शिवरायांनी राजाभिषेक का करून घेतला?
कृष्णाजी अनंत सभासद हे त्यांच्या सभासद बखरी मध्ये सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाला १ करोड ४२ लक्ष होन एव्हढा खर्च आला. सर जदुनाथ सरकार म्हणतात हा खर्च पन्नास लक्ष तरी असावा. सहस्र ब्राह्मणभोजन, अष्टप्रधानांना एक एक लक्ष, याउपर हत्ती घोडे, वस्त्रे हि सर्व देण्यात नक्कीच अपार खर्च झाला. याशिवाय राजाभिषेकाच्या तयारीसाठी काही दिवस, ८ दिवस जो राजाभिषेक सोहळा चालला त्यातील काही दिवस महाराजांना राज्यकारभारात लक्ष्य घालायलाही वेळ नव्हता. म्हणजेच शिवरायांनी राजाभिषेकासाठी वेळ आणि पैसा अपार खर्च केला. एव्हढा पाण्यासारखा पैसा आणि वेळ खर्च करून शिवाजी महाराजांनी हिंदू धार्मिक पद्धतीने नक्की राजाभिषेक का करून घेतला असेल? पाहुयात आजच्या लेखातत.(शिवरायांनी राजाभिषेक का करून घेतला?)
शिवाजी महाराज यांचं सर्व चरित्र पाहता, एक गोष्ट नक्की लक्षात येते की राजांनी कधीच कोणतंही काम उद्देश्याशिवाय केलं नाही. प्रत्येक कर्म करण्यामागे महाराजांचा काही उद्देश आणि काही ठराविक विचार असायचा. एखादा उद्देश ठरला कि मग वेळेचं, पैशाचं, सामग्रीचं आणि माणसांचं योग्य नियोजन करून मगच आपले राजे एखादा बेत पूर्णत्वाला नेत. मग अश्या या आपल्या राजांचा भरपूर दिवस आणि अपरंपार पैसे खर्च करून राजाभिषेक करण्यात नक्कीच बरेच उद्देश असणार. हेच उद्देश जाणून घ्यायचा प्रयत्न आपण एकूण चार मुद्यांमधून करूयात. यातील शेवटचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे.
१. ‘ राजांच वेगळेपण’
महाराष्ट्रातील सर्वच मराठे हे पूर्वी स्वतःला राजे हे उपनाव लावून घेत असत. तसंच बऱ्याच आदिलशाही आणि मुघली मराठी सरदारांनाही त्यावेळचे बादशहा ‘राजे’ ही पदवी बहाल करीत असत. उदा. राजे सर्जेराव घाडगे, बाजीराजे घोरपडे वगैरे. परंतु हे सर्व सरदार फक्त नावाचे राजे असत. या सर्वांचा खरा मालक अदिलशहा किंवा औरंगजेब. अश्यावेळी जर शिवाजी महाराजांनी स्वतःला ‘राजे’ हे उपपद लावून घेतलं असतं तर तेही या आधी सांगितलेल्या नाममात्र राजांच्या पंगतीत जाऊन बसले असते. अश्यावेळी स्वतःला औपचारिकरीत्या राजाभिषेक करवून घेतल्यामुळे आणि स्वतःला राजाभिषेकाच्या वेळी ‘छत्रपती’ हे उपपद लावल्यामुळे शिवाजी महाराज या इतर चाकरमान्या आणि नाममात्र मराठा सरदारांहून वेगळे झाले आणि सागरसंगीत राजाभिषेक झाल्याने त्यांना औपचारिक ‘महाराजपण’ मिळाले.
२. मराठ्यांचं अधिकृत स्वराज्य
शिवाजी महाराज त्यांच्या राज्याला ‘स्वराज्य’, ‘महाराष्ट्र राज्य’ किंवा ‘मऱ्हाट राज्य’ असं संबोधत. यादवांचं राज्य महाराष्ट्रातून संपुष्टात आल्यानंतर, ‘मराठा’ म्हणजे अल्लाहने दोन बादशाहांना युद्ध करण्यासाठी, आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी स्वस्तात खर्च करण्यासाठी दिलेला एक तुच्छ जीव अशी धारणा सर्वच बादशाहांची असायची. मराठेसुद्धा अगदी निष्ठेने एकमेकांवर शस्त्र धरायचे. पण शिवाजी महाराजांनी याच मराठ्यांना ‘स्वराज्यासाठी’ झटायला शिकवलं. आणि हे राज्य उभं करताना आपल्या जीवचंसुद्धा बलिदान देताना पुढेमागे न पाहणाऱ्या महाराजांच्या मावळ्यांनासुद्धा हे त्यांचं स्वतःच, आपलं म्हणजे ज्या राज्यात त्यांना, त्यांच्या धर्माला आणि त्यांच्या जीवाला किंमत आहे असं त्यांचं, त्यांच्यासाठीच राज्य वाटायला लागलं. मनातून आदिलशहा आणि औरंगजेब यांनासुद्धा ‘स्वराज्याच’ सार्वभौमत्व मान्य असलं तरी हे राज्य अधिकृत न झाल्याने त्यांच्यालेखी हे राज्य म्हणजे एका दरोडेखोराच्या एका मोठ्या जहागिरीहून जास्त काही नव्हतं. औरंगजेबतर राजांचा उल्लेख भूमिया म्हणजे जमीनदार म्हणून करायचा. अश्यावेळी महाराजांनी राजाभिषेक करून ‘स्वराज्य’ म्हणजे मराठ्यांचं, अधिकृत हिंदवी राज्य असल्याची घोषणा केली. ‘स्वराज्य’ हि केवळ कागदी संकल्पना न राहता आता ते एक अधिकृत ‘मऱ्हाट राज्य’ झालं.
३. हिंदूंचं मनोबल वाढविणे
महाराजांच्या हिंदू धर्माभिमानाचं सर्वोत्कृष्ठ उदाहरण म्हणजे महाराजांनी ‘हिंदू धार्मिक’ पद्धतीने करवून घेतलेला त्यांचा समंत्रक राजाभिषेक. भारतावर आठव्या शतकापासून मुसलमानी आक्रमणं होऊ लागली. या मुसलमानी आक्रमणांना महाराष्ट्रात पोहोचायला पुढे जवळ जवळ ७०० वर्ष लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ६५ वर्ष आधी शेवटच्या मोठ्या हिंदू राज्यच ‘विजयनगरच्या’ राज्यच सार्वभौमत्व संपुष्टात आलं. आता भारतातले मोठे राजे हे बादशहा होते. राजा म्हटलं की तो मुसलमान असं समीकरणच होऊन गेलं होतं. ‘मराठ्यांनी’ सरदारकी पत्करायची, बादशहा साठी लढाया करायच्या, त्यात आपल्याच ज्ञाती बांधवांना मारायचं किंवा मारायचं पण राज्य बादशाहांनीच करायचं. मराठ्यांनी फक्त गुलामी करायची. हा इतिहास शिवाजी महाराजांनी बदलला. एक मराठा, हिंदू राजा होऊ शकतो, राज्य करू शकतो, आपल्या रयतेचं रक्षण करू शकतो आणि एक नाही दोन नाही तीन तीन पातशाह्यांना पुरून उरू शकतो हे महाराजांनी दाखवून दिलं. एव्हढंच नाही तर या सगळ्या बादशाहांच्या नाकावर टिच्चून समंत्रक हिंदू पद्धतीने राजाभिषेक सोहळा पार पडून स्वतःला सार्वभौम हिंदू राजा घोषित करू शकतो हे शिवाजी महाराजांनी आपल्या ‘राजाभिषेकातून’ दाखवून दिलं. राजांच्या आधी असे समंत्रक राजाभिषेक करवून घेतल्याचे उल्लेख इतिहासात त्यांच्यापूर्वी ३०० वर्ष तरी सापडत नाहीत. काही राजपुतांनी जर करवून घेतले असतील तर ती मंचकारोहण होती जो एका दिवसाचा विधी असे. पण शिवरायांसारखा सागरसंगीत हिंदू धार्मिक पद्धतीने राजाभिषेक विधी ना कधी झाला ना कोणत्या बादशहाने तो होऊ दिला. त्यामुळेच या राजाभिषेकाला हिंदू धर्माचं मनोबल वाढविण्याच्या दृष्टीनेसुद्धा खूप महत्व आहे.
४. बंडखोर, जमीनदार नाही तर ‘श्री राजा शिवछत्रपती’ हा सर्वात महत्वाचा मुद्दा.
शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले जिंकले, बरेच नवीन तयार केले, मोठ्या भूभागावर अधिराज्य गाजवले, सैन्य तयार केलं, नौदल उभं केलं, सगळ्या पातशाह्यांना आपला इंगा दाखवला तरी औरंगजेबासाठी शिवाजी महाराज एक साधा ‘जमीनदार’ होते तर आदिलशहासाठी एका त्यांच्याच सरदाराचा बंडखोर मुलगा होते. एव्हढंच काय तर पिढ्यानपिढ्या या बादशाहांचं मीठ खाणाऱ्या कित्येक मराठी लोकांसाठी सुद्धा शिवाजी महाराज म्हणजे ‘शूद्र’ होते. त्यांच्या मते यांचे पूर्वज तर शेती करायचे चार शेतकऱ्यांची मुलं हाताशी धरून, २-४ शहरं बेसावध असताना लुटून आणि बादशहाचे एक दोन सरदार मारून कोणी राजा होत नसतो. त्यासाठी क्षत्रिय म्हणून जन्माला यावं लागतं, आम्ही आणि आमचे पूर्वज मूर्ख आहोत का की परमेश्वर स्वरूप बादशाही सेवा आम्ही बजावतोय? हे असे गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे ग्रासलेले लोक शिवरायांचा मत्सर करीत. यामुळे एव्हढे राज्य मिळवूनही जोपर्यंत या राज्याला अधिकृत राज्य म्हणून घोषित केलं जात नाही तोपर्यंत राजे एक जमिनदार किंवा सरदाराचा बंडखोर मुलगाच राहिले असते. या साठी जेव्हा शिवाजी महाराजांनी राजाभिषेक करून घेतला त्यावेळी राजधानी म्हणून रायगड ठरवलं, भगवा ध्वज आणि जरीपटका हे अधिकृत ध्वज ठरवले, राज्यव्यवहारकोश तयार करून आपल्या राज्याची अधिकृत भाषा ठरवली, अष्टप्रधानमंडळ निर्माण करून राज्यकारभार सांभाळणाऱ्या मंडळाची अधिकृत रचना केली, ‘राजाभिषेक’ शक निर्माण करून नवीन कालगणना तयार केली, पत्रलेखनाचे आदर्श नमुने तयार केले. या सर्व रचनेमुळे ‘स्वराज्य’ हे एक अधिकृत राज्य झाले ज्यासाठी मंत्री कार्यरत होते जे राज्य दुसऱ्या राज्यांशी परराज्यधोरण टिकवू शकेल आणि हे राज्य नियंत्रणात ठेवणारे आणि रक्षणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक अधिकृत राजा झाले. या राज्यामध्ये शिवाजी महाराज आधीसुद्धा शेतकऱ्याकडून सारा म्हणजेच कर वसूल करत, शत्रूच्या सरदारांकडून चौथाई वसूल करत पण राजाभिषेकानंतर हा कर राजे आता एका अधिकृत राज्यासाठी वसूल करणार होते. हिंदू धर्माप्रमाणे राजाभिषेक झाल्यामुळे हिंदू धर्मातील चारही वर्णांना न्याय देण्याचा आणि शिक्षा देण्याचा अधिकार राजांना मिळाला.
आधी म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराज कोणतेच काम उगाच करत नसत. एका राजाभिषेकाने महाराजांनी बरेच उद्देश साध्य केले. स्वतःला प्रभू रामचंद्र, युधिष्टिर, राजा विक्रमादित्य अश्या अभिषिक्त राजांच्या पंगतीत नेऊन बसवलं. महाराजांचा राजाभिषेक हा महाराजांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या रयतेसाठी आणि महाराजांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या त्यांच्या सरदार आणि मावळ्यांसाठी एक सोहोळा होता, तर महाराजांचा मत्सर करणाऱ्यांसाठी आणि त्यांच्या शत्रूसाठी एक घोषणा आणि खुलं आव्हान होतं की एक हिंदू, एक मराठा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर एक नूतन सृष्टी निर्माण करू शकतो एक नवीन राज्य निर्माण करू शकतो. एव्हढंच नाही तर स्वतःच्या मागे इतकी जनशक्ती उभी करू शकतो की या जनशक्तीच्या जोरावर शेजारच्या राज्यांना आव्हान देत त्याचा राजाभिषेक थाटामाटात करवून घेऊन, स्वतः अधिकृत अभिषिक्त राजा झाल्याची घोषणा करू शकतो. धन्यवाद.
सुयोग शेंबेकर
युट्युब व्हिडिओ लिंक: