ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेलं इंग्रजांच पांढरे निशाण –
इ.स. १७७३ ते १७७९ शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात नारायणराव पेशव्यांचा झालेला अमानुष खून… लबाडीनं पेशवाईची वस्त्रं धारण करून राघोबांनी पुन्हा सुरू केलेली राघोभरारी… गंगाबाईंच्या पोटात वाढत असलेला नारायणरावांचा अंकुर चिरडण्यासाठी आसमंतात घोंघावणारी कारस्थानं… नाना फडणीस आणि बारभाईंनी तो अंकुर वाचवण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा… रामशास्त्री प्रभुण्यांनी राघोबांस दोषी ठरवल्यावर त्यांच्यामागे लागलेलं शुक्लकाष्ठ… निजाम, हैदर आणि इंग्रजांच्या कारवाया…. सदाशिवरावभाऊंच्या तोतयानं सुरु केलेला उत्पात आणि त्याचा निःपात… संधिसाधू इंग्रजांनी राघोबांशी हातमिळवणी केल्यावर मराठ्यांच्या पुण्यभूमीवर ओढवलेलं पहिलं फिरंग्यांचं परचक्र… ते उलटवून लावण्यासाठी उभ्या हिदुस्थानभर पसरलेल्या प्रबळ मराठा सरदारांची झालेली अभूतपूर्व एकजूट… इंग्रजांनी ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेल्या पराक्रमी मराठ्यांच्या यशोगाथेत – ’वडगावच्या लढाई’त – इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान १७७९ सालीच पारतंत्र्यात जाणार होता!! इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय येतो ते मराठ्यांच्या असामान्य कर्तृत्वाचा आणि लढाऊ वृत्तीचा़.(पांढरे निशाण)
वडगावची लढाई मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली. याला पहिले मराठा-इंग्रज युद्ध म्हणूनसुद्धा ओळखले जाते. मराठे व इंग्रज यांच्यात एकूण तीन लढाया झाल्या. भारताच्या इतिहासात या तीनही लढाया अतिशय महत्त्वाच्या आहेत. या लढायांत मराठ्यांचे नेतृत्व तुकोजीराव होळकर व महादजी शिंदे यांनी केले. मराठ्यांनी या लढायांत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन करून इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला. परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले. माधवराव पेशवे यांच्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने १७७२ ला झालेल्या अकाली निधनानंतर त्यांचे लहान भाऊ नारायणराव यांना पेशवेपदी बसवले गेले. पण माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका रघुनाथराव ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते. आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यात बदामी महालात कैदेत ठेवले होते. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूने रघुनाथरावांची सत्तालालसा वाढली व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक गारद्यांना फितवून त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. पण रघुनाथरावाच्या पत्नी आनंदीबाई यांनी गारद्यांना पाठवलेल्या चिठ्ठीतला मजकूर “नारायण रावांस धरावे” ऐवजी ” नारायण रावांस मारावे” असा केला. मराठीतील ध चा मा करणे ही म्हण याच प्रसंगावरुन पडली. नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावा पेशवेपद मिळाले. पण बऱ्याच जणांना ते रुचले नाही. नाना फडणवीसांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विरोध केला. नारायणराव पेशव्यांच्या पत्नी गंगाबाई या नारायणरावांच्या खूनावेळी गर्भार होत्या. त्यांना पुरंदर किल्ल्यावर हलवले गेले. यथावकाश त्यांना ही मुलगाच झाला. त्याचे नामकरण सवाई माधवराव असे केले गेले. छत्रपतींनीसुद्धा त्यांनाच पेशवे पदासाठी मान्यता दिली. त्यातच रामशास्त्री न्यायमूर्तींनी रघुनाथरावांना खुनासाठी दोषी धरत देहान्त प्रायश्चिताची शिक्षा दिली. ती रघुनाथराव मान्य करणे शक्यच नव्हते. त्यांनी इंग्रजांशी संधान साधून पुणे सरकारच्या विरोधात युद्ध पुकारले.
पेशवेपदावरचा आपला हक्क सोडण्यास रघुनाथराव तयार नव्हते. मुळात नारायणरावांच्या खुनाच्या आरोपाचा ससेमिरा चुकवण्यासाठी निजामावर मोहिमेची आखणी केली. रघुनाथराव हे परमप्रतापी असल्याने (१७५० च्या दशकात त्यांनीच अटकेपार सैन्य नेत मराठ्यांचा वरचष्मा उत्तर भारतात पुन्हा स्थापन केला होता.) कोणी उघड विरोध केला नाही. पण मुळात निजामाला न दुखावता त्यांनी मोहीम अर्थहीन ठेवली. त्याचाच फायदा घेत बरेच जण साथ सोडून गेले. नाना फडणवीस, सखाराम बापू, हरीपंत खुबीने पुण्यास परत आले. पण सवाई माधवरावांच्या जन्मानंतर त्यांना पेशवे घोषित करून कारभार पाहू लागले. याकाळात रघुनाथराव जास्त सैन्य न उरल्याने सरळ पुण्यावर चालून न येता, त्यांनी शिंदे , होळकरांसोबत बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या दबावामुळे शिंदे , होळकरांनी त्यांनी सरळ नकार न देता झुलवत ठेवले. अखेर त्यांनी इंग्रजांकडून मदत मिळवण्यासाठी पुण्यातील वकील माष्टीनशी बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या पैशांच्या मागणीवरून आणि इंग्रजांच्या मुलुखाच्या आणि महसुलाच्या मागण्यांवरून करार पूर्ण होण्यात अडचणी येत होत्या. अखेर रघुनाथरावांनी गुजराथेतून आपल्या मित्रफौजेसोबत नर्मदा ओलांडून मराठ्यांवर चढाई केली. पण हरिपंत तात्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्यांचा पराभव केला. कसेबसे तुटपुंज्या सैन्यासह रघुनाथराव सुरतेच्या इंग्रजांकडे पोहोचले. अखेर धर्मबंधन झुगारून त्यांनी समुद्र प्रवास करत मुंबई गाठली. वसई व सालशेत बेटे व गुजराथेतून सुरत ,भडोचचा महसुल इंग्रजांना द्यायचे मान्य करून, बदल्यात इंग्रजांकडून आगाऊ पैसे सैन्य खर्चासाठी घेत करार झाला.
त्यावेळी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे तीन विभाग होते. मुंबई , कलकत्ता, मद्रास. यातले कलकत्ता, मद्रास भाग सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले होते. तुलनेने मुंबई विभाग उत्पन्नात मागेच होता. त्यामुळे मुंबई विभाग दडपणात आणि मराठी साम्राज्याच्या राजकारणाच्या हस्तक्षेपाच्या संधी शोधत होता. मराठी साम्राज्याच्या नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतरच्या परिस्थितीचा फायदा उचलत त्यांनी सालसेत, साष्टी पूर्वीच ताब्यात घेतले. रघुनाथरावांनी आयती संधी दिली. याचकाळात ईग्लंडमधे कंपनीच्या विभागात मध्यवर्ती निर्णय अधिकार कलकत्याच्या प्रमुखाकडे दिले. मुंबई विभागाने तरीही तांत्रिक बाबींचा फायदा उचलत रघुनाथरावांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
नाना फडणीसांनी याविरुद्ध कलकत्याच्या कंपनीला तक्रार केली. कलकत्त्याने सुरतेच्या कराराला नामंजूर करत आपला स्वतःचा वकील आप्टन पुणे दरबारी/पुरंदर वर पाठवला. नाना फडणीसांनी त्याचे खास जंगी स्वागत करून पुरंदरचा तह (१ मार्च १७७६) केला. यानुसार रघुनाथराव आणि पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेले रघुनाथराव यांना पुणे दरबारी हवाली करायचे होते. तर मुंबई विभागाने बळकावलेले काही भागही परत करायचे होते. मराठ्यांनी सालशेत अन वसई वरचा दावा बाजूला ठेवला.
पण मुंबई विभागाने साहजिकच हा करार मानायला नकार देत रघुनाथराव व पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेल्यांना हवाली केले नाही आणि प्रदेश परत देण्यासही टाळाटाळ केली. कलकत्ता कंपनीनेही प्रतिसादात टाळाटाळ केली. अखेर नाना फडणीसानी कलकत्ताला जरब म्हणून फ्रेंचाना सुरतेत जागा दिली आणि त्यांचे पुण्यात जंगी स्वागत केले. यावर कलकत्ता कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उलट, उत्तर भारतातून आपले सैन्य मदतीसाठी पाठवले. यात अयोध्येच्या नबाबाकडून मिळालेली कंदाहारी फौजही होती.
पावसाळा संपल्यानंतर इंगजांनी मुंबईहून साधारण ४००० सैनिकांची फौज घेत प्रयाण केले. रघुनाथरावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथरावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील. इंग्रजांनी पनवेल मार्गे, कर्जत-खंडाळा-पुणे असा मार्ग आखला होता.
मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले, होळकरही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथरावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्यासारख्या होत्या. कार्ले, खंडाळा या भागात इंग्रज पोहोचेपर्यंत मराठ्यांनी त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, तसतशी मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिके कापून जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून त्यातील पाणी पिण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीचे वेळीसुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्याला आल्या वर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढू दिला, हेतु हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा.
यादरम्यान उत्तर भारतातून येणाऱ्या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. नागपूरच्या भोसलेंना तशा सूचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिल्यांनाही तशाच सूचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून आवश्यक रसदी इंग्रजांना मिळाल्याच नाहीत. ३१ डिसेंबरला इंग्रज फौजेने खंडाळ्याला मुक्काम केला. ४ जानेवारीला फौजा कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली (९ जानेवारी १७७९), पण मराठयांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठेसुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली. ११ जानेवारी १९७९ला त्या आपले जड साहित्य तसेच टाकत उलट वळले, पण मराठी फौजेने माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगावचा आश्रय घेतला. १३ जानेवारीला रात्री मराठ्यांनी वडगांववर हल्ला चढवला तो १४ जानेवारीच्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला. तहानुसार इंग्रजांनी १७७३पासून जिंकलेला सर्व मुलुख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्चही द्यायचा होता.
पराक्रमी मराठ्यांनी ‘वडगाव’ येथल्या लढाईत इंग्रजांचा सपशेल पराभव केला होता त्या विषयावरील सात वर्षे अभ्यास व संशोधन करून अजेय झणकर यांनी लिहिलेली कादंबरी. “द्रोहपर्व” ही ऐतिहासिक घटनांवर आधारित कादंबरी आहे. काही काल्पनिक पात्रं निर्माण करुन पुस्तकात जिवंतपणा निर्माण केला आहे. १७७३ ते १७७९ हा काळ रेखाटला आहे. कादंबरी च लेखन फार सुंदर मांडलं आहे. नक्की वाचा.पांढरे निशाण.
लेखन व माहिती संकलन – विजयश श्रीकांत भोसले (अचिंत्य)