छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्ही काय शिकावं ?
छत्रपती शिवाजी महाराज. एक आभाळाएवढं व्यक्तिमत्व, त्यांची महती सांगण्यासाठी हे जीवन जरी खर्च झालं तरी त्यात धन्यताच आहे. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे खूप कंगोरे अज्ञात जरी असले तरी त्यांच्या इतिहासातून काही गोष्टींचा विचार करून त्यांच्या चरित्रातून शिकण्यासारखे खूप काही आहे.
१.संघटन कौशल्य, माणसं कशी पारखायची, कशी निवडायची –
महाराजांसाठी लढणारी, प्रसंगी राजांसाठी हसतमुखाने जीवही देणारी माणसं या राजाने कमावली. काय वर्णन करावं आणि कुणाचं वर्णन करावं शब्दही अपुरे पडतील, त्यांची गाथा सांगण्यासाठी. आजच्या युगात अशी माणसं होणे नाही.
२. सावधपणा –
हा त्यांच्या अनेक पत्रांमधून दिसून येतो की एक राजा किती सावध असावा. यावरून आपणसुद्धा किती सावध असावे हे शिकायला मिळतं.
३. पराक्रम –
महाराजांची जवळपास पन्नासेक पत्र आतापर्यंत सापडली आहेत. त्यापैकी इनाम आणि व्यंकोजीराजे यांना लिहलेली कौटुंबिक, राजकीय हेतूंची पत्रे उल्लेखनीय आहेत.
व्यंकोजीराजेंना वैरागी व्हावंसं वाटत असता म्हणजेच ते एकदम उदास असायचे तेव्हा महाराजांनी त्यांना लिहलेलं एक पत्र उपलब्ध आहे, खरंतर ते सर्वांसाठीच प्रेरणादायी असं आहे. या पत्रात महाराज व्यंकोजीराजेंना उपदेश करतात की हे कसलं वैरागीपणाचं खूळ घेऊन बसले आहात, उतारवयात आपल्याला ते करायचंच आहे, हे ऐन तारुण्याचे दिवस, आता आम्हाला पराक्रमाचे तमासे करून दाखवा. मलाही जेव्हा जेव्हा उदास वाटतं तेव्हा पत्रातील या ओळी आभाळाएवढ्या प्रेरणा देऊन जातात.
४. शून्यातून सुरुवात –
सुरुवातीला काहीच नसताना साल्हेर पासून तर जिंजी पर्यंतचे स्वराज्य महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन उभारले. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे भाऊ म्हणतात त्याप्रमाणे महाराज समजून घ्यायचे असतील तर आधी आपल्याला त्यांचे शत्रू किती प्रबळ होते याचा अभ्यास करावा लागतो. त्याकाळची परिस्थिती कशी होती याचा सारासार विवेकबुद्धीने विचार करून महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाजा लावू शकतो.
उत्तरेत मुघल, खाली विजापूरकर आदिलशाही, पश्चिमी भागात सिद्दी, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि या साऱ्यांच्या मधोमध सह्याद्रीतल्या पर्वतरांगांमधून, बारा मावळातून हे राज्य उभा राहिलंय, याच मातीत रयतेचे राज्य उभा राहिलं, स्वराज्याचं सिंहासन मोठ्या थाटात रायगडावर प्रस्थापित झालं.
५. मोठी स्वप्न पाहून ती सत्यात उतरवण्याची हिंमत –
वरच सांगितल्याप्रमाणे महाराजांनी शून्यातून सुरुवात केली होती, ज्या काळात स्वतंत्र राज्य हा विचार कोणी स्वप्नांतही करू शकत नव्हते तेच महाराजांनी सत्यात उतरवून दाखवलं. नुसतं उभंच नाही केलं तर वाढवलं, संवर्धन केलं, याचाच प्रत्यय महाराजांच्या नंतरही आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर औरंगजेब त्याच्या मोठ्या फौजेनिशी स्वराज्यातील एकेक गडाला सर्पसारखा वेढा घालून गड घेत होता तेव्हा स्वराज्यात बोटावर मोजता येतील एवढेच किल्ले राहिले होते.
तेव्हा मूठभर मावळ्यांसह औरंग्याच्या लाखभर फौजेला तोंड देण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांनी संताजी धनाजी यांच्या साथीने स्वराज्य टिकवून ठेवले. पुढे तर पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराजांच्या काळात या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले. बारा मावळची पाखरं हाकलणारे मावळे आता सगळा देश हाकत होते. पण या वटवृक्षाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांपासून झाली होती. ती ही जिद्द आपण महाराजांकडून शिकतो.
६. राष्ट्रनिष्ठा –
अजून एक गोष्ट आपण महाराजांकडून शिकू शकतो ती म्हणजे प्रखर राष्ट्रनिष्ठा.
छत्रपती शिवाजी महाराज देव, देश आणि धर्मासाठी लढले होते हे सर्वश्रुतच आहे. महाराजांची जी पत्रे उपलब्ध आहेत त्यापैकी एक म्हणजे त्यांनी एप्रिल १६६३ मध्ये औरंगजेबाला लिहलेल्या पत्रात म्हणतात,
‘ माझ्या देशाचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे, या देशावर आक्रमण करणारा मग तो कुणीही त्याची इच्छा मी पूर्ण होऊ देणार नाही ‘
ही जी प्रखर राष्ट्रनिष्ठा आहे ती आपण महाराजांकडून शिकायला पाहिजे, तरच या देशात सर्वजण जातीभेद विसरून राष्ट्रभक्त म्हणून एकजूट होतील.
अजून सांगण्यासारखं खूप काही आहे पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर शब्दांनाही मर्यादा येतात. असो, बाकीचं नंतर कधीतरी.