यादवकालीन खानदेश भाग १
महाराष्ट्राधीश असे स्वतःला अभिमानपूर्वक म्हणवून घेणारे एकमेव राजघराणे यादवांचे होय. त्या घराण्याने सुमारे पाचशे वर्षें (शके ७७१ – इसवी सन ८५० ते शके १२३३ – इसवी सन १३११) महाराष्ट्रावर राज्य केले. वैभवशाली राष्ट्र म्हणून त्या राज्याचा लौकिक आहे. यादव राजवटीतच ‘मराठी’ भाषा समृद्ध होऊन अनेकोत्तम साहित्यकृतींनी मराठीचे साहित्यभांडार अलंकृत झाले.(यादवकालीन खानदेश)
यादव राजे स्वतःस अभिमानाने श्रीकृष्णाचे वंशज म्हणवून घेत. यादवकुळाचा प्रारंभ पौराणिक दृष्टीने श्रीकृष्ण – प्रद्युम्न (मदन) – अनिरुद्ध – वज्र – प्रतिबाहु – सुबाहु असा आहे. पण ऐतिहासिक दृष्ट्या पहिला ज्ञात यादवराजा म्हणजे ‘द्दढप्रहार’. (शके ७७२ – इसवी सन ८५० ते शके ८०२ – इसवी सन ८८०). द्दढप्रहाराने स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर त्याचे स्वतःचे स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात निर्माण केले. ‘चंद्रादित्यपूर’(चांदवड, जिल्हा नासिक) ही त्याच्या राजधानीची पहिली नगरी.
नासिक जिल्हा, खानदेश व नगर जिल्ह्याचा काही भाग याला मध्ययुगात ‘सेऊण देश’ असे म्हणत. सेऊणदेश ही यादवांची पहिली भूमी. यादव हे गुजरातेतील द्वारकेहून आले. तसा उल्लेख जिनप्रभु ह्या जैन तीर्थंकारांनी लिहिलेल्या ‘नासिक्यकल्प’ ह्या ग्रंथात आलेला आहे. त्यात असे म्हटले आहे, की ‘द्वारकेच्या वज्रकुमार नावाच्या यादव क्षत्रियाच्या स्त्रीला जैन तीर्थकार चंद्रप्रभसाधु यांनी आश्रय दिला, तिचा पुत्र ‘द्दढप्रहार’ हा सामर्थ्यवान योद्धा झाला. त्याला लोकांनी ‘तलारपद’ (नगररक्षक, कोतवाल) दिले.’ नगररक्षक ‘द्दढप्रहार’च पुढे स्वपराक्रमावर स्वतंत्र राजा झाला.
यादवांचे सुमारे बत्तीस कोरीव लेख उपलब्ध आहेत. यादवांचा इतिहास समजावून घेण्याची साधने म्हणजे यादवराजांनी केलेले ताम्रपट, कोरलेले शीलालेख, हेमाद्री पंडिताच्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या संस्कृत ग्रंथातील ‘राजप्रशस्ती’ हा खंड व मध्ययुगीन मराठी ग्रंथसंपदा (उदाहरणार्थ, लीळाचरित्र, स्थानपोथी, ज्ञानेश्वरी).
द्दढप्रहाराने त्याच्या राज्याचा विस्तार चंद्रादित्यपूर (चांदवड) नगराच्या परिसरापासून थेट अंजनेरीपर्यंत (तालुका त्र्यंबकेश्वर) व चांदवडच्या दक्षिणेस सिंदीनेरपर्यंत (सिन्नर) केला. त्याच्या नंतर राजपदावर आला त्याचा मुलगा सेऊणचंद्र (प्रथम). तो वडिलांसारखाच पराक्रमी निघाला. त्याने त्याच्या राज्याच्या कक्षा आश्वी, संगमनेर पर्यंत विस्तारल्या व त्याची राजधानी राज्यकारभाराच्या सोयीसाठी चंद्रादित्यपुराहून ‘सिंदीनेर’ म्हणून त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या नगरात आणली. सिन्नरचा प्राचीन साहित्यात ‘श्रीनगर’ असा उल्लेख आहे. सेऊणचंद्र (प्रथम) – (शके ८०२ ते ८२२) पासून त्याच्या नंतर धाडियप्प, भिल्लन (प्रथम), श्रीराज, वादुगी, धाडियप्प (द्वितीय), भिल्लम (द्वितीय), वेसुगी, अर्जुन, भिल्लम (तृतिय), वादुगी (द्वितीय), वेसुगी, भिल्लम (चतुर्थ), सेऊणचंद्र (द्वितीय), सिंघणदेव, मल्लुगी, भिल्लम (पंचम) याच्यापर्यंत (शके ११०७ ते १११५) अशी सुमारे तीनशे वर्षें यादवांची राजधानी ‘सिन्नर’ येथे होती. भिल्लम (पाचवा) याने यादवांची राजधानी शके ११०७ मध्ये सिन्नरहून देवगिरी (आताचे दौलताबाद, जि. औरंगाबाद) येथे नेली व प्रसिद्ध देवगिरीच्या किल्ल्यावरून महाराष्ट्राचा राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.
यादवांचे राज्य उत्तरेस थेट नर्मदेपासून दक्षिणेस कृष्णा-कावेरीपर्यंत व पूर्वेस थेट नागपूर (विदर्भप्रांत) ते पश्चिमेस महिकावती (ठाणे, कोंकणप्रांत) पर्यंत विस्तारले होते. यादव राजांनी संपत्ती, वैभव, भूविस्तार निर्माण करून वैभवशाली राष्ट्र म्हणून महाराष्ट्रास हिंदुस्थानच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून दिले. यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, रस्ते, वापी (बारव), प्रचंड सैन्य, सोने, मोती, राजवस्त्रे यांचे वर्णन हा स्वतंत्र ग्रंथाचा, लेखनाचा विषय आहे. राजधानी देवगिरी व देवगिरीचा किल्ला या संदर्भातही विस्तृत लेखन झालेले आहे.
सिन्नर शहराच्या दक्षिणेस ‘शिव’ नदी आहे. त्या शिवनदीकाठी सिंदीची झाडे होती. ती सद्य काळात तुरळक आढळतात. सिंदीच्या बनाशेजारी उत्तर बाजूस उंचावर वसलेले गाव म्हणजे ‘सिंदर’ होय. ‘गावठा’ म्हणून सिन्नरमध्ये जो भाग ओळखला जातो तो भाग म्हणजे सिन्नरची मूळ वस्ती होय. सेऊणचंद्राने ‘सेऊणपुरा’ या नावाने स्वतंत्र पेठ किंवा वसती निर्माण केली असे वसई व आश्वी येथील ताम्रपटात म्हटले आहे.
श्रीमत्सेऊणचंद्रनाम नृवरतस्मादभूदभमिपः नित्यंदेशपदिधराजविषये स्वं नाम संपादनयन्।
येनाकारि पुरं च सेऊणपुरं श्रीसिंदीनेरे वरे तत्पुत्रः कुलदीपको गुणानिधी श्रीधाडियप्पस्त्रतः।।
असे अश्वी ताम्रपटात (शके १०२०) म्हटले आहे.
यादवांना ते सेऊणदेशाचे आहेत याचा अभिमान होता. शिवनदीचा उत्तर काठ ते सरस्वतीनदीचा दक्षिण काठ; तसेच, पूर्वेस सरस्वती नदी ते पश्चिमेस थेट शिवाजीनगर (बसस्टँड जवळचे) तेथपर्यंत पश्चिमेस असलेल्या त्यावेळच्या पारापर्यंत प्राचीन सिन्नर नगरीचा विस्तार होता. स्वतंत्र पेठा (पुर), वसाहती (राजवाडे, सामंतांचे राजवाडे, सैन्यतळ, हत्ती, घोडे यांचे हत्तीखाने व तबेले) यांनी यादवांची राजधानी गजबजलेली होती. त्याचे वर्णन ‘लीळाचरित्र’ या मराठी भाषेतील ग्रंथात (शके १२००) म्हाईमभट सराळेकर यांनी केलेले आहे.
‘श्रीनगर’मधील श्री म्हणजे संपत्ती, वैभव. श्रीनगर म्हणजे संपत्ती व वैभव यांनी संपन्न असलेले नगर. ‘ततः राजा नजराजधानी मधिष्ठितं श्रीनगरं गरीयः’ असे व्रतखंडाच्या राजप्रशस्ती श्लोक – २२ मध्ये सिन्नरला म्हटलेले आहे.
यादव राजे सुसंस्कृत व प्रजाहितदक्ष होते. त्यांनी राज्यविस्ताराबरोबरच भव्य राजप्रासाद, किल्ले, मठ, मंदिरे, वापी (बारव), तडाग (तळे) यांच्या निर्मितीकडे लक्ष दिले. ते राजे गेले पण त्यांनी, त्यांच्या सामंतांनी निर्माण केलेल्या वास्तू त्यांच्या कार्याची आठवण देत आहेत.
श्रीचक्रधरस्वामी व भिल्लममठ ही मंदिरसदृश पक्क्या दगडांमध्ये बांधलेली वास्तू सिन्नर शहरात चौदाचौकाचा वाडा (राजे फत्तेसिंहवाडा) या भागात आहे. महानुभव पंथ संस्थापक भगवान श्रीचक्रधरस्वामी यांचे या भिल्लममठात शके १९९०-९१ मध्ये दहा महिने वास्तव्य झाले. त्यामुळे ते महानुभाव पंथीयांचे देवस्थान ठरले आहे. वास्तू उत्तराभिमुख आहे. ती महानुभव श्रीदत्तमंदिर किंवा श्रीकृष्णमंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. श्रीनगरी भिलमठी अवस्थान (लीळा पूर्वार्ध – २३६) या लीळेत ते वर्णन आहे. मंदिराचा भव्य गाभारा व दगडी खांबांची ओसरी अशी ती भक्कम वास्तू यादव राजा, भिल्लम (तृतीय) याने शके ९४८ (इसवी सन १०२६) मध्ये निर्माण केली. त्याच्या नावावरून ते मंदिर ‘भिल्लममठ’ या नावाने प्रसिद्ध आहे. मठाला चारही बाजूंनी दगडी परकोट होता व पूर्वाभिमुख प्रवेशद्वार होते. त्याच मठात मराठी भाषेची आद्यस्त्री कवयित्री महदंबा व महानुभव पंथाचे आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य यांचे रामसगाव (जिल्हा जालना) येथून आगमन झाले. त्यांनी शके ११९१ मध्ये चैत्र महिन्यांत ‘दवणा’ ह्या सुगंधी झाडाची पाने, फुले श्रीचक्रधरस्वामींना अर्पण करून ‘दमणक पर्व’ साजरे केले.
श्रीचक्रधरस्वामींनी केलेले तत्त्वनिरूपण, त्यांच्या दहा महिन्यांच्या काळातील लीळा यांचे वर्णन मराठी भाषेचा आद्य गद्य ग्रंथ लीळाचरित्र यामध्ये (पूर्वार्ध लीळा क्रमांक २३५ ते २४६) आलेले आहे; तसेच, त्या काळात स्वामी सिन्नरच्या परिसरातील ज्या ज्या ठिकाणी (मठ, मंदिरे आदी) गेले त्यांचे वर्णन ‘स्थानपोथी’ (शके १२७५) या ग्रंथात आलेले आहे. भिल्लममठ माद्री (शके ११९२ ते १२३५) याच्या आधीपासून होता. त्यामुळे त्याला हेमाडपंथी देऊळ म्हणता येत नाही. ‘भिल्लममठ’ किंवा श्रीदत्तमंदिर सुस्थितीत असून त्या मूळ वास्तूस धक्का न लावता सभामंडपासह मंदिरनिर्मिती करण्यात आली आहे. ते मंदिर श्रीचक्रधरस्वामींच्या निवासाने, आसनाने व लीळांनी पावन झाले आहे. तेथे स्थान निर्देशक ओटे (पंथीय भाषेत स्थान) असून मुख्य स्थानाच्या जागी श्रीकृष्णमूर्तीची स्थापना केलेली आहे. भिल्लममठाचे पट्टीशाळेत (दगडी पडवी) शके १४१५ मध्ये कवी संतोषमुनी यांनी ‘रुक्मिणीस्वयंवर’ या ग्रंथाची पूर्णता केली.
गोंदेश्वर मंदिर ही ‘पंचायतन’ पद्धतीची भव्य वास्तू यादवांचे सामंत गोविंदराज यांनी शके ९९० च्या दरम्यान निर्माण केलेली आहे. गोंदेश्वर मंदिर हे सिन्नरचे वैभव आहे. शांत, एकांतस्थळी असलेल्या या मंदिरात श्रीचक्रधरस्वामी गेले होते. चौकात डावीकडे त्यांचे आसन झाले व मंदिरापुढे असलेल्या मंदिराच्या निर्मितीची कथा (पद्मेश्वर मंदिर, आताचे मुक्तेश्वर मंदिर, सिन्नर-शिर्डी रस्ता) त्यांनी भक्तांना सांगितलेली आहे (पूर्वार्ध लीळा क्रमांक २४५ गोंदेश्वरापुढे पद्मेश्वरू कथन).
सरस्वती नदीच्या दक्षिण काठावर असलेले आवेश्वर मंदिर प्राचीन पूर्वाभिमुख मंदिर, हल्ली ऐश्वरेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या उत्तर पट्टीशाळेत श्रीचक्रधारस्वामींचे आसन झालेले आहे.
यादवकालीन चतुर्विधांचे मंदिर या नावाची प्राचीन वास्तू सरस्वती नदीच्या दक्षिणकाठी होती. चतुर्विधाचा मठ मातीत दबलेला होता. तेथे स्वामींचे आसन झालेले आहे. मठाच्या ठिकाणी ‘पट्टीशाळा मंदिर’ या नावाचे श्रीचक्रधरस्वामींचे मंदिर व चतुर्विधाच्या मठाची उर्वरित वास्तू आहे.
वैजनाथाचे मंदिर ही यादवकालीन वास्तू शीव नदीच्या दक्षिण काठावर होती. तेथे स्वामींचा तीन दिवस निवास झालेला आहे. मूळ वास्तूच्या चौकाच्या ठिकाणी ‘भोजनता मंदिर’ या नावाचे श्रीचक्रधरस्वामींचे मंदिर आहे. तेथेच यादवसम्राट महादेवराय यादव हा पुढे देवगिरीहून मुद्दाम घराण्याच्या मुळच्या राजधानीच्या ठिकाणी आला होता (शके ११९०). त्याचा उल्लेख लीळाचरित्र, पूर्वार्ध लीळा क्रमांक २३७ मध्ये आलेला आहे. महादेवराय यादवाने श्रीचक्रधरस्वामींच्या दर्शनाच्या हेतूने भिल्लममठात त्याचा सेवक पाठवला होता. तेव्हा स्वामी पट्टीशाळेत खांबाजवळ गुजराती भाषेत त्या सेवकाशी बोलले. तो पवित्र खांब वंदनीय झाला! तेथे व जेथे श्रीनगरदेवाचार्य व महदाईसा यांना स्वामींचे प्रथम दर्शन झाले त्या ठिकाणी पवित्र स्थानांचे ओटे आहेत. भिल्लममठ ही पवित्र वास्तू व श्रीचक्रधरस्वामींचे ‘महास्थान’ यांना वंदन करण्यासाठी भारतभरातून भक्त येतात.
चिंचोली (तालुका सिन्नर) हे गाव सेऊणचंद्र – द्वितीय (शके ९७२ ते १००२) याने सर्वदेवाचार्य या राजगुरूस दान दिले होते. त्या दानाचे व चिंचोली गावाच्या चतुःसीमांचे वर्णन वसईचा ताम्रपट यात आलेले आहे.
‘सकलपरिग्रह विदितं सिंहिग्रामद्वादसके चिंचुली ग्रामः प्रदत्तः तस्य आघाटनानि पूर्विदग्भागे डोंगर दत्तं… दक्षिणे चिंचाला नाम तडागः।
नइऋत्ये वडगम्भाग्राम।
पश्चिमे तलेठिलीपर्यंतः उत्तरोत्तु सिंसि ग्रामीयडोंगर दत्तं तथा वटवृक्षर्चः’
वडगाव (पिंगळा, तालुका सिन्नर), शिंदे (तालुका जिल्हा नासिक) ही गावे चिंचोली गावाच्या भोवताली आहेत. ताम्रपटामुळे त्या गावांचेही प्राचीनत्व लक्षात येते.
यादवकाळापासून सिन्नरशी असलेले महानुभाव पंथाचे अनुबंध पुढेही टिकले. केशिराजबास यांनी लीळाचरित्रातील लीळांचे ‘रत्नमाळास्तोत्र’ या नावाने संस्कृतमध्ये काव्यरूपाने शके १२१० मध्ये वर्णन केले. मुरारीमल विद्वांस या आचार्यांची सिन्नर येथे एका गुजराती स्त्री भक्ताने शके १५०० मध्ये पूजा केली असे ‘वृद्धाचार’ या ग्रंथात वर्णन आलेले आहे.
श्रीचक्रधरस्वामींनी सिंघण, कृष्णदेवराय, महादेवराय, आमणदेव, रामदेव अशा पाच राजांची राजवट (शके ११४० ते ११९६) पाहिलेली आहे. स्वामींचा त्या राजांशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. कृष्णदेव (शके १९८०) व महादेव (शके ११८३) यानी तर स्वामींची आदरपूर्वक पूजा केलेली आहे. श्रीचक्रधरस्वामी व त्यांचा महानुभव पंथ अशा रीतीने यादवकाळाशी संबंधित आहे.
(अभ्यासाची साधने – लीळाचरित्र, स्थान पोथी, देवगिरीचे यादव – लेखक डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, प्राचीन मराटी कोरीव लेख – लेखक डॉ. शं.गो. तुळपुळे, महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास – डिखळकर)
लेख – बाळकृष्ण अंजनगावकर
माहिती साभार – खानदेश फेसबुक पेज
यादवकालीन खानदेश,यादवकालीन खानदेश,यादवकालीन खानदेश,यादवकालीन खानदेश