रायगड फितुरीने मोगलांस कोणी दिला ?
छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने शहजादा आज्जम व गाजीउद्दीन फिरोजजंग यांना स्वराज्याची राजधानी रायगड जिंकून घेण्यासाठी पाठवण्यात आले. परंतु त्यांना अपयश आल्याने औरंगजेबाने मोगली सरदार इतिकाद्खान याची नेमणूक रायगड जिंकण्यासाठी करण्यात आली. इतिकाद्खान याने स्वराज्याची राजधानी रायगडाला २५ मार्च १६८९ रोजी वेढा दिला. जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ चैत्र शुद्ध १५ शके १६९१ औरंगजेबाने जुल्फिरखानास पाठवून रायगडास वेढा घातला. ( इतिकाद्खान याने रायगड जिंकल्याने त्याला जुल्फिरखाना अशी पदवी देण्यात आली. ) चैत्र वद्य १० शुक्रवारी राजराम महाराज रायगडावरून निघाले व प्रतापगडावर गेले.(रायगड फितुरीने मोगलांस कोणी दिला ?)
मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर लिहितो जुल्फिरखान याने शहजादा आज्जम याची भेट घेतली. व त्याचाकडील काही निवडक सरदारांसह रायगडाच्या दिशेने रवाना झाला. रायगडाच्या सभोवती मोठमोठे डोंगर असल्याने सुरुंग लावणे शक्य न्हवते त्यामुळे तो सैन्यासह रायगडाच्या पायथ्यापाशी गेला. रायगडावरील असलेल्या सैन्याने तोफांचा मारा केला त्यात मोगली सैन्य मारले गेले. त्यामुळे चिडलेल्या जुल्फिरखानाने रायगडाच्या जवळ असणाऱ्या वस्तीत जाळपोळ केली. तेथूनच जवळ असलेल्या दर्ग्याजवळ छावणीत राहू लागला. मराठा सरदार हंबीरराव मोहिते याने मोगलांची रसद तोडण्यासाठी जुल्फिरखानच्या छावणीवर हल्ला केला त्यात १५०० मराठा सैन्य तर ९०० मुगल सैन्य मारले गेले. मराठ्यांना तेथून माघार घ्यावी लागली. जुल्फिरखानाने किल्यास चहोबाजूनी वेढा दिला. व किल्यात जाणारे सर्व मार्ग बंद केले. दमदमे बांधून किल्यावर तोफांचा मारा चालू केला. त्यामुळे किला मोगलांच्या हाती द्यावा यासाठी रायगडाच्या किल्लेदाराने जुल्फिरखानाशी तहाचे बोलणे केले. व मोगलांकडून अभय मिळवले.
चिटणीस बखरीनुसार “ जुल्फिरखानाचा वेढा रायगडास पडल्यानंतर किल्ला ९ महिने लढविला. त्यावेळी जुल्फिरखानाने व औरंगजेबाची मुलगी झीनततुन्निस हिने तह करून शपथक्रिया करून रायगड मोगलांस दिला.
जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ कार्तिक मासी रायगडा सला करून मार्गशीर्ष शुद्ध २ रविवार रायगड मोगलांस दिला. ३ नोहेंबर १६८९ रोजी रायगड मोगलांच्या ताब्यात दिला.
सूर्याजी पिसाळ –
छत्रपती शाहू महाराज यांनी दत्ताजी केशवजी नाईक पिसाळ यांना दिलेल्या देशमुखीच्या वतनपत्रात आपणास सूर्याजी पिसाळ यांच्याविषयीची माहिती आढळून येते.
सूर्याजी पिसाळ हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोगलांस मिळालेला होता. सूर्याजी पिसाळ बिराजर मोकदम मौजे वोझर्डे या गावातील पाटील . स्वराज्यातील गावांचा कर सरकारदरबारी देण्याचे टाळण्यासाठी तो गाव सोडून पळाला. मोगलांच्या चाकरीत जुल्फिरखानाच्या सेवेत दाखल झाला.
जुल्फिरखान रायगडास वेढा घालण्यासाठी आला त्यावेळी सूर्याजी पिसाळ देखील त्याच्यासोबत होता. रायगडचा पाडाव करण्यासाठी त्याने गडाला मोर्चे लावले. व मध्यस्थी करून जुल्फिरखानास रायगड हस्तगत करून दिला. जुल्फिरखान औरंगजेबाकडे विजयाची वार्ता सांगण्यास गेला तेव्हा त्याने औरंगजेबासमोर सूर्याजीची प्रशंसा केली.
जुल्फिरखानाने सूर्याजी पिसाळच्या कामगिरीवर खुश होऊन औरंगजेबास विनंती केली कि सूर्याजी पिसाळ याने इस्लामगड घेण्यास मदत केली. ( औरंगजेबाने रायगडचे नाव इस्लामगड केले. ) त्यामुळे त्यास वाईची देशमुखी द्यावी. ३ जानेवारी १६९० रोजी औरंगजेबाने फर्मान पाठवून सूर्याजी पिसाळ याला वाईची देशमुखी दिली.
सूर्याजी पिसाळ याने कोणतीही फितुरी केली नाही. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीतच तो मोगलांना जाऊन मिळाला होता. फितुरी म्हणजे स्व:पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षास गुप्तपणे मदत करणे. मोगली सैन्यात असल्या कारणाने त्याने रायगडावर हल्ला केला. सूर्याजी पिसाळ याला रायगडावरील लोक ओळखत होती त्यामुळे रायगडाच्या पाडावावेळी मध्यस्थीची भूमिका त्याने बजावली व वाटाघाटी घडवून आणल्या.
नरसोजी गायकवाड –
छत्रपती राजाराम महाराज यांनी ३ नोहेंबर १६९५ रोजी संभाजी नरसोजी गायकवाड यास लिहिलेल्या पत्रातील मजकुरानुसार “ संभाजी नरसोजी गायकवाड याचे वडील नरसोजी गायकवाड याने इतिकाद्खानाने ( जुल्फिरखानाने ) रायगडास वेढा दिला असता शत्रूस जावून मिळाला आणि रायगडावरील माहिती शत्रूस दिली. त्यामुळे त्याची देशमुखी जप्त करण्यात आली व सदर देशमुखी रुमाजीराव येरुणकर यांना दिली.
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- जेधे शकावली
मोगल मराठा संघर्ष
ऐतिहासिक फारसी साहित्य खंड १
सनदापत्रातील माहिती
शिवचरित्र साहित्य खंड १०