महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,12,346

येसाजी कंक व हत्तीशी झुंज

Views: 2786
8 Min Read

येसाजी कंक व हत्तीशी झुंज – सत्य कि लोककथा ?

छत्रपती शिवरायांची कर्नाटक मोहिमेतील येसाजी कंक व हत्तीशी झुंज ह्या घटनेविषयी कृष्णराव अर्जुन केळुस्कर लिखित ( सन १९०६ ) छत्रपती शिवाजी महाराज या चरित्र ग्रंथात वर्णन पुढीलप्रमाणे येते “ कुतुबशहा एके समयी सहज बोलताबोलता रघुनाथपंतास म्हणाला कि “ शिवाजीमहाराजांच्या पदरच्या लोकांची शिपाईगिरीविषयी मोठी आख्या एकतो तर त्यांची ती शिपाईगीरी प्रत्यक्ष पहावी असे आमच्या मनात आले आहे. रघुनाथपंत म्हणाला “ त्यांच्या पदरचा एकएक शिपाई हत्तीच्या बरोबरीचा आहे . त्यावर बादशहा म्हणाला “ ते हत्तीशी झुंजतील काय ? रघुनाथपंत बोलला “ अशक्य काय ? आज ही त्यांची लढाई पाहू . एक शिपाई घेऊन या . बादशहाची हि मनीषा महाराजांस कळवून त्यांच्या हुकमाने येसाजी कंकास दहा चांगले मजबूत शिपाई निवडून काढून कुतुबशहाकडे न्यावयास सांगितले . हे शिपाई निवडून घेऊन येसाजी कंक रघुनाथपंताबरोबर बादशहाच्या भेटीस गेला. त्या शिपायास बादशहाने वस्त्रे देऊन गौरविले आणि मग एक मदोन्मत हत्ती आणून त्यांच्या पुढे मोकळा सोडला . तो निट येसाजी कंकाच्या अंगावर धावत आला. तेंव्हा त्याने तिळभरही न कचरता आपली तलवार उपसून मोठ्या चपळाईने हत्तीच्या तोंडावर सज्जड वर केला . त्यासरशी त्या हत्तीची सोंड दातापासून पुरी उतरली . हे पाहून बादशहा अगदी चकित झाला.(येसाजी कंक व हत्तीशी झुंज)

येसाजीस जवळ बोलवून त्याने फार तारीफ केली व त्यास सोन्याची कडी , तोडे व गळ्यातील गोफ ही बक्षीस दिली .बादशहा इतकेच करून थांबला नाही , तर त्याने येसाजीस पाच हजार रुपये उत्पनाचा गाव इनाम करून देण्याचे मनात आणले. हा त्याचा मानस येसाजीस कळला तेंव्हा तो बादशहास मोठ्या अदबीने मुजरा करून म्हणाला कि “ मी महाराजांचे अन्न खातो ते आपलेच आहे. त्यांच्या आज्ञेने मी येथे येऊन माझी करामत आपण पहिली , तरी आपले हे बक्षीस मी घेणे योग्य न्हवे . आम्हास महाराजांनी काय उणे केले आहे की , आपले बक्षीस गेऊन मी निर्वाह करावा ? आपले बक्षीस घेऊन मी आपला ओशाळा झालो असता माझी बुद्धी भ्रष्ट होऊन महाराजांच्या सेवेत अंतर पडेल. यास्तव जे काही देणे ते महाराजांकडे द्यावे. ते धनी आहेत. चाकरी करणे हा आमचा धर्म आहे.

येसाजी कंक व हत्तीशी झुंज ह्या घटनेविषयी निरनिराळ्या बखरीत येणारे वर्णन आपण पाहू

शेडगावकर भोसले बखर : – लेखनकाळ १८५४ शिवाजी महाराजांची आग्रा भेट १६६६ म्हणजे शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटी नंतर १८८ वर्षांनी लिहिलेली बखर , या उत्तरकालीन बखरीत आग्रा भेटीत सदर घटना आदळून येते . छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीत येणारे वर्णन

औरंगजेब पातशाह याचे मनात मोठा घुसा येऊन सिवाजी राजे यास विचारले की आपली फौज व लोक पाळव घोडे व हत्ती आपले दौलतीत किती आहेत तेव्हा राजे बोलिले कि दोन हाताचे हाती मरीब पादशाहाचे दौलतीत आहेत परंतु बत्तीस दाताचे हात्ती फार मोठे आम्हापासी आहेत तेव्हा पादशाह यांचे मनात फारच आचंबा येऊन सिवाजी राजे यास विचारले जे बत्तीस दाताचे हत्ती आपल्यापासी कसे आहेत ते आंम्हास दाखवावयास आणावे नंतर शिवाजी राजे याणी तेच समई मावळे लोकांचे सरदार येसाजी कंक व तानाजी मालुसरे व बाजी पासलकर वगेरे मोठे मोठे पायाचे सरदार बरोबर होते त्यास बहिर्जी नाईक जासूदाचा यास बोलावू पाठविले . ते आणोन पादशाहासी कचेरीत दाखविले . त्याची स्वरूपे व शरीरे विक्राळ व ज्याच्या दंडा येवढ्या मिशा व मनगटा येवढी नाके होती ते पादशाहांनी पाहून मोठे आश्चर्य व्यक्त केले कि हि दक्षिण देशाची मनुष्य केवळ सैतान आहेत त्याजबरोबर लढाई करून उपयोग नाही असे पादशाहाचे मनात आले.

शेडगावकर भोसले बखर आग्रा भेटी वेळी औरंगजेबाने शिवाजी महाराजांस औरंगजेबाने सैन्यात हत्ती किती आहेत असे विचारले असता. शिवाजी महाराजांनी येसाजी कंक , तानाजी मालुसरे असे सरदार समोर उभे केले . यात कोठेही हत्तीशी झुंजीचा उल्लेख नाही .

सप्तप्रकरणात्मक चरित्र :- मल्हार रामराव चिटणीस :- सप्तप्रकरणात्मक चरित्र लेखनकाल १८१० छत्रपती शिवरायांची कर्नाटक मोहिम १६७६ म्हणजे १३४ वर्षांनी लिहिलेली उत्तरकालीन बखर या बखरीतील येणारे वर्णन

“ हत्ती नामी किती आहेत म्हणोन पातशहाने विचारील्यावरी मावळे लोक कंक , मालुसरे मोठमोठे सरदार पन्नास शंभर व पोशाख व सामानसुद्धा होते ते आणवून मुजरे करवून भेटविले , आणि हेच हत्ती बाळगिले आहेत म्हणोन महाराजांनी उत्तर केले. तेंव्हा बादशहानी बहुत आश्चर्य मानिले. “

सप्त प्रकरणात्मक चरित्रातील नोंदीनुसार कर्नाटक मोहिमेत कुतुबशहा ने शिवाजी महाराजांस सैन्यात हत्ती किती आहेत असे विचारले असता. शिवाजी महाराजांनी येसाजी कंक , मालुसरे असे सरदार समोर उभे केले . यात कोठेही हत्तीशी झुंजीचा उल्लेख नाही .

मराठा साम्राज्याची छोटी बखर :- मराठा साम्राज्याची बखर लेखनकाल १८१७ छत्रपती शिवरायांची कर्नाटक मोहिम १६७६ म्हणजे १४० वर्षांनी लिहिलेली उत्तरकालीन बखर या बखरीतील ह्या घटनेविषयी येणारे वर्णन . सदर बखरीत येसाजी काळे असे नाव येते.

पातशहानी पुसिले कि , लष्कर किती आहे ? तेंव्हा लष्करास इशारत करून लोक उभे केले आणि फौजेचा मुजरा घ्यावा म्हणून बोलिले . पातशहानी द्राक्ष महालावरून तमाम लष्करचे लोकांचे मुजरे घेतले . पंच हजारी , सप्त हजारी, असा वीस हजारांचा मुजरा करून फौज दाखविली . पातशहा चकित झाले. मागती पुशिले की , तुमचे मावळे लोकांचा आस्करा बहुत ऐकतो . त्यावर महाराज बोलिले की , मावळे लोक नामी होते ते मोरोपंताजवळ राज्याचे रक्षणार्थ ठेवले. त्याजबरोबर प्यादे होते ते साह्य करावयास आणिले आहेत . त्याजवर पातशहा बोलिले की , कोणी हत्तीबरोबर झुंजेल की काय ? महाराज बोलिले की , पातशहाचे हत्तीबरोबर झुंजेल असा कोण आहे ? तथापि पातशहा तमाशा पाहतील तर पहावा . येसाजी काळे यास इशारत करून मावले लोक आणविले आणि सांगितले की , पातशहाचे हत्तीशी झुंजावे जावे. असे म्हणताच येसाजी काळे बोलीला की ,

हत्ती सोडावा . त्याजवरून मस्त हत्ती पागेचे निशाणचा सोडून आणिला . महातास इशारा करून येसाजी काळे याजवर हत्ती चालविला . तेंव्हा दोन तीन हिलाऱ्या करून हत्ती मुरडाविला . सोंड तोडली . तरवारीचे पांच वार आणखी चालवून हत्ती माघारा फिरविला . तेंव्हा महाराजांनी लोकांसि बोलावून आणिले . जडावाची कडी दिली. पातशहा मेहेरबान होऊन काळे मजकूर यास नावाजीले . महाराजांस तीन लक्ष होण दिले . जवाहीर दिले. त्यांस नावाजीले . लष्करासी पातशाहानी मेजवानी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज उत्तरार्ध :- वा . सी. बेंद्रे. , प्रकरण २७ दक्षिणदिग्विजय किंवा कर्नाटकची स्वारी :- मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीतील मजकूर कर्नाटकच्या स्वारीचा कार्यकारणभाव , मग तो अवास्तवतेत का वर्णिलेंला असे ना , सुचविण्याकडे अभ्यासकांची थोडीशी मन:प्रवृत्ती खेचतो . बखरकाराना तत्कालीन परीस्थीतिची थोडीही कल्पना असल्याचे दिसून येत नाही . निरनिराळ्या प्रसंगाच्या कालाबाबत व क्रमाबाबतही त्यांच्यात पूर्ण अज्ञान आहे असे म्हणण्यास हरकत नाही .

मराठा साम्राज्याच्या बखरीत सदर हत्तीच्या झुंजीचा उल्लेख आढळतो त्यातील येसाजी काळे म्हणजे येसाजी कंक असण्याची शक्यता आहे . इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी केलेली समीक्षा देखील विचारात घेण्यात यावी. त्याआधारे सदर बखरीत उल्लेख आहे इतकेच विधान करू शकतो .

श्री नागेश सावंत

सदर सर्व बखरीतील वर्णनाचा विचार करता येसाजी कंक व हत्तीची लढाई यास समकालीन कोणताही संदर्भ आढळून येत नाही . कृपया कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही तर इतिहासातील सत्य जाणण्यासाठी हा लेखन प्रपंच.

Leave a Comment