यादवकालीन पदार्थ –
लीळाचरित्रातील काही संदर्भ बघत असतांना त्यातील काही पदार्थांची वर्णने ऐकली आणि डायरीत नोंद घेतली. यातील बहुतेक पदार्थ जोंधळ्याचे आहे विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागात चक्रधरस्वामींचा वावर होता. चक्रधरस्वामींचा काळ हा साधारणपणे बाराव्या शतकातील उत्तरार्ध मानला जातो. त्याकाळात प्रचलित पदार्थांचे उल्लेख यात येतात.(यादवकालीन पदार्थ)
त्याआधी मला त्यातील काही शब्द आवडले होते ते सांगते, मुमुक्षु म्हणजे मोक्षाची कामना करणारा, कदाचित भुकेला या अर्थाने असावा, आदोहन म्हणजे आंदोलन, भाकरी करतांना किंवा कुठल्याही रस्स्यात गरम पाणी उकळते ठेवतात त्याला आधण असा ही शब्द आहे, ते हे असावे, सैपाकाशी संबंधित आहे. “अकृत्रिम आनंद संचार” हा शब्द अंगात येणे या अर्थाने आहे की, अजून काय समजले नाही.
बाणबाया हा पदार्थ काय आहे, बहुधा फळ असावे. भोपळा किंवा तस्सम वेलवर्गीय होय. पयोव्रत हे एक व्रत आहे आणि त्याव्रताला दुधाची खीर बनवतात तो पदार्थ म्हणजे पयोव्रती..
१. रितुपे या फळाचा वारंवार उल्लेख येतो, सहज उपलब्ध असणारे हे म्हणजे पेरू कि सीताफळ कोण जाणे.
२. घोळणा ही ओल्या हरभरा असतो, त्याची उसळ होय. कदाचित आजही हरबऱ्याच्या कोवळ्या तुरे निवडून ती भाजी करतात ती असावी. ती शेतकऱ्याला न विचारता खुडून घेतली म्हणून चक्रधरांनी आपल्या शिष्यांना दटावले आणि ती परत देऊन या असे सांगितले.
३. थापडा हा लाक नावाच्या धान्याचा पदार्थ बहुतेक थालीपीठासारखा थापून करत असावेत.
४. दिवसे हा पदार्थ आजही नागपंचमीच्या दिवशी करतात. सर्व धान्ये भरड दळून आणायची, ती गुळाच्या पाण्यात मळून त्याचे दिवे बनवायचे. मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे, त्यात गव्हाची, ज्वारीची कुस रचून त्यावर पांढरे कापड ठेवून ते वाफवायचे. पुर्वी चाळणी नसल्याने वाफवण्यासाठी हीच पध्दत होती, कापडाऐवजी केळीचे पान किंवा हळदीचे पान, विड्याचे पान, किंवा पोथीचे पान (अळूचे पान) जे अपायकारक नसून मोठे असायचे. ते रचून त्यावर हे दिवे वाफवायचे. गरमागरम तुप टाकून खायचे. हा बरेच दिवस टिकणारा पदार्थ असल्याने प्रवासात नेत. एखाद्या खट्याळ मुलीला “मोठी दिवशी” असे लाडाने म्हणतात. काही भागात याला दिवे मुठीये म्हणतात तर कोणी यात पीठ मळून त्यात पुरण भरून वाफवायचे.
५. आंबवडे हा पदार्थ उन्हाळ्यात करतात. हिरव्या भाज्या नसतात आणि हलकेफुलके खायची इच्छा असली की, गव्हाचा कोंडा, जाडसर रवा, हरभरा डाळ पीठ किंवा भिजवून वाटून, तिखट, मीठ, हळद एकत्र मळायचे, मुठीये करून वाफवायचे. (खानदेशात यात कांदा उभा चिरून घालतात आणि वाफवतात त्याला “भेंडके” असा शब्द आहे, फक्त यात सर्व डाळी भिजवून वाटून घालतात. बरेचदा उपलब्ध असेल तर घोळ किंवा चिवळ मिसळतात व ताकाच्या कढीबरोबर खातात. गरमागरम चुरून वर तेलाचा काटा ओतत..)
६.आळशी या धान्याचा उल्लेख येतो, ते गळीत धान्य असावे.( जवस)
आयुर्वेदिक फायदे- तुम्हाला जर लवकर वजन कमी करायचं असेल तर आळशीच्या बियांना आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आळशीचं सेवन केल्याने कफसारख्या समस्येतून खूप लवकर सुटका मिळते. तसंच आळशी अत्यंत पौष्टिक समजण्यात येते.
आळशीच्या सेवनाने किंवा त्याचे पावडर करून शरीराला लावल्याने त्वचेला विलक्षण तेज येतं. महिलांच्या देखील बऱ्याच आरोग्याच्या समस्यांचं निदान आळशीच्या काढ्याने होते. आळशी मध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असल्याने मलावरोध च्या समस्येचं देखील निवारण होतं.
शरीराच्या कोणत्याही भागावर सूज असल्यास, तुम्ही आळशीच्या बियांच्या तेलाने मालिश केल्यास, तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. सूज लवकरात लवकर कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे तुमच्या घराता आळशीचं बी नेहमी असणं आवश्यक आहे.
आळशीमध्ये भरपूर प्रथिने असतात. आळशी आयुर्वेदिक दृष्टीने त्याच अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच, परंतु यावर अमेरिकेत सुद्धा बरंच संशोधन झालं आहे. ज्यामध्ये असं आढळून आलं आहे की – आळशीच्या बी आणि तेलामध्ये अल्फा लिनोलिक ऍसिड सापडतं, जे एक प्रकारे ओमेगा ३ फॅटी अँटी ऍसिड आहे.
या ऍसिडच महत्त्व डॉक्टरांच्या भाषेत सांगायचे झाले तर गुड ड्रग आहे. त्याशिवाय लिग्नन नावाचा घटक आळशी मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अँन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते अनेक रोगांना प्रतिबंध करणारे आहे. त्याचबरोबर यामध्ये फायबर, विटामिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्निशियम, फॉस्फोरस, मँगनीज, आणि इतर महत्वाचे मिनरल्सचा देखील समावेश आहे.
हृदयरुग्णांसाठीसुद्धा जवसातील काही गुणधर्म उपयोगी पडतात. जवस कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. कर्करोग आणि अन्यही काही विकारांवर जवस उपयुक्त ठरते. जवसाची पूड चमचाभर घेऊन ती पाण्यात मिसळून सकाळी सकाळी प्राशन केली तर हे सारे गुणधर्म आपल्याला उपयुक्त ठरतात.
स्वयंपाक करताना खाद्यपदार्थांवर वरून जवसाची चमचाभर पूड पसरवली तरीही जवस आपल्या शरीरात जाऊन योग्य ती कामगिरी बजावतो. आळशीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स गुणांमुळे आळशी ही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्स गुणांनी त्वचेमध्ये कोलेजन प्रॉडक्शन आणि नव्या पेशींचं निर्माण होत असतं. यामुळे त्वचाही निरोगी राहाते.
बऱ्याचदा महिलांना हार्मोनल असंतुलनाची समस्या सतावत असते. आळशीमध्ये असणाऱ्या फायटोऍस्ट्रोजनच्या कारणामुळे महिलांसाठी हे खूपच फायदेशीर ठरतं. मेनोपॉज च्या वेळी महिलांना बेचैनी, अत्यधिक गरम होणं, अनियमित रक्तस्राव, कंबरदुखी आणि सांधेदुखी अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. हार्मोनचं संतुलन राखण्यासाठी आळशीच्या बिया फायदेशीर ठरतात. तसंच तुमची मासिक पाळी नियमित करण्यासाठीही याचा उपयोग होतो. अभ्यासातून सिद्ध झालं आहे की कॅन्सर ची जोखीम कमी करण्यासाठी आळशीचं बी अत्यंत उपयुक्त आहे. प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि पोटाचा कॅन्सर याबरोबर लढण्यासाठी आळशीचं बी महत्त्वाचं समजलं जातं.
आळशीच्या बियांमध्ये लिगननचा स्तर अधिक प्रमाणात असतो. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर पासून संरक्षण होतं. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवलं जातं. आळशीमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात. या गुणांमुळे त्वचेवर होणारी जळजळ, सूज आणि लाल रॅशेस कमी करण्यासाठी मदत मिळते. आळशी मध्ये वजन कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरतं. आळशी हे प्रोटीनचादेखील एक चांगला स्रोत आहे आणि प्रोटीनमुळे वजन कमी होण्यास मदत होते. जेवणामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यास, भूक लवकर लागत नाही. पोट भरल्यासारखं वाटतं. आळशीच्या सेवनाने शरीर निरोगी राहातं आणि वजन कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो. गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आळशी अतिशय फायदेशीर आहे. बऱ्याच घरांमध्ये गर्भवती महिलांसाठी अथवा नवजात बालकांच्या मातांसाठी आळशीचे लाडू बनवण्यात येतात.
आळशीच्या बियांमध्ये अँटिव्हायरल, अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण असतात. याचं सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीची प्रतिकारशक्ती अर्थात इम्युन सिस्टिममध्ये कमतरता असल्यास, आळशीच्या बियांचं सेवन करण्याचा त्या व्यक्तीला नक्कीच सल्ला घ्या.
आळशीच्या बियांचं सेवन केल्यास, तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येऊ शकते. आळशीच्या बियांमध्ये फायबर जासत् प्रमाणात असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं.)
आळशी किंवा जवसाला निकृष्ट दर्जाचे म्हणून मग ढोरांना खाऊ घालतात. पण भाजलेल्या शोपमध्ये टाकून डब्यात भरून ठेवा आणि येताजाता तोंडात टाका म्हणजे आपोआपच जवस पोटात जाईल किंवा काही जण पुड करुन ठेवून रोज एक चमचा ताकात घेतली तरी फायदा होतो.
विषयांतर झाले म्हणून क्षमस्व.
७. पाणीभात हा पाण्याला फोडणी देऊन बहुतेक रस्समसारखा किंवा कढीभात असा प्रकार असावा.
८ . ऐसोले हा आळशी आणि जोंधळे घालून केलेले धिरडे होय.
९. अहिता हा पदार्थ कळला नाही.
१०. अमृतफळे गोड पुरण भरून उकडून केलेला एक पदार्थ होय.
११. माहुळींग हे एक फळ आहे. (म्हाळींग हे गोल आणि सीताफळासारखे खूप बिया असलेले फळ देवतेच्या हातात असते, सृजनाचे प्रतिक म्हणून दाखवलेले असते.)
१२. कोवळे वाळुक हे एक काकडीसारखा हिरवा रंगाची वेलवर्गीय आहे, खूप छान चव असते, आजही खानदेशात मिळतात, “वाईकं” असे म्हणतात आणि थोडे परिपक्व झाले की आपोआप चीरा पडतात, त्याला “फुट” म्हणतात. रवाळ गोडसर चव असते.
याव्यतिरिक्त तळीव, सांबारी, लोणीचे आणि कुसंबिरी म्हणजे तळलेले, सांबार म्हणजे चटण्या कोशिंबिरी आणि लोणचे यांचे असे उल्लेख आहेत.
दुसरे म्हणजे मासोपवासिनीने म्हणजे महिनाभर उपवास करणारी, तिने खायच्या पदार्थांचे उल्लेख आहे.
१३. लाखाची भाकरी लाख हा बारीक वाटाणा मराठवाड्यात होतो. त्याची भाकरी होय. या शेंगांमुळे त्वचारोग होतात म्हणून बंदी केली.
१४. धिडरे म्हणजे धीरडे असावे, यात तिखट मीठ घालून ज्वारी भिजवून, वाटून हिंग, जिरे घालून करतात, तर काही फक्त मीठ घालून आणि वर तेल आणि गुळ गरम असतांनाच तव्यावर घालतात, दुधाबरोबर खातात. धिरडे ज्वारी सडवून आणि कोंडा काढून भिजवून वाटून आंबवून मग पीठ करायची.
१५. मुदा बहुतेक भाताची मूद किंवा गोळा करून केलेला असावा.
मुदा म्हणजे ओगराळ्याचा भात होय.
१६. मांडे
मनातल्या मनात मांडे खाल्ले, मनातले मांडे मनातच जिरले.. मांडे हा चक्रपुजेतला एक महत्वाचा घटक आहे,
मांड्यांच्या पाकृ बद्दल.
मांड्यांचे सारण आपण पुरणपोळीचे करतो तसेच करतात. चणाडाळ धुवुन चुलीवर शिजत ठेवतात, शिजली की मोठ्या चाळणीवर ओतुन पाणी पुर्णपणे काढतात आणि मग परत चुलीवर चढवुन तिच्यात गुळ घालुन गुळ शिजेपर्यंत आणि सारण थोडे सुकेपर्यंत ढवळत राहतात. गरम असतानाच पाट्यावर वाटायचे. मिक्सरवर वाटले तरी चालते. एकदम बारीक वाटले गेले म्हणजे झाले.
अगदी उत्तम प्रतिचा लोकवण वगैरे गहु घ्यायचा, तो स्वच्छ धुऊन उन्हात वाळवायचा आणि जात्यावर अगदी बारीक पिठ दळायचे. जर गिरणीवर दळुन आणले तरी चालते. नंतर चाळणीने चाळण्याऐवजी वस्त्रगाळ करुन घ्यायचे. पिठ वस्त्रगाळ करुन घेतले नाही तर मांडा बनवताना कडेला जाड राहतो, भाजताना कडा निट भाजल्या जात नाहीत आणि मग तेवढी गोल कड काढुन टाकावी लागते.
मग हवे तितके पिठ घेऊन थोडे तेल घालून, मीठ घालुन पाण्याने भिजवायचे. मीठ अगदी नेमके, योग्य प्रमाणात घालायला हवे, कारण कमी पडले तर मांडा करताना मोडतो. साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तसे भिजवायचे नी मग त्याला तासभर तरी तेल लावुन उलटेसुलटे फिरवत तिंबत बसायचे. तासाभराने अगदी मैद्याच्या पिठासारखा पोत आणि लवचिकपणा येतो या पिठाच्या गोळ्याला. सारणापेक्षा पिठ निट जमायला हवे, मांडा करताना मोडत असल्यास मीठ बरोबर पडले का ते चेक करतात आणि कमी असल्यास घालुन परत मळतात.
आता पिठ आणि सारण दोन्ही तयार आहेत. तिन विटा मांडुन वेगळी चुल लावली जाते. अन्यथा रोजच्याच चुलीवर खापर ठेऊन मांडे भाजायचे. हे खापर म्हणजे खास मांडे भाजण्यासाठी बनवलेलेल मातीचे भांडे! साधारण १५०-२०० रु. पर्यंत किंमत असलेले हे मडके दिसायला दोन बशा एकमेकींवर उपड्या ठेवल्या तर जशा दिसतील तसे दिसते. त्याला खालच्या बाजुने तोंड असते. तिच्यातुन धग वरपर्यंत पोचुन मांडे भाजले जातात. शहरवासिय मांडेप्रेमींसाठी गॅसवर वापरता येतील अशी लहान आकाराची खापरेही आता बाजारात मिळु लागलीत अशी माहिती आजीबाईंनी दिली.
आता मांडा बनवतात कसा ते पाहु. प्रथम आपली मोठी पोळी असते त्या आकाराच्या दोन पोळ्या करुन घेतात. मग साधारण नारळाच्या आकाराचा सारणाचा गोळा घेऊन त्याला ह्या दोन पोळ्यांच्या मधे ठेवतात. बाजु हळु बंद करुन घेतात आणि मग बाजुबाजुने हळुवारपणे लाटायचं. लाटताना पोळपाट न वापरता मोठे ताट उपडे घालुन त्यावर लाटतात म्हणजे मोठा पृष्ठभाग मिळतो लाटायला. लाटत लाटत ताट भरले की पोळी हळुच उचलुन हाताने फिरवायची. फिरवत फिरवत अलगद दोन्ही हात आडवे घेऊन कोपरांचा आधार द्यायचा आणि कोपराकोपरांनी मांड्याला फिरवायचे. हे काम जलद करावे लागते त्याचबरोबर जपुनही करावे लागते. जलद अशासाठी की सारण सरकून एकाच बाजुला यायला नको आणि हे करताना मांडा मोडु नये म्हणुन जपायचे.
असा तयार झालेला मांडा आता खापरावर टाकायचा. एवढा मोठा मांडा गोल आकाराच्या खापरावर अजिबात चुणी वगैरे न पाडता टाकणे ही सुद्धा एक मोठी कला आहे असे वाटले पाहुन.
मांडा खापरावरुन घसरुन पडु नये म्हणुन कधीकधी काहीतरी जड ठेवतात वर.
मग एका बाजुने भाजला की अलगदपणे आणि अतिशय वेगात तो उलटवायचा.
दोन्ही बाजु भाजल्या की खाली काढायचा आणि जरा थंड झाला की घडी घालायची. ही घडी आयताकृती घालतात. जर कोणी नुसती घडी बघितली की त्याला पत्ताच लागणार नाही हा पदार्थ गोल आहे ह्याचा.
आपण पुरणपोळीला वरुन तुप लावतो तसे मांड्यांना तुप वगैरे काही लावत नाहीत. चणाडाळ शिजवल्यावर जे पाणी काढतात त्याचीच आपण कटाची आमटी करतो तशी आमटी करतात. त्यात मांडा बुडवुन खातात. तसेच दुध थोडे आटवुन त्यात साखर घालुन बासुंदीसारखे करतात. चक्रपुजेला हे दोन प्रकार करतात आणि मांडा त्यात बुडवुन खातात.
आंब्याच्या मोसमात आमरस करायचा आणि सोबत मांडे! एरवी एक माणुस फक्त अर्धाच मांडा खाऊ शकतो एकावेळी.
चक्रपुजा ही घरात धनधान्य भरपुर यावे, समृद्धी यावी यासाठी केली जाते असे मला पुजेचे स्वरुप पाहुन वाटले. सांज्याच्या करंज्या करतात, त्यांना सांजोरी म्हणतात. गुळाचे पाणी घालुन गव्हाच्या गोड पु-या करतात, त्यांना सोळी म्हणतात.
पुजा मांड्ताना एका बाजुला वीटा रचुन होमाची तयारी करतात. होमापुढे तांदुळ पसरतात आणि मुठीत तांदुळ घेऊन एकात एक अशी पाच्-सात वर्तुळे काढतात. त्या वर्तुळावर घरच्या बागेतल्या आंबा, सिताफळ, लिंबु वगैरे झाडांच्या छोट्या फांद्या अंथरतात. त्यावर गोलाकारात मांडे रचतात. मधे एक आणि बाजुला गोल दहा मांडे असे अकरा मांडे रचतात. मांड्यांवर सोळी, सांजोरी लावतात. तळलेल्या कुरडया रचतात. त्यावर दहा दिवे आणि मध्ये एक मोठा दिवा (ह्याला मेंढ्या म्हणतात) असे पिठाचे दिवे ठेवतात. हे दिवेही आधी बनवुन उकडुन तयार ठेवतात.
होम पेटवल्यावर होमाच्या ज्योतीने मधला दिवा आणि बाजुचे दहा दिवे पेटवतात. मग सगळ्यांनी नमस्कार करायचा. सगळे झाले की पंगत बसते आणि मग मांड्याचा यथायोग्य समाचार घेतला जातो.
(मायबोलीवरून साभार)
१७. पुरीया कणकेत गुळ घालून किंवा हळद मीठ घालून तळायची.
१८. घारीया यात तीख म्हणजे गरम मसाला आणि गुळ घालून गुळपोळी सारखे पातळ लाटायची.आणि पराठ्यांसारखे शेकायचे. हिवाळ्यात थंडीच्या दिवसात खातात.
१९ .वडे
उडीदडाळ भिजत घालून, वाटून त्यात धणे, जिरे, बडीशोप, आलेलसून वाटायचे. पाट्यावर वाटल्यावर चांगले फेटून घ्यावे आणि कापडाच्या तुकड्यावर गोल जाड पुरीप्रमाणे तळायचे. कुरकुरीत झाल्यावर दह्याबरोबर खायचे. आषाढ महिन्यात साधारण आखाड तळतो तेव्हा केली जातात.
२०.उंबरे . उंबरे म्हणजे सपाट थापलेली वडे होय.
२१. ठोंबरा हा पदार्थ ज्वारी सडवून कोंडा काढून केलेली उसळ किंवा खिचडी होय. किंवा ठोंबरा ज्वारीच्या कण्या भरडून केलेला भात होय.
२२. ठेंडरी हा सुद्धा कळला नाही. पण ठेठरे जोंधळ्याचाच एक खाद्य पदार्थ पीठ भिजवून करतात.
२३. घाटा हा ज्वारीच्या कण्या किंवा रवा उकळून पातळसर दूध साखर घालून बाळंतीणीला किंवा आजारी माणसाला देतात.
२४. कानवला म्हणजे गुळाची आणि साखरेची सुध्दा करतात. कणिकेत गुळ घालून पोळी लाटून चौपदरी घडी घालून वाळवावी.
कानवले गुळ, रवा, सारण घालून करंजीसारखी परंतु हाताने मुरड घालून कानासारखे बनवायचे. थोडी वाळल्यावर तळायची. हेच सारण पण गोल बनवून हातीने भरून करंजीच पण गोल यास खानदेशात सांजोरी किंवा साटोरी म्हणतात.
विदर्भात मात्र ही कृती ,
खीर कानवला (स्वाती हुद्दार)
पितृ पंधरवडा. पितरांच्या स्मरणाचा काळ. विदर्भातला हा मोठा सण. या काळात पितरांचे श्राद्ध तर्पण केले जाते. यावेळी पानावर वाढण्यासाठी विशेष पदार्थ केले जातात. त्यातील एक म्हणजे खीर-कानवले.
पितृ पंधरवडा. पितरांच्या स्मरणाचा काळ. विदर्भातला हा मोठा सण. या काळात पितरांचे श्राद्ध तर्पण केले जाते. यावेळी पानावर वाढण्यासाठी विशेष पदार्थ केले जातात. त्यातील एक म्हणजे खीर-कानवले. जाणून घेऊया या पदार्थांची रेसिपी: तांदळाची खीर साहित्य: सुगंधी तांदुळ अर्धी वाटी, दूध तीन वाटी, सुकामेवा (काजू – बदाम – पिस्ता काप) दोन चमचे, वेलची पूड अर्धा चमचा, साखर एक वाटी.
कृती प्रथम तांदुळ चांगल्या तुपावर गुलाबी रंगावर परतून घ्यावे. गार झाले की मिक्सरवर वाटून घ्यावेवाचलेला तांदळाचा रवा गरम पाणी घालून शिजवून घ्यावा. पातेल्यात दूध उकळत ठेवावे. थोडे आटल्यावर त्यात सुकामेवा साखर घालून उकळावे. नंतर त्यात शिजवलेला तांदळाचा रवा घालावा. वेलची घालून हलवून दोन मिनिटांनी गॅस बंद करावा.
कानवले साहित्य दोन वाटी कणीक, दोन चमचे तेल, मीठ.कृती कणीक एक चमचा तेल व चिमूटभर मीठ घालून घट्ट मळून घ्यावी. दहा मिनिटे ओल्या फडक्याने झाकून ठेवावी. नंतर लिंबाएवढा गोळा घेऊन पातळ पोळी लाटून घ्यावी. त्याला तेल लावून चौपदरी घडी घालून ठेवावी. अशा सर्व पोळ्या लाटाव्या. नंतर एका मोठ्या गंजात पाणी उकळून घ्यावे. त्यावर स्टीलची चाळणी ठेवावी. त्यावर लाटलेले कान्होले ठेऊन चांगली वाफ काढावी. हे कानवले गरम किंवा गार खिरीसोबत वाढावे. खीर- कानवले खूप छान लागतात.
२५. उंडे -उडीद आणि तांदूळ शिजवलेले गोळे किंवा लाडू आळवाच्या किंवा पोथीच्या पानांवर इडली सारखे वाफवायचे, त्याला वड्या शब्द आहे. काही ठिकाणी उंडे म्हणजे पुरणाचे गोळे होय.
२६. उळी हिरव्या कांद्याची पात
२७. अमृतफळ गोड पुरण भरून उकडलेला पदार्थ
२८.पेवणे जोंधळाच्या पीठापासून तयार केलेला पदार्थ होय.
२९. आंबिल ज्वारीचे पीठ किंवा कण्या रात्रभर भिजवून उकळायची. उकड बाजूला ठेवून मडक्यात ताक टाकून रात्रभर भिजवून ठेवायचे सकाळी तिखट मीठ घालून उन्हाळ्यात पितात.
३०.घुगऱ्या म्हणजे जेव्हा नामकरण विधी होतो तेव्हा वाटतात. यात गहू किंवा ज्वारी विशेषतः हुरडा असतांनाच वाळवून ठेवलेली, त्यात हरभरे आणि शेंगदाणे टाकून उकळायचे.
३१.. मधुरा बील हा पदार्थ ओळखता येत नाही..
३२. वड्याचे आंबट हे बहुतेक चंद्रपुर भागात बनवतात. सालीची उडदाची डाळ भिजत घालून साल काढून धुवून घ्यावेत आणि त्यात तिखट, मीठ, जिरे, धणे, मीठ घालून पीठ बनवून त्याचे सांडगे बनवतात तसे ताटात टाकून वाफवून घ्यावेत.
३३. तीळ काकवी बहुतेक हे तीळगुळाचे लाडू असावेत.
३४.राळेयाचा भात – हे भगरीसारखे एक धान्य आहे, मीठ घालून भात शिजवायचा आणि दुधाबरोबर खातात. नागपंचमीला खातात.
३५. सागवती सागवती हे बहुतेक शाखभाजी असावी किंवा कालवण कारण काही ठिकाणी आजही सरसरीत रस्सा भाजी केली की त्याला शाख केली आहे असे म्हणतात.
३६.गुळवणी – गुळाचे पाणी उकळून गाळून घ्यायचे धिरडे आणि पुरणपोळी बरोबर खातात.
३७.चणेयाचे वरण, चवळीयाचे वरण आणि मांडे खात. गजमांसाचे वरण
३८. फेणीया, सुतरफेणी असावी
३९, साकरमांडे ही पुरणपोळी असावी,साखर घालुन केलेली
४० लाडू शेव
भाज्या –
सुकेळे, मधुकाकडी, सोल, आळकवसा ( तरोटा) मातुळिंगे , मोहोळ, पेंडाळ, पेंजळ, ग्रिबा ( कडू भोपळा), डळी म्हणजे कांद्याची पात, ताकवत, घोळाणा,आळशी या होय.
फळे –
महाळुंगे, रितुपे, डांगर, कवठ, मोहाळू, आंबा, पेंडाळु या होय.
वरील पदार्थ समजून घेण्यासाठी मराठवाड्यातील भावना घोडेकर यांनी मदत केली तर काही आंतरजालावर उपलब्ध असलेली माहिती आहे.
इतर माहीती लीळाचरीत्र, एकंदरीत खूप वैविध्य आढळते.
@ सरला भिरूड