महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,320

येमाई देवी मंदिर, कवठे यमाई

By Discover Maharashtra Views: 5989 4 Min Read

कवठे यमाई येथील येमाई देवी मंदिर :

कवठे येमाई येथील येमाई देवी मंदिर हे या गावचे कुळदैवत आहे, ग्रामदैवत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, आराध्यदैवत, कुलदैवत असणाऱ्या श्री येमाई देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

शिरूर तालुक्याच्या पश्र्चिम भागात शिरूर-मंचर मार्गावर कवठे येमाई हे गाव असून गावातच्या दक्षिणेस ३ कि. मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्री येमाई देवी देवस्थान एक जागृत देवस्थान असून या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची मनोकामना, मनातील ईच्छा पुर्ण होत असल्याने भक्तगणांची येथे नवस फेडण्यासाठी नेहमी गर्दी होत असे.

कवठे येमाई गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला असून गावाजवळून वाहणाऱ्या घोडनदीच्या किनारी पुर्वी कवठे गाव वसले होते. कवठे येमाई गावाचे वैभव असलेल्या श्री येमाई देवीच्या प्राचिन मंदीराचा जिर्णोद्दार करण्यात आला असून मंदीर परिसरास तिर्थक्षेत्राचा दर्जाही प्राप्त झाला आहे. देवीच्या मंदिर परिसरात सभोवताली शेकडो वर्षांपुर्वीचे वटवृक्ष, मंदिराच्या उत्तरेस पायऱ्या असलेली ऐतिहासिक बारव(विहीर), मंदिरातील प्रशस्त गाभारा, समोरचा मोठा सभामंडप, देवालयाच्या सभोवताली तटबंदीचा वाडा, त्यास पुर्वेकडून व उत्तरेकडून असणारी भव्य प्रवेशद्वारे, मंदीरासमोर दोन ऐतिहासिक घाट्या(घंटा) असून पुर्वेकडील महाद्वाराजवळ दोन ऐतिहासिक नगारे आहेत. मंदीराच्या आवारात तिन उंच दिपमाळी असून नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेस होणाऱ्या यात्रा उत्सवात त्या पेटविल्या जातात. देवीच्या दर्शनासाठी येथे मुक्कामी येणाऱ्या भाविकांच्या रहाण्याच्या सोयीसाठी आवारातच खोल्या बांधलेल्या आहेत. देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस पंधरा फूट खोल दगडी बांधकामातील श्री महादेवाचे ऐतिहासिक मंदिर असून त्यातील दगडी पिंड व दगडी नंदी हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. याच ऐतिहासिक महादेव मंदिरातून तीन कि. मी. अंतरावर असणाऱ्या कवठे गावठाणातील राजवाड्यापर्यंत पूर्वी भुयारी मार्ग होता.

धार, इंदोर, वणी ते दिंडोरीच्या पायथ्यापासून तसेच पुणे, मुंबई, नगर, नाशिक, जळगावसह संपूर्ण राज्यभरातून देवीचे भक्त दर मंगळवारी, नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेस होणाऱ्या यात्रा उत्सवात श्री येमाई देवीच्या दर्शनासाठी कुटूंबासह मोठ्या संख्येने येत असतात. देवीची पूजा गोरे-पाटील हे कुटुंब करत असते. दररोज सकाळी आठ व संध्याकाळी सहा वाजता देवीची नियमित आरती व ओलांडा या ठिकाणी होत असतो. विशेष करून भाविकांची या वेळी मोठी उपस्थिती, गर्दी होत असते. वर्षातील प्रत्येक पौर्णिमेस रात्री व आषाढ श्रावण महिन्यातील सायंकाळी गावातील श्री येमाई देवीच्या पालखीची सवाद्य मिरवणूक निघत असते. गावातील सर्वच भागातील वाड्यावस्त्यातील लोकांना या पालखीचा मान दिला जातो.

नवरात्र काळात श्री येमाई देवीचा मोठा उत्सव येथे साजरा करण्यात येतो. होय-हवन, भजन व इतर व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रध्देने साजरे करण्यात येतात. वार्षिक पिकपाण्याचा अंदाज घेण्यासाठी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेस सायंकाळी मंदिरासमोर असणारी सुमारे एकशे पंचवीस किलोग्रॅम वजनाची मोठी दगडी गोटी तेरा जणांच्या उजव्या हाताच्या एकाच मधल्या बोटाच्या साहाय्याने उचलली जाते. हा मान पिढ्यानपिढ्या मुंजाळवाडी ग्रामस्थांचा आहे. येथील श्री येमाई देवी देवस्थानाला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असल्याने मंदिर परिसराचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे.

कवठे येमाई ता. शिरूर येथील तिर्थक्षेत्र श्री येमाई देवी देवस्थान हे पुण्यापासून ७० किलोमीटर, शिरूरपासून २७ किलोमीटर, मंचरपासून ३५ किलोमीटर, तर राजगुरुनगर (खेड) पासून ४५ किलोमीटर व कवठे येमाई गावातून ३ किलोमीटर अंतरावर हे जागृत देवस्थान आहे.

शिरूर तालुक्यात रामलिंग मंदिर, काळभैरव मंदिर, येमाई देवी मंदिर, रांजणगावचा महागणपती मंदिर, अशी बरीच मंदिरे आहेत. या मंदिराची माहिती इतर लेखांमध्ये देण्यात येईल.

– Yogesh Bhorkar

Leave a Comment