झुंज भाग १ –
दुपारच्या वेळेस रावजी गडाच्या मुख्य दरवाजासमोर उभा राहिला. तो खूप दूर वरून रपेट करत आला असणार हे त्याच्या एकूणच अवतारावरून समजू शकत होते. काहीशा गडबडीतच त्याने घोड्यावरून खाली उडी टाकली. एकदा घोड्याच्या मानेवर थोपटले आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला. त्याचा घोडाही धन्याच्या या अशा थोपटण्याने काहीसा शांत झाला. १५/२० पावलातच रावजीने दरवाज्यावर थाप मारली आणि परत काही पावले मागे येऊन उभा राहिला.(झुंज भाग १) जास्तीत जास्त अर्धा मिनिट झाला असेल आणि दरवाज्याच्या वरच्या बाजूला असलेली छोटीशी झडप उघडली गेली. त्यातून एका व्यक्तीने डोकावून बाहेर पाहिले. त्याच्या नजरेच्या समोरच रावजी उभा असल्याने त्याने तिथूनच विचारले.
“कोन हाये?”
“म्या रावजी, किल्लेदारास्नी भेटायचंय.” रावजीने उत्तर दिले.
“काय काम हाये?” पुढचा प्रश्न विचारला गेला.
“त्ये किल्लेदारास्नीच सांगायचा हुकुम हाये.” रावजी उत्तरला आणि झडप बंद झाली. काही क्षणात परत ती उघडली गेली आणि पुढचा प्रश्न आला.
“कुन्कून आलायसा?”
“गडावरनं आलोय… राजांचा सांगावा घिवून.” रावजीने उत्तर दिले आणि परत झडप बंद झाली. काही वेळ गेला आणि साखळ्यांचे आवाज ऐकू आले. त्याच बरोबर मोठा लाकडी ओंडका सरकावल्याचा आवाज झाला. हळूहळू काहीसा आवाज करत दार उघडले गेले. तो पर्यंत रावजीने परत घोड्यावर बैठक मारली आणि तो दरवाजा पूर्ण उघडण्याची वाट पाहू लागला.
दरवाजा पूर्ण उघडला जाताच आतून चार पहारेकरी बाहेर येवून उभे राहिले. त्यांच्या मागून अजून एक जण बाहेर आला. कपड्यांवरून तो पहारेकऱ्यांचा अधिकारी वाटत होता.
“निशानी?” आल्या आल्या अधिकाऱ्याने काहीशा चढ्या आवाजात रावजीला विचारले. रावजीने आपल्या शेल्याला खोचलेली राजमोहोर बाहेर काढून अधिकाऱ्याच्या हातावर ठेवली. तिच्याकडे एकदा उलटसुलट निरखून पाहून त्याने ती निशाणी परत रावजीच्या हातात दिली आणि हातानेच दरवाजातून आत जाण्याची परवानगी दिली.
किल्लेदार त्याच्या निवडक अधिकाऱ्यांबरोबर सल्लामसलत करत मुख्य वाड्याच्या बैठकीत बसला होता. तेवढ्यात एक शिपाई त्यांच्या समोर आला आणि त्याने सगळ्यांना लवून मुजरा केला. किल्लेदाराचे लक्ष त्याच्याकडे जाताच त्याने इतर अधिकाऱ्यांना हातानेच थांबण्याचा इशारा केला.
“बोल रे..”
“माफी असावी सरकार, पन गडावरनं राजांचा सांगावा आलाय…” शिपाई किल्लेदाराच्या पायाकडे पाहत म्हणाला.
“आऽऽऽ राजांचा हुकुम? आरं मंग हुबा का? जा त्याला आत घीवून ये…”
घाईघाईतच किल्लेदाराने शिपायाला आज्ञा दिली आणि शिपाई माघारी वळला.
काही वेळातच रावजी किल्लेदारासमोर हजर झाला. आल्या आल्या त्याने किल्लेदाराला लवून मुजरा केला आणि मान खाली घालून उभा राहिला.
“काय हुकुम आहे राजांचा?” किल्लेदाराने रावजीकडे पहात प्रश्न केला.
“राजानं खलिता धाडलाय…” कमरेचा खलिता आदबीने काढून किल्लादारच्या हाती देत रावजी उत्तरला.
“अस्सं… गडावर समदं ठीक हाय नव्हं?” रावजीच्या हातून खलिता घेत किल्लेदाराने विचारले.
“व्हय जी…”
किल्लेदाराने खलिता वाचायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली काळजी प्रत्येक जण वाचू शकत होता.
रामशेज किल्ला हा तसा जिंकायला अगदी सोपा वाटणारा. कुठल्याही दऱ्या किंवा सुळके आजूबाजूला नाहीत. फक्त एकच डोंगर. ज्यावर हा किल्ला बांधला गेला. त्याच्या चहुबाजूने पूर्ण पठार. वेढा द्यायचा म्हटला तर ५००० सैन्य देखील पुरेसे पडू शकेल असा किल्ला. सह्याद्रीच्या इतर किल्ल्यांप्रमाणे याला ना भव्यता, ना सौंदर्य. ना नैसर्गिक सुरक्षितता. काहीसा एकाकी. आणि अशा या एकाकी किल्ल्याकडे बादशहाची वाकडी नजर वळली होती. किल्ला लहान असल्याने त्यावर पुरेसा दारुगोळाही नव्हता. फौजफाटा आणि हत्यारे देखील अगदीच जेमतेम. आणि हेच मुख्य कारण होते किल्लेदाराच्या काळजीचे. संभाजी राजांनी जितके शक्य होईल तितकी कुमक पाठवली होती पण तरीही ती साठवायला जागाही पाहिजे ना? गडावर इनमिन ६०० लढवैये. काही स्त्रिया, वृद्ध आणि मुले.
“कोन रे तिकडे?” किल्लेदाराने आवाज दिला आणि एक शिपाई आत आला.
“याच्या राहन्याची, शिदोरीची यवस्था करा…” किल्लेदाराने हुकुम सोडला आणि रावजी मुजरा करून माघारी वळला.
किल्लेदाराने राजांचा निरोप सगळ्यांना सांगितला आणि यावर काय उपाय करावा याचे खलबत सुरु झाले.
औरंगजेब बादशहाचा दरबार खच्चून भरला होता. प्रत्येकजण आपापल्या हुद्द्याप्रमाणे बसलेला होता. तेवढ्यात द्वारपालाने हाळी दिली. बादशहाचे दरबारात आगमन झाले. आज बादशहा काहीसा खुशीत दिसत होता. तसेही आजकाल बादशहा नेहमीच खुश दिसत होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा सगळ्यात मोठा शत्रू शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्ता त्याला समजली होती. ज्याच्यापुढे आपल्या मोठमोठ्या फौजा हतबल ठरल्या होत्या. ज्याने आपल्या प्रत्येक दक्षिण मोहिमेत अडसर निर्माण केला तो दख्खन का चुहा आपोआप मार्गातून बाजूला झाला होता. आणि म्हणूनच ‘आल्लातालाची आपल्यावर मेहेर झाली आहे’ असेच तो समजत होता. बादशहा गादीवर जाऊन बसला. त्याच्या पाठोपाठ त्याचे सगळे मानकरी, सरदार देखील आपापल्या जागी स्थानापन्न झाले आणि दरबाराच्या कामकाजाला सुरुवात झाली.
“शहाबुद्दीन खान…!” बादशाहने आपला मोर्चा शहाबुद्दीन खानाकडे वळवला.
“जी जहांपना…!” काहीसे उठत मान खाली घालून खानाने बादशहाला कुर्निसात केला.
“हमारा सबसे बडा दुश्मन कौन था?” आपली दाढी एका हाताने कुरवाळत बादशाहने प्रश्न केला.
“वो.., दख्खन का चुहा जहांपना…!” खाली मानेनेच खानाने उत्तर दिले. खानाचे उत्तर ऐकताच बादशहाच्या चेहऱ्यावर कुटील स्मित आले.
“अब तो वो नही है ना?” बादशहाचा पुढचा प्रश्न.
“नही जहांपना…!” खान फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता. दरबारात पूर्ण शांतता होती. प्रत्येक जण बादशहा काय म्हणतोय हे कान देऊन ऐकत होता.
“तो फिर दख्खनके किले अभी हमारी सल्तनतमे क्यो नही है?” एकाएकी बादशहाचा आवाज चढला.
“हुकुम किजीये जहांपना. कुछ ही दिनोमे सारे किले अपनी सल्तनतमे शामिल होंगे.” खानाने आपली नजर वर उचलत आणि एक हात आपल्या तलवारीच्या मुठीवर ठेवत उत्तर दिले.
“ठीक है… जितनी भी फौज चाहो, तुम्हे मिल जायेगी..” बादशहा खुश झाला.
“गुस्ताखी माफ जहांपना…!” एक सरदार उठून कुर्निसात करत म्हणाला.
“बोलो… क्या बात है?” बादशहा काहीसा चिडला.
“जहांपना.. सिवा का बेटा संभा अपने बापसे दस कदम आगे है… आजतक हमारी फौजे उसको एक बार भी शिकस्त देनेमे कामयाब नही हुई है…” त्या सरदाराने खाली मानेनेच मनातील विचार बोलून दाखवला. मराठ्यांच्या छापेमारीने आणि पराक्रमाने हैरान झालेला बादशहा अजूनच भडकला. एक तुच्छ सरदार आपल्यापुढे आपलेच अपयश दाखवतोय हेच त्याला सहन होण्यासारखे नव्हते. पण राज्य टिकवायचे तर प्रत्येक गोष्टींचा विचार करणे हेही तितकेच महत्वाचे होते. त्यामुळे त्याने आलेल्या रागावर काहीसे नियंत्रण मिळवले पण चेहऱ्यावर आलेला संताप कुणापासूनही लपू शकला नाही.
“तो?” बादशहा काहीसा ओरडलाच.
“माफी जहांपना… पर संबाको शिकस्त देनी है तो पेहेले उसके मुलुखपर कब्जा करना पडेगा. अभी संबा रायगडपे है, हम गुलशनाबाद लेते है तो संबा अपने बीलसे निकलेगा, और हम आसानीसे उसे खात्म कर सकते है…!” सरदाराने आपला कुटील विचार बोलून दाखवला. हे ऐकून मात्र बादशहाचा संताप बराच कमी झाला. सरदाराने जे काही बोलला त्यात काहीच गैर नव्हते. जोपर्यंत संभाजी सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे तोपर्यंत त्याला शिकस्त देणे आपल्याला शक्य नाही हे बादशाह पक्के जाणून होता.
“ठीक है…!” बादशहा म्हणाला आणि सरदार खाली बसला. खान मात्र अजूनही उभाच होता. बादशहाने पुन्हा आपला मोर्चा खानाकडे वळवला.
“शहाबुद्दीनखान… तुम १० हजार की फौज लेकर गुलशनाबाद जावो. सबसे पहले वहां का सबसे छोटा किला रामसेज कब्जेमे लो. फिर त्र्यंबक, अहिवंत, मार्कंडा और साल्हेरपे आपना चांदसितारा लेहेरावो… अगर जरुरत पडे तो धोडपसे अलीवर्दीखान तुम्हे सहायता देगा.” बादशहाने हुकुम दिला.
“जी जहांपना…”
“रामसेज याद है ना? पेहेले भी तुमने कोशिश की थी, और खाली हाथ आए थे..!” बादशाहने खानाला मुद्दाम आठवण करून दिली. कारण जितका खान संतापेल तितका अधिक आक्रमक होऊन किल्ला लवकरात लवकर घेईल हेच बादशहा मानत होता.
“जी जहांपना..! पर तब बात अलग थी. अब बात अलग है. किलेपर कोई भी सरदार नही है. कोई नया किलेदार तैनात है. बहुत छोटासा किला होने के कारन वहां लोग भी ज्यादा नही है. और जो है उसमेभी बहोतसे बुढे और बच्चे है…!” संपूर्ण दरबारात बादशहाने आपल्याला खिजवले हे खानाला पसंत पडले नाही. त्याचा चेहराच ते सांगून जात होता.
“तो? कितने दिन चाहिये?” आपली मात्रा बरोबर लागू पडली हे पाहून खुश होत बादशहाने विचारले.
“सिर्फ एक दिन जहांपना… सिर्फ एकही दिनमे उसपर अपना चांदसितारा फडकेगा..!” खान आढ्यतेने म्हणाला आणि बादशहा खुश झाला.
“ठीक है, कलही १० हजार की फौज लेकर तुम निकलो.” बादशहाने हुकुम दिला आणि खान खाली बसला.
रायगडावर संभाजी राजे आपल्या मंत्रिमंडळाबरोबर मोहिमेची तयारी करत होते. तेवढ्यात एक दूत गुप्तहेराने पाठवलेला निरोप घेवून आला. बादशहाच्या दरबारात घडलेल्या सगळ्या घटना त्याने राजांच्या कानावर घातल्या. एकीकडे मुघल फौजांची एक तुकडी सह्याद्रीच्या खोऱ्यात धुमाकूळ घालत होती. त्यांचा बिमोड करण्यासाठी राजांना रायगड सोडता येणार नव्हता. बातमी तर खूपच गंभीर होती. नाशिक हातून जाणे म्हणजे स्वराज्याचे सगळ्यात मोठे नुकसान होणार होते. शेवटी सगळ्यांची चर्चा केल्यानंतर राजांनी रामशेजच्या किल्लादारासाठी एक खलिता पाठवला. त्यात जितका होईल तितका प्रतिकार करावा पण वेळप्रसंगी योग्य तो निर्णय स्वतःच घ्यावा असा निरोप पाठविण्यात आला.
हाच खलिता रावजी घेऊन आला होता.
क्रमशः झुंज भाग १ –
मिलिंद जोशी, नाशिक