महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,938

यादवकालीन खानदेश भाग ६

Views: 2488
6 Min Read

यादवकालीन खानदेश भाग ६ –

मागील लेखात डॉ पद्माकर प्रभुणे, यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले ते म्हणजे झंझ राजा हा ठाणे शिलाहार शाखेतील होता आणि त्याने गोदावरी आणि भिमाशंकर परिसरात बारा शिवालये बांधली या मुद्द्यावर मुलभूत विचार व्हायला हवा. या मुद्द्यावर रूपाली मोकाशी यांनी सविस्तर चर्चा केली आहे आणि ती देवालये कोकणातील असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे.(यादवकालीन खानदेश भाग ६) – डॉ पद्माकर प्रभुणे,

झंझ हा ठाणे शिलाहार शाखेतील राजा होता,  गोदावरी ते भीमा या परिसरात त्याचे राज्य होते का? नसल्यास नद्यांच्या उगमस्थानी शिवालये ( ताम्रपटात शंभोर्योद्वादशाsपि असा उल्लेख आहे, तेरा असा नाही) बांधणे शक्य दिसत नाही. ती कोकणात असणार आहेत. रूपाली मोकाशी यांचा पण संशोधक मधील लेख वाचला आणि त्यांनी मोकाशी यांच्या झंझराजाने तेरा शिवालये बांधली याचे खंडन केले आहे. त्यामुळे तुमच्या मुद्द्याला पुष्टी मिळते. धन्यवाद हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल..

ब्रम्हानंद देशपांडे यांच्या मते हा या यादवांशी संबंधित राजा शिलाहार नसावा तर राष्ट्रकुट शाखेचा सामंत असावा कारण अशी छोटी सामंत घराणी बरीच होती. शिवाय झंझराजा शिलाहार याचा काळ अंदाजे ९२२ इ.स. असा आहे. तो भिल्लम द्वितीयचा काळ इ.स. १००० शी जुळत नाही. पण कोकणातील शिलाहार राजा अनंतदेव यांच्या खारेपाटण ताम्रपटात भिल्लम नामक एका यादव राजाचा उल्लेख येतो. म्हणून या शिलाहारांना भिल्लम द्वितीय शरण गेला असा देशपांडे यांचा युक्तिवाद आहे. पण तो पटत नाही कारण नंतरचा यादव राजा वेसुगी याची पत्नी नायल्लादेवी ही गोग्गी राजाची कन्या होती. असे डॉ.भांडारकर यांचे मत आहे. तर देशपांडे तिला लाट देशातील चालुक्य वंशातील एक सामंताची मुलगी मानतात. त्यामुळे दोन्ही शक्यता खऱ्या वाटतात कारण ताम्रपटात तिच्या वडिलांच्या कुळाचा नावात तसा स्पष्ट उल्लेख नाही.

मागील लेखात झंज राजा कोण याबद्दल चर्चा झाली, पंडित भगवानलाल इंद्रजी या झंझराजाला कोकणच्या शिलाहार घराण्यातील समजतात तर ब्रम्हानंद देशपांडे यांच्या मते तो राष्ट्रकुट शाखेचा सामंत असावा, कारण राष्ट्रकुट सामंत घराण्याची लहान लहान सामंत त्याकाळी पुष्कळ होती, परंतु वाघळी येथील सिध्देश्वर मंदिरातील शिलालेखावरून यादवांचे मांडलिक मौर्य घराण्याची जी वंशावळ दिली आहे, त्यातही एक झंझराजा आहे. आणि तो समकालीन असण्याची शक्यता आहे.

नंतर येणाऱ्या यादववंशीय राजाचे नाव आहे, वेसुगी हेमाद्री रचित राज्यप्रशस्तीत भिल्लम द्वितीय ह्याचे  नाव येते. दुसरे यादववंशीय नाव  वेसुगि होय. तेसुगी, वासुगि, वादुगि असे ते नाव  यादवांच्या इतर शिलाताम्रशासनातून येते. हेमाद्री खालील श्लोक उद्धृत करतात,

एतस्मान्महसां महानिधीरसौ श्रीवेसुगिर्जज्ञिवान् ।।

कळस ताम्रपटात त्यांचे नावापुढे “सामंतचुडामणी” हे बिरूद आहे,  त्यांची पत्नी  नायलदेवी किंवा नायल्लादेवी  ही की गोग्गी राजाची मुलगी होती, असे म्हटले आहे. डॉक्टर भांडारकरांच्या मते हा गोग्गीराजा म्हणजे शिलाहार  होय. तर ब्रम्हानंद देशपांडे यांचे मते लाट देशातील चालुक्यांच्या वंशातील बारप्पाचा मुलगा असावा असे म्हटले आहे पण शिलाहार वंशातील असण्याची शक्यता आहे कारण झंझराजा यांच्या नंतरच्या वंशजाचे नाव हे गोग्गीराज आहे.

यानंतर येणाऱ्या यादववंशजाचे नाव जे फक्त राजप्रशस्तीत  आहे  ते म्हणजे अर्जुन होय. या अर्जुनाला महाभारतातील अर्जुन याचेशी तुलना केली आहे.तर यादव शिलालेखात नाव येते ते भिल्लम तृतीय याचे होय. तर हेमाद्री अर्जुनानंतर भिल्लम तृतीयचे नाव देतो.

भिल्लम तृतीय –

याचे काळातील कळस बुद्रुक ताम्रपट प्रसिद्ध आहे, तो भिल्लम तृतीयने कार्तिक महिन्यात सूर्यग्रहण पर्वावर दिलेला आहे, म्हणजे इसवीसन १०२५ याचा अर्थ  भिल्लम तृतीयाचा राज्य काल इसवीसन १०१५-१०४२ असा म्हणता येईल. यावेळी कल्याणीचे चालुक्य सत्तेवर सम्राट जयसिंग द्वितीय जगदेकमल्ल  विराजमान होता. त्याचा काळ इसवीसन १०१५-१०४२ असा आहे तर याच काळात परमार सिंहासनावर विख्यात राजा भोज हा होता. त्याचे शिलाताम्रशासनावरून त्याने लाट, कर्णाट व कोकण प्रांतावर विजय मिळवला असे दिसते. त्याचा उत्तराधिकारी यशोवर्मा याचा ताम्रपट नाशिक जिल्ह्यात कळवण या ठिकाणी सापडला आहे. भोजचरितात  भोजने कल्याणी चालुक्यांचा पराभव करून आपल्या चुलत्याचा म्हणजे वाक्यातीराज मुंजाचा पराभवाचा सूड घेतला, असे म्हटले जाते.

यावरून जयसिंग द्वितीय जगदेकमल्ल याचा काळ चांगलाच कठीण असणार, त्याचे सामंत ही त्याचे विरुद्ध कट आखू लागले होते, त्याला जिवे मारण्याचा कट केला होता, असे त्याच्या नागाई शिलालेखावरून कळते.

नांदेड जिल्ह्यात तळखेडला सापडलेल्या शिलालेखात जयसिंग द्वितीय देगकमल्ल ह्याचा उत्तराधिकारी सोमेश्वर प्रथम याचा ब्राह्मण सेनापती नागवर्मा याचा उल्लेख असून त्याने “सेऊणदिशापट्ट”  असे  बिरूद घेतले आहे. त्यावरून तृतीय भिल्लम हा परमारांना  मिळाल्याने चालुक्यांचे बाजूने नागवर्मा याने त्याचा पराभव करून ही पदवी घेतली असावी, असा तर्क डॉ. निळकांत शास्री करतात तर ब्रम्हानंद देशपांडे यांचे मते, ही शक्यता नाही कारण भिल्लम तृतीयची पत्नी हम्मा किंवा आवल्लादेवी ही जयसिंग द्वितीयची मुलगी होती. त्यामुळे आपल्या सासऱ्यान विरुद्ध तो परमार यांना सहाय्य करेल हे शक्य वाटत नाही. भिल्लम  तृतीया याने कळस ताम्रपटात संग्राम राम हे  बिरुद आहे.

पण एक गोष्ट लक्षात येते की या काळात म्हणजे खानदेशात चालुक्य, भोज आणि यादव यांच्यात अटीतटी आणि अस्वस्थतेचा काळ होता.

हेमाद्रिच्या राज्यप्रशस्तीत भिल्लम तृतीय नंतर वादुगी-वेसुगी-  भिल्लम चतुर्थ असा  क्रम येतो परंतु या सर्वांची नावे यादव शिलाताम्रपटात येत नाही,  याउलट कळस आणि वसई ताम्रपटात भिल्लम तृतीय नंतर एकदम सेउणचंद्र द्वितीय ह्याचेच नाव येते म्हणजे या सत्तावीस वर्षात हेमाद्रीच्या  मतानुसार हे चार राजे झाले अर्थात त्यांचा राज्य काळ मर्यादित असावा. वादुगीला कवींचा आवडता आणि स्तुतीपात्र तर वेसुगिने सामंताचे दमन केले असे म्हटले आहे.

संदर्भ:
देवगिरीचे यादव ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे.
श. गो. तुळपुळे यांचे मराठी कोरीव लेख.
वि. भि. कोलते आणि शां. भा. देव यांचे महाराष्ट्र आणि गोवे येथील शिलालेख व ताम्रपटांची सूची.

माहिती संकलन  –

Leave a Comment