महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,15,856

संभाजीराजांबद्दलच आजपर्यंतच लेखन- शोकांतिका अन जाणिव

Views: 3848
6 Min Read

संभाजीराजांबद्दलच आजपर्यंतच लेखन- शोकांतिका अन जाणिव

स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे स्वराज्याच्या इतिहासातील एक महापराक्रमी पण तितकेच दुर्दैवी व्यक्तिमत्त्व.

आपण जर स्वराज्याचा इतिहास नीट अभ्यासाला तर आपल्या लक्षात येते की भोसले घराण्यात शिवछत्रपतींचा अपवाद वगळता संभाजी राजांइतका साहसी, शौर्यशाली, पराक्रमी अन स्वाभिमानी असा दुसरा कोणी छत्रपती झालाच नाही. याबद्दल संभाजीराजांबद्दल चुकीचे लिहणाऱ्यांचेही दुमत असणार नाही.

मराठ्यांचा हा छत्रपती सुसंस्कृत होता, संस्कृतपंडित होता, राजनीती, शृंगारशास्त्र तसेच धर्मशास्त्रात तो निपुण होता. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी बुधभूषण हा राजनीती कशी असावी याबद्दल असलेला ग्रंथ संस्कृतमध्ये प्रसिद्ध केला. तसेच नायिकांच्या विविध गुणांचे वर्णन करणारा नायिकाभेद हा हिंदी(ब्रज) भाषेतील ग्रंथ लिहला. त्यात त्यांनी चांगल्या गुणांचे कौतुक करण्याबद्दल लिहले आहे की ‘गुण हे पूजास्थानम, गुण लिंगे हा नचवयाहम.’ त्याचबरोबर नखशिख आणि अध्यात्माचे वर्णन करणारा सातसतक यांसारखे ग्रंथ त्यांनी केवळ वयाच्या चौदाव्या वर्षी प्रसिद्ध केले.

दुर्दैवाने अशा विद्वान, रसिक, राजनीतीतज्ञ, धर्मपंडित यासोबत रणांगणावर कमालीचे शौर्य गाजवणाऱ्या या राजाची महाराष्ट्रातील बखरकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कादंबरीकार तसेच सर्व वाचकांनी त्यांची उपेक्षा नव्हे तर सतत अवहेलना केली.

जीवनाच्या अंतिम समयी ज्या राजाने स्वाभिमानाचा परमोच्च बिंदू या हिंदुस्थानाला दाखवून दिला अशा राजाची घोर अवहेलना करताना संबंधित लोक कसे धजावले असतील याचेच खर तर आश्चर्य वाटते.

मराठी राज्याचे युवराज म्हणून तसेच दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजांची कारकीर्द ही वादळी ठरली.
संघर्ष हा कायम त्यांच्या आयुष्यात त्यांच्या सोबत होता. जन्मापासून मृत्यूपर्यंत संघर्ष हा त्यांची सोबत करत राहिला.

त्यांच्याबद्दल लिहणार्यांनी त्यांच्या हयातीत त्यांच्याबद्दल न घडलेले अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात घुसडले. जवळपास सगळ्या मराठी इतिहासकारांनी त्यांच्या विरोधातच लिहले. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांची बाजू समर्थपणे मांडणारा कोणीच पुढे आला नाही.

ज्या राजाने शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी बारा आघाड्यांवर छाती झुंज घेतली. जीवनाच्या अंतिम समयी शरीराला क्रूर यातना दिल्या जात असतानाही शंभूराजांनी आपल्या मनातून एकदाही शरणागती पत्करण्याचा विचार मनात आणला नाही. ज्याने देव, देश अन धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या शिवपुत्रास इतिहासकारांनी राज्यबुडवा व दुर्वर्तनी ठरवले इतिहास क्षेत्रात यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी ती काय असेल.

संभाजी राजांच्या मृत्यूसमयी हरामखोर औरंगजेबाने ज्याप्रकारे राजांच्या शरीराची घोर विटंबना केली, त्याचप्रकारे काही हरामखोर लेखकांनी संभाजीराजांची मरणोत्तर घोर विटंबनाच केली ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

संभाजी महाराजांवर आतापर्यंत जेवढी नाटके लिहली गेली तेवढी मराठा इतिहासातील अन्य कोणत्याही माणसावर लिहली नाहीत.

मोरेश्वर आत्माराम पाठारे, सोनाबाई केरकरीन, राम गणेश गडकरी यांच राजसंन्यास, औंधकरांची बेबंदशाही यांसारखी अनेक नाटकं संभाजी राजांवर लिहली गेली अन त्याचे महाराष्ट्रात असंख्य प्रयोग करवले गेले. त्यात औंधकरांनी बेबंदशाही मध्ये तुळसा नावाचं पात्र घुसडून संभाजीराजांना नाहक बदनाम केलं गेलं. तसेच गडकरीने त्याच्या नाटकात संभाजीराजांना मदिरेच्या नशेत बुडलेले दाखवले. त्यांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद घालून त्याच्या ज्वलंत चरित्राला एवढी वर्ष बदनाम केले.
व त्यालाच सप्रमाण इतिहास मानून आपल्या लोकांनी संभाजी राजांची तीच प्रतिमा आपल्या मनात कायमची साठवली कारण आपल्या लोकांना नाटके व कादंबरीतून इतिहास पाहायची व वाचायची सवय आहे व आपले लोक त्यालाच खरा इतिहास मानतात.

त्याचप्रमाणे अनेक चित्रपट निर्मात्यांनी संभाजीराजांवर अनेक चित्रपट काढले. ‘थोरातांची कमळा’ तसेच ‘मोहित्यांची मंजुळा’ हे चित्रपट काढून त्यात काहीही आधार नसलेल्या व्यक्तिरेखा घुसडून जणू संभाजीराजांना मराठी इतिहासातील रोमँटिक हिरो बनवून टाकण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला.

या सगळ्याची सुरुवात झाली संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे १२२ वर्षानंतर सूड अन द्वेषापोटी लिहलेल्या चिटणीस बखरीतून.
संभाजी राजांची सगळ्यात जास्त बदनामी कोणी केली असेल तर ती मल्हार रामरावने. सुमारे दीडशे वर्षांहून अधिक काळ संभाजी महाराजांची एक विशिष्ट विकृत प्रतिमा जनमानसांत रूढ करण्यात मल्हार रामरावची बखर सगळ्यात जास्त कारणीभूत आहे.

अन याच बखरीचा आधार घेऊन पुढचं लेखन केले गेले व आमचा राजा नाहक बदनाम होत राहिला.
रियासतकार देसाई असतील किंवा न्यायमूर्ती रानडे यांनी वरील बखरीवरूनच संभाजी राजांबद्दल लेखन केले.

खर तर एवढी वर्ष खूप साऱ्या इतिहासकार व नाटककारांनी संभाजीराजांबद्दल खूप सारं लिहल, पण लिहताना लेखकांच्या मनात कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला स्वतःच्या आईसमान मानणाऱ्या राजाचा पुत्र असा कसा असू शकतो, जर तो असा असेल तर मग तो इंद्रायणी-भीमेच्या काठी मरणाला एवढ्या निधड्या छातीने कसा सामोरा जाऊ शकतो हे साधा प्रश्न कसा आला नाही याचे नवलच वाटते.

जोपर्यंत बेंद्रे यांचे संशोधन झाले नाही तोपर्यंत संभाजी राजांच्या विषयाला हात घालण्याची कोणत्याही लेखकाची हिंमत नाही झाली. पण संभाजी महाराजांचे खरे चरित्र समोर येण्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो वा. सी. बेंद्रे यांचाच.
बेंद्रे यांचे शंभूचरित्र हे संभाजी राजांच्या जनमानसांत असलेल्या प्रतिमेला कलाटणी देणारा एक युगप्रवर्तक टप्पा होय.

महाराष्ट्रात जवळपास दोनशे वर्ष रूढ असलेली संभाजीराजांची ‘दुर्वर्तनी व दुराचारी’ प्रतिमा बेंद्रे यांनी आपल्या ग्रंथाच्या साह्याने नष्ट करून महाराष्ट्राला एक पराक्रमी, शूर, मुत्सद्दी, स्वाभिमानी, सुसंस्कृत अशा संभाजीराजांचे दर्शन घडवले.
१९१८ ते १९६० या काळात संभाजीराजांच्या चरित्राचे बेंद्रे यांनी केलेले संशोधन म्हणजे संशोधन क्षेत्रातील एका साधनेची गाथाच आहे. संभाजीराजांच्या चरित्राला न्याय देण्यासाठी एखाद्या योग्याने केलेली ती तपश्चर्या म्हणावी लागेल.

बेंद्रे यांनी लिहलेल्या या चरित्राचा प्रभाव नंतरच्या मराठी साहित्यिकांवर पडला अन त्यानंतर शिवाजीराव सावंत, कानेटकर तसेच विश्वास पाटील यांनी संभाजीराजांची बाजू मांडण्याचे काम केले.

त्यानंतर डॉ. कमल गोखले यांनी सुद्धा आपल्या शिवपूत्र संभाजी मधून संभाजी राजांच्या चरित्राला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला.
डॉ. सदाशिव शिवदे यांनी आपल्या ‘ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा’ नावाचे शंभूचरित्र प्रकाशित केले ते सुद्धा संभाजी राजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी वाचनीय आहे.
त्याचप्रमाणे भाऊसाहेब पवार यांचे छोटेखानी सत्यशोधक संभाजी चरित्र तसेच दत्तो वामन पोतदार यांनी सुद्धा संभाजी राजांवर संशोधनासाठी एक संस्था स्थापन करून ते राजांबद्दल लेख, माहिती व साधने प्रकाशित करत राहिले. संभाजी राजांचे चरित्र समजून घेण्यासाठी यांचादेखील खूप उपयोग होतो.

त्यामुळे जुन्या गैरसमाजांवर विश्वास न ठेवता समस्त शंभूप्रेमींनी शंभूचरित्र समजून घेण्यासाठी वरील पुस्तकांचा अभ्यास जरूर करावा.

धन्यवाद🙏😊

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

Leave a Comment