यादवकालीन खानदेश भाग ४ –
श्रीराज नंतर दुसरा राजा म्हणजे वड्डिग ह़ोय. या नावाने विविध रूपे दिसतात. हेमाद्री त्यांना वादुगि असं म्हणतो तर संगमनेर ताम्रपटात त्याचे नाव वंडिग असे येते. अश्वी ताम्रपटात त्याला वड्डिग म्हटले आहे. संगमनेर ताम्रपटावर बरीच माहिती मिळते. म्हणजे विवाह राष्ट्रकूट राजा धोरप्पा याची कन्या व्होडीयव्वा हिचे बरोबर झाला होता. हे आपण बघितले. यादव घराण्याच्या इतिहास समजून घेताना इतर तत्कालिन राजांचा इतिहास आणि त्यांचे परस्परसंबंध समजून घेणे जरूरीचे आहे. यादव घराण्याच्या इतिहास समजला की, थोडक्यात इतरांबद्दल जाणून घेता येईल. वैवाहिक संबंध आणि युध्ये जयपराजय मांडलिकत्व यांचा परिणाम तसेच सतत होणाऱ्या युध्दांमुळे सर्वसामान्य लोकांचे आयुष्य विस्कळीत होणे असे परिणाम होत असल्याने ते जाणून घेणे जरूरीचे आहे.(यादवकालीन खानदेश भाग ४)
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धार्मिक इतिहास हा कायम राजकिय इतिहासाशी संलग्न राहिला आहे. बरेचदा राजांचे मार्गदर्शन हे धार्मिक गुरूच असत. आणि एक प्रकारे धार्मिक सत्ता राजावरही गाजवली जाई, जो एक दबाव राजसत्तेवर असे, तो अदृश्य पण मोठाच असे. त्याविषयी सविस्तर चर्चा यादवकालीन राजकीय इतिहास संपल्यावरील लेखात करता येईल, म्हणजे खानदेशातील तत्कालिन समाजरचना समजून घेता येईल. यादवांच्या काळात थाळनेर आणि आशिरगड हे अहिरांकडेच होते म्हणजे अहिर यांचा आणि यादवांचा काय संबंध हे समजायला मदत होईल. मग ते मांडलिक होते का?
यादव आणि राष्ट्रकुट यांच्या संबंधांचा विचार करतांना यांच्या संबंधांचा विचार करताना दृढप्रहार विषयीही बघितले की ते राष्ट्रकुटांचे सामंत होते आणि राष्ट्रकूट गोविंद तृतीय नंतर राष्ट्रकूटांच्या विशाल साम्राज्याला उतरती कळा लागली होती. उत्तरेत गुर्जर प्रतीहार यांच्याशी सतत युद्धे चालू होती आणि त्याच काळात माळव्यात परमारांची नवीन सत्ता उदयाला येत होती. राष्ट्रकूटांच्या -हास हे त्यांना वरदान ठरलेलेच होते. अशा अवस्थेत राष्ट्रकूट तृतीय नंतर खोड्डीग राजा झाला. त्याच्या काळात परमारांना चांगलाच वाव मिळाला. त्यांनी आता आधीचे मंडलाधीपती हे सामंत निर्देशक पदवी सोडून महाराजाधिराज ही पदवी धारण केली.
आणि परमार सियक द्वितीय राष्ट्रकूटांची राजस्थानी मान्यखेटवर चाल करून आला. व त्याने मान्यखेटचा संपूर्ण विध्वंस केला आणि आता राष्ट्रकूटांचे मांडलिक हळूहळू स्वतंत्र होऊ लागले. राष्ट्रकूटांचे मांडलिक चालुक्य यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली, तैलप द्वितीय आणि राष्ट्रकूट कर्क द्वितीय याचा मांडलिक तैलप द्वितीय हा स्वतंत्र राजा झाला, तेव्हा कर्क राज हा राजधानी सोडून निघून गेला.
आता या सत्तास्पर्धेत एकीकडे माळव्याचे परमार आणि दुसरीकडे नव्याने स्वतंत्र झालेले कल्याणी चालुक्य यांच्यात सुरू झाली. चालुक्य द्वितीय याने परमार वाक्यतीराज मुंज याचे प्रदेशावर सतत आक्रमणे चालू ठेवली, असे मेरूत्तुंरंगाचा ग्रंथ “प्रबंधचिंतामणी” ह्यावरून लक्षात येते. शेवटी मुंज प्रतिकाराला तयार झाला आणि एक भीषण वैराची ज्योत जागवली गेली. ती पिढ्यानपिढ्या तशीच राहिली. वाक्यातीराज मुंजासारखा उदार व कलारसिक राज्य मंडळात केवळ ललातभूत आणि सौजन्याचा सागर असा राजा त्यात बळी गेला आणि पद्मगुप्त सारखा कवी त्याच्या मृत्यूने शोकविव्हळ झाला. तैलप द्वितीय याने वाक्यतीराज ठार मारल्यानंतर पुढील उद्गार काढले,
हा। शृंगारतरंगिणीकुलगिरे । हा ।चुडामणे।
हा। सौजन्यसुधानिधान। अहह। वैदग्धदग्धोदधे।
हा । देवोज्जयिनी। भुजंगमयुवती प्रत्यक्ष कंदर्प हा।
हा। सद् बांधव। हा कलामृतकर।क्यासि? प्रतिक्ष स्वमाम्।
ज्या प्रकारे गृप्तकाळातील कवी आणि लेखक यांच्या लेखनाचा उहापोह झाला आहे तसा फारसा पुर्वमध्यकाळातील झालेला नाही. कदाचित सखोल संशोधन या काळावर अजून प्रकाश टाकू शकेल आणि गुप्तकाळानंतरची साहित्यिक कला परंपरा जी गुप्त काळानंतरची प्रगती की अधोगती हे समजायला मदत होईल.
मुंजाने तैलपाचा एकूण सहा वेळा पराभव केला तर चालुक्यांच्या नीलगुंडा शिलालेखावरून परमारांचाही काही वेळा पराभव झाला असे दिसते. चालुक्य आणि परमार यांच्या अशाच जिवघेण्या युद्धात वड्डिगाचा पुत्र भिल्लम द्वितीय याने तैलप्पाच्या बाजूने पराक्रम गाजवून परमार सैन्याला धूळ चारली असावी. संगमनेर ताम्रपटात मुंजाचा पराभव करून रणरंगभीम यास मदत केली असे वर्णन आहे. रणरंगभीम म्हणजे चालुक्य नृपती तैलप द्वितीय हा होय.त्याचे एक बिरूद आहवमल्ल हे सुद्धा होय.आहवमल्ल आणि रणरंगभीम समानार्थी शब्द आहेत.
ह्या सर्व विवंचना चा सारांश असा की वड्डिग हा राष्ट्रकुट कृष्ण द्वितीयचा मांडलिक होता. त्याने राष्ट्रकूट राजा धोडप्पा अथवा व धृव द्वितीय निरूपम यांची कन्या व्होडियव्वा हिच्याशी विवाह केला आणि यादव घराण्यातील हा राष्ट्रकूटांचे मांडलिक शेवटचाच. वड्डिग पासून पुढचे सर्व यादव राजे आता चालुक्यांचे मांडलिक झाले.
माहिती संकलन –