महाराजा यशवंतराव होळकर –
एक असे नाव ज्याने १९व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते, अहो एक दोनदा नाही तर तब्बल १८ वेळेस इंग्रजांना स्वतःच्या बळावर टिच्चून पराभव करणारे अखंड भारतातील एकमेव उदाहरण. यशवंतराव होळकर यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे ३ डिसेंम्बर १७७६ रोजी वाफगाव, ता. खेड जि. पुणे येथे होळकर गढीत झाला. वाफगाव येथील ही होळकर गढी एखाद्या भुईकोट किल्ल्यापेक्षा कमी नव्हती.
आधी अहिल्याबाई होळकर आणि नंतर तुकोजीराव होळकर यांच्या मृत्यूनंतर होळकरांच्या गादीवरून अंतर्गत कलह सुरू झाला, तुकोजीराव यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र आणि यशवंतरावांचे सावत्र बंधू काशीराव हे पेशव्यांच्या बाजूने गेले होते आणि काशीरावांचे धाकटे बंधू मल्हारराव दुसरे हे सर्जेराव घाटगे यांच्याकडे गेले. पेशवा दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांना होळकरांचे राज्य गिळंकृत करायचे होते.
मल्हारराव होळकर यांना भांबुरड्याच्या लढाईत शिंद्यांनी मारल्यानंतर यशवंतराव आणि विठोजी हे पुण्याहून उत्तरेकडे १७९७ साली पळून गेले. पुढे यशवंतराव हे नागपूरच्या राघोजी भोसले यांच्याकडे आश्रयास गेले. परंतु दौलतराव शिंदे आणि पेशव्यांनी राघोजींना यशवंतरावास कैद करण्यास भाग पाडले. पण कैदेतूनही यशवंतराव मोठया शिताफीने निसटले. आणि धारच्या आनंदराव पवार यांच्याकडे काही स्वारांसह नोकरीस राहिले. नंतर कुठलीही गादी किंवा राजसत्ता नसताना स्वकर्तुत्वाने त्यांनी मध्य प्रांतातील काही धनाढ्य संस्थानिकांकडून खंडणी वसूल केली आणि पुढे पेंढारी, भिल्ल, पठाण, राजपूत यांना सोबत घेऊन स्वतः ची फौज तयार केली.
त्यांच्या सख्ख्या भावाला म्हणजेच विठोजी यांना पेशव्यांनी कुठलाही गुन्हा नसताना सत्तेच्या नशेत हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. या हत्येचा सूड घेण्याचे यशवंतराव यांनी ठरवले आणि त्यांनी पुण्यावर हल्ला केला. तेव्हा जीव मुठीत घेऊन दुसरा बाजीराव पुण्यातून पळाला. आणि थेट वसई ला इंग्रजांशी तह करून बसला. बाजीरावाच्या ह्याच एका मोठ्या चूकीची शिक्षा पुढे सगळ्या भारताला १५० वर्ष वर्ष भोगावी लागली. यशवंतरावांना होळकरांची सत्ता पुन्हा स्थापित करून स्वतःचा राज्याभिषेक महेश्वर येथे करून घेतला.
१८०३ नंतर इंग्रजांनी हळूहळू भारतात पाय पसरण्यास सुरुवात केली. यशवंतरावांच्या पुढे आता नवीन समस्या येऊन ठाकली. त्यांना आता अनेक शत्रूंशी लढा द्यायचा होता. स्वकीयांशी आणि इंग्रजांशी. इंग्रजांना एक दोन नाही तर तब्बल १८ वेळा सलग पराभूत करणारा योद्धा या भारतभूमीत एकच होता. अनेक इंग्रजांची नाके त्यांनी कापली होती.
त्यांच्या लक्षात आले होते आपल्याला आता धोका हा इंग्रजांमुळेच आहे तेव्हा त्यांनी इंग्रजांविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले. शेवटी शेवटी तर इंग्रजांनी त्यांच्याशी संधान बांधण्याच्या दृष्टीने मित्रत्वाचा प्रस्ताव विनाअट समोर ठेवला. पण धूर्त इंग्रजांना यशवंतराव चांगलेच ओळखून होते की हे कधी आपला सरड्यासारखा रंग पालटतील सांगता येणार नाही. त्यामुळे त्यांनी इंग्रजांचा हा प्रस्ताव लाथाडला.
त्यांनी अनेक संस्थानिकांना पत्रे पाठवून हे सांगण्याचा प्रयत्न केला की हा आपला देश आहे आणि इंग्रजांना या देशातून हाकलून लावण्यासाठी एकजूट होण्यासाठी सांगितले पण संस्थान खालसा होण्याच्या भीतीने कोणत्याही संस्थानिकांने त्यांना साथ दिली नाही. काहींनी साथ देण्याचा प्रयत्न केला पण नंतर तेच इंग्रजांशी करार करुन मोकळे झाले. तेव्हा अखंड भारतात सबंध इंग्रजांशी टक्कर घेणारा सेनानी हा एकमेवच होता. तत्कालीन इतिहासात त्यांच्या समकालीन असणारा नेपोलियन याच्याशी त्यांची तुलना केली जाते कारण दोघांचे शत्रू एकच होते.
भानपुरा येथे त्यांनी तोफा आणि दारुगोळा निर्मितीसाठीचा कारखाना टाकला होता. कदाचित तेव्हा भारतातील काही संस्थानिकांनी यशवंतराव यांना साथ दिली असती तर भारत हा इंग्रजांच्या ताब्यात जातच नव्हता. पण ह्या झाल्या साऱ्या जर तर च्या गोष्टी.
ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय कलकत्त्याला होते त्यावेळी कलकत्त्यावरच हल्ला करण्याची त्यांची योजना होती. अखेरीस तर ईस्ट इंडिया कंपनी भारतातून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत होती.
काही इतिहासकारांच्या मते यशवंतराव होळकर हे क्रूर होते आणि इंग्रजांनी त्यांना लुटारू म्हणून बदनाम केले. मान्य क्रूर होते पण मग काय इंग्रजांना गोंजारायला पाहिजे होत का? आणि आपल्या प्रदेशात लुटालूट करणार्याकडून भरपाई करण्यासाठी शत्रू पक्षाकडून खंडणी वसूल करणे हा तर युद्धाचा नियमच होता. पण शेवटी सतत युद्ध, भावांचा आणि पुतण्याचा डोळ्यादेखत बघितलेला मृत्यू आणि मानसिक त्रास यामुळे त्यांना ब्रेन स्ट्रोक होऊन २८ ऑक्टोबर १८११ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तत्कालीन परिस्थितीचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की यशवंतराव होळकर हे आद्य स्वातंत्र्यवीर होते.
ज्यावेळी सर्व संस्थानिक फक्त आपल्या राज्यापुरता विचार करून इंग्रज आपले राज्य खालसा करतील या भीतीने त्यांच्याशी वाद करण्यासही कचरत, त्याचवेळी आपल्या राज्याचा विचार न करता या देशातून इंग्रजांचा समूळ उच्चाटन व्हावे या एकाच ध्येयासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा बराचसा काळ घोड्याच्या खोगिरावर दौडत इंग्रजांना पिटाळणारे यशवंतराव होळकर यांनी फक्त देशाचा विचार केला होता.
त्यामुळे खंत एकाच गोष्टीची वाटते की यशवंतरावांचा हा देदीप्यमान इतिहास आम्हाला कधी शिकवलाच गेला नाही. मान्य आहे नेपोलियनचा पराक्रम अफाट होता त्या नेपोलियनवर शेकडो पुस्तके लिहिल्या गेली, अख्ख्या जगाला माहितीये आता नेपोलियन कोण होता, पण ज्या नेपोलियनशी आमच्या यशवंतरावांची तुलना होते त्यांच्याविषयी कुणालाच जास्त माहिती नाही. इतिहासानेही त्यांना आणि त्यांच्या पराक्रमाला अंधारात ठेवले.
आम्हाला शाळेत इतिहासात शिकविल्या गेलं की मुघलांना हरवून इंग्रज भारतात आले पण त्यांना हे माहीत नव्हतं की मुघलांचा बादशाह शाह आलम दुसरा याला तर इंग्रजांनी केव्हाच कैदेत टाकलं होतं. आणि त्यावेळी अखंड भारतात इंग्रजांना टक्कर देणारा एकच वाघ होता ज्याने सगळ्याइंग्रजांचं जगणं अवघड करून टाकलं होतं.
आज अनेक क्रांतिकारकांची नाव स्वातंत्र्यलढयात घेतली जातात आणि ती घेतलीही जावी कारण त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य समरात उडी घेतली होती पण त्यांना जिथून प्रेरणा मिळाली ते आद्य स्वातंत्र्यवीर यशवंतराव होळकर आणि त्यांचा इंग्रजांविरुद्ध लढा मात्र अज्ञात राहिला.