगळ म्हणजे काय ?

रणांगणावर वीरमरण येणे हे भारतीय लोकजीवनात गौरवास्पद आणि पुण्यप्रद मानले गेले आहे. असे वीरमरण प्राप्त झालेल्या वीराचे उचित स्मारक वीरगळाच्या रूपाने गावोगावी उभारलेले आपल्याला पाहायला मिळते. वीरगळ म्हणजे काय, आणि ते कसे असतात हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.

मुळात हा शब्द कानडी भाषेतून आला आहे. कानडी भाषेमध्ये कल्लू म्हणजे दगड. वीराचा दगड तो वीरकल्लू, त्यावरून वीरगळ हा शब्द मराठीत प्रचलित झाला. स्थानिक लोक तर वीर गळून पडला म्हणून त्याचे स्मारक ते वीरगळ, असा अगदी सुटसुटीत अर्थ सांगतात.

एका पाषाणाच्या शिळेवर काही विशिष्ट शिल्पांकन करून तो पाषाणस्तंभ उभा करणे आणि त्या वीराचे स्मरण करणे; तो पाषाणस्तंभ म्हणजेच वीरगळ. आपल्या लाडक्या योद्धय़ाचे स्मारक असलेले हे वीरगळ महाराष्ट्रात गावोगावी पाहायला मिळतात. पण जनमानसात त्याची माहिती फारच कमी असते.

हे वीरगळ तयार करायची एक खास पद्धत आहे. आकाराने सामान्यत: अडीच ते तीन फूट उंचीच्या शिळेवर एकावर एक असे तीन किंवा चार चौकोन खोदून त्यात या वीराच्या कथेचे अंकन केलेले असते.

सर्वात खाली तो वीर मृत्युमुखी पडलेला दाखवतात. त्याच्या वरच्या थरात त्याचे युद्ध चाललेले दाखवले जाते. त्याच्या वर तो मृत झाला असून त्याला अप्सरा स्वर्गात घेऊन जात असल्याचे कल्पिले आहे. तर सर्वात वरच्या चौकोनात तो शिवमय झाला असे दाखवण्यासाठी तो शिवपिंडीची पूजा करताना दाखवण्याची प्रथा आहे.

युद्धात मरण आले तर तुम्हाला हमखास स्वर्गप्राप्ती होते हे जनमानसावर बिंबवणे हा देखील त्यामागील दृष्टिकोन असावा. यात अजून वर त्या पाषाणाच्या दोन बाजूंना चंद्र-सूर्य दाखवलेले असतात.

याचा अर्थ असा की जोपर्यंत आकाशात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत त्या वीराचे स्मरण आम्हाला होत राहील असे सूचित करायचे असते.

मृत्युमुखी पडलेल्या वीराची पत्नी जर त्याच्यासोबत सती गेली असेल तर त्या वीरगळावर स्त्रीचा हातदेखील कोरलेला असतो. त्या हातात बांगडय़ा दाखवलेल्या असतात. काही ठिकाणी नुसताच स्त्रीचा हात कोरलेले दगड दिसतात. यांना सतीशिळा असे म्हटले जाते.

मऱ्हाष्ट धर्म

Leave a Comment