झुंज भाग १० –
आज खान काहीसा शांत होता. खरे तर त्यांचे शांत राहणे ही नव्या वादळाची चाहूल होती. एकीकडे त्याचे शामियान्यात फेऱ्या घालणे चालू होते तर दुसरीकडे त्याचा दाढी कुरवाळण्याचा चाळाही चालूच होता. त्याला इथे येऊन देखील बरेच दिवस झाले होते. या काळात त्यानेही अनेकदा गडावर चढाई करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेस त्याला माघारच घ्यावी लागली. हा गड ताब्यात घेणे त्याला आधी जितके सोपे वाटले होते तितकेच ते किती अवघड आहे हेही त्याला मनोमन पटले. पण हार मानणे हे त्याच्या स्वभावात नव्हते. जी नामुष्की शहाबुद्दीन खानावर आली ती आपल्यावर येऊ नये हेच त्याला वाटत होते. तसे झाले तर त्याने मारलेल्या मोठमोठ्या बढाया चारचौघांत उघड्या पडणार होत्या. त्यातून बादशहाची मर्जी खफा होणार हे वेगळेच. विचार करता करता त्याला एक कल्पना सुचली आणि त्याच्या चेहऱ्यावर उत्साह दिसू लागला. त्याने त्या आवेशातच आवाज दिला.
“कौन है बाहर…”
“जी हुजूर…” लवून कुर्निसात करत एक पहारेकरी आत आला.
“जाव… सैय्यदशा को बुलाके लाव…” त्याने फर्मान सोडले.
“जी हुजूर…” म्हणत पहारेकरी आला तसा बाहेर पडला. काही वेळातच सैय्यदशा त्याच्या समोर हजर होता.
“सैय्यदशा… कल जैसे ही सुरज ढलने लगे… तुम छोटी तोपोसे किलेपर आगेसे हमला करोगे…” त्याने सैय्यदशाला हुकुम सोडला.
“गुस्ताखी माफ हुजूर… पर… छोटी तोपे?” सैय्यदशा गोंधळला.
“हां… छोटी तोपे…”
“हुजूर… बडी तोपोके गोले भी कभी कभी किलेतक जाते नही, फिर छोटी तोपे?” त्याने अडखळत विचारले.
“वो इसलिये के हमे हमला आगेसे नही, पिछेसे करना है…” गालातल्या गालात हसत खान म्हणाला आणि सैय्यदशाच्या डोक्यात प्रकाश पडला.
संध्याकाळ झाली तसा खानाचा तोफखाना सक्रीय झाला. तोफा धडधडू लागल्या. तोफांचे गोळे किल्ल्याच्या दिशेने पडू लागले. पण एकही गोळा किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचत नव्हता. किल्ल्यावरील सर्वजण मुगल सैन्याचा हा उद्योग पहात होते. किल्लेदार स्वतः तटावर उभा राहून मुगल सैन्यावर नजर ठेऊन होता. बराच वेळ झाला पण या एका गोष्टीशिवाय इतर कोणतीही हालचाल दिसत नव्हती. हळूहळू अंधार वाढत होता. अमावस्या असल्याने आकाशात आज चंद्रही नव्हता. सगळीकडे मिट्ट काळोख. उजेड फक्त खानाच्या छावणीत आणि तोफ डागल्यावर जो धमाका होत होता त्याचाच. आता मात्र किल्लेदाराच्या मनात संशय उत्पन्न झाला. आज अचानक मुगल सैन्याला काय झाले असावे? लहान तोफांचा गोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत नाही हे माहिती असूनही चढाईसाठी लहान तोफांचा वापर? यात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने धावत जाऊन आपला घोडा गाठला. इतरांना मात्र किल्लेदाराच्या मनात काय चालू आहे हेच समजेना. एका उडीतच त्याने घोड्यावर मांड ठोकली. घोड्याने जणू आपल्या धन्याचे मन वाचले होते. काडीचाही विलंब न करता त्याने रपेट चालू केली. काही क्षणातच तो किल्ल्याच्या मागील तटबंदीवर पोहोचला.
अंधार वाढला तसा सैय्यदशाने जवळपास तीनशे शिपाई गोळा केले. प्रत्येक जण हा अगदी तयार गडी. एकाच वेळेस चार जणही अंगावर घेऊ शकेल असा. सैय्यदशाने सगळ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आणि त्यांची पावले गडाच्या मागील दिशेस वळली. रात्री एरवी मशाली किंवा टेंभे हाती घेवून निघणारे सर्वजण आज चक्क अंधारात डोळेफोड करत निघाले होते. सैय्यदशा या सगळ्यांचे नेतृत्व करत होता. मुगल सैन्याच्या या तुकडीने गड चढायला सुरुवात केली. प्रत्येकाचे पाऊल अंधारात देखील अगदी सावधगिरीने पडत होते. कुणाच्याही तोंडून साधा चकार शब्दही ऐकू येत नव्हता. काही ठिकाणी काही जण ठेचकाळत होते पण तरीही त्यांच्या तोंडून अवाक्षरही बाहेर पडत नव्हते. सैय्यदशाचा तसा हुकूमच होता. तसे अर्धा डोंगर पार करणे त्यांच्यासाठी काही विशेष नव्हते. खरा धोका होता तो त्यानंतर. कारण आतापर्यंत गडावरील लोकांनी जो पर्यंत अर्धा डोंगर चढून होत नाही तो पर्यंत कोणताही प्रतिहल्ला केला नव्हता. एकतर नाशिकची थंडी. त्यातून रात्रीच्या वेळेस वाहणारे गार वारे आणि तशातच मुगल सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता गड ताब्यात घ्यायचाच या ध्येयाने झपाटले होते. यातील कित्येक जणांच्या मनात प्रत्येक वेळेस माघार घ्यावी लागल्याच्या अपमानाची सलही होतीच. कधी नव्हे तो त्यांनी पूर्ण डोंगरमाथा सर केला होता. तोही रात्रीच्या अंधारात. गडावरून मात्र कोणतीही हालचाल दिसत नव्हती. सगळीकडे निरव शांतता पसरली होती. आवाज फक्त रातकिड्यांचा.
किल्लेदार जसा गडाच्या मागील बाजूस आला तेव्हा त्याला तेथील सर्वच जण अगदी सावध असलेले दिसले.
“काय रे… काई हालचाल दिसून ऱ्हायली का?” त्याने आल्या आल्या प्रश्न केला.
“व्हय जी, आता तुमाकडं निगालो व्हतो…” कुनीतरी दबा धरून येऊ ऱ्हायले.
“अस्सं? यीवू द्या… त्यांना बी पानी पाजू आपन…” किल्लेदाराच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.
मुगल तुकडी पूर्णपणे गडाच्या बुरूजाजवळ जमा झाल्याची खात्री करून सैय्यदशाने तटबंदीवर दोर टाकण्याचे फर्मान सोडले. अर्थात दिलेला हुकुम अगदी हळू आवाजात होता. अंगावर दोराचे गुंढाळे घेतलेले १०/१२ जण पुढे आले. त्यांनी दोराला गाठ बांधायला सुरुवात केली. अगदी थोड्याच वेळात हे काम पूर्ण झाल्यावर दोराच्या एका टोकाला लोखंडी कड्या बांधण्यात आल्या आणि दोर तटबंदीवर फेकले गेले. त्यानंतर त्याला हिसका देऊन ते व्यवस्थित खाचेत आडकले आहेत याची खात्री करून, एकेकाने दोराच्या साह्याने बुरुजाच्या बाजूने तटबंदी चढायला सुरुवात केली.
किल्लेदारासह तेथील पहारेकरी दबा धरून बसलेलेच होते. तसे मशालींचा मिणमिणता उजेड त्यांना तटबंदीच्या आतल्या बाजूला काय हालचाल चालू आहे हे दिसण्यासाठी पुरेसा होता. मुगल सैन्याने फेकलेल्या दोरावर पडत असलेला ताण त्यांना स्पष्ट दिसू लागला. याचाच अर्थ दोरावरून गनिमांनी चढायला सुरुवात केली होती. अगदी हळूच त्यांनी आपल्या तलवारी म्यानातून बाहेर काढल्या. मशालीच्या मंद प्रकाशात त्या तलवारी अगदीच तळपत होत्या. अगदी दबक्या आवाजात एकेक जण दोराजवळ भिंतीच्या आडोशाने उभे राहिले. प्रत्येक जण आता पूर्णतः सज्ज झाला होता. अगदी काही क्षणच गेले असतील आणि प्रत्येक दोर लावलेल्या ठिकाणी मुगल सैनिकांची डोकी दिसू लागली. ते सर्वजण गडावरील परिस्थितीचा अंदाज घेत होते तेवढ्यात मराठयांच्या सगळ्या तलवारी हवेत फिरल्या. तोंडातून कोणताही आवाज न करता एकेक शीर धडावेगळे झाले. इतके होते न होते तोच काही जण कुऱ्हाडी घेऊन पुढे झाले. एकेका वारात एकेक दोर तुटला आणि त्याला लटकलेले मुगल सैनिक खाली उभ्या असलेल्या सैनिकांच्या अंगावर कोसळले.
“या अल्ला… काफिर आया… भागो…” असा एकच गलका पिकला. पण कुणालाही जिवंत जाऊ देण्याच्या मनस्थितीत किल्लेदार नव्हता. त्याचा आवाज आसमंतात फिरला…
“गड्यांनो… येकबी गनीम जित्ता जाऊ द्यायाचा नाई… टाका धोंडे समद्यांवर…” किल्लेदाराचा हुकुम होण्याचा अवकाश आणि वरून मोठमोठे दगड खाली उभ्या असलेल्या सैन्यावर पडू लागले. एकच ओरडा चालू झाला. वरून हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंबूराजे अशा असंख्य घोषणांनी आसमान दणाणले. मुगल सैन्याने पळून जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण रात्रीच्या अंधारात त्यांना ते शक्य झाले नाही. कित्येक जण फक्त तोल गेल्यामुळे दरीत कोसळले. कित्येकांनी स्वतःला वाचविण्यासाठी आपल्या समोर असलेल्या आपल्याच शिपायास धक्का देऊन दरीत पाडले. मराठ्यांच्या या हल्ल्यात स्वतः सैय्यदशा देखील स्वतःचे प्राण वाचवू शकला नाही. आलेली पूर्ण तीनशे जणांची तुकडी अगदी थोडक्या अवधीत स्वतःचे प्राण गमावून बसली. काही वेळ खालून काही आवाज येत नाही हे पाहून किल्लेदाराने दगडांचा मारा बंद करण्यास सांगितले आणि परत एकदा गडावर जयघोष चालू झाला.
गडावरून येणारे आवाज कुणाचे आहेत हे तोफखान्याच्या आवाजात फतेहखानाला नीटसे समजले नाहीत. तो मात्र सैय्यदशाने गड काबीज केलाच असणार अशाच भ्रमात राहिला. पण बराच वेळ होऊनही जेव्हा गडावरून खुणेची मशाल दिसली नाही तेंव्हा मात्र त्यांने दोन तीन शिपायांना सैय्यदशाच्या तुकडीची हाकहवाल घेण्यासाठी पाठवले. शिपाई जेव्हा तिथे पोहोचले तेंव्हा पूर्वेकडे तांबडे फुटू लागले होते. हळूहळू दिवसाचा प्रकाश वाढत गेला आणि त्यांना त्यांच्याच माणसाची प्रेते दिसू लागली. बरेच जण फक्त अंगावरील पोशाखावरून हे मुगल सैनिक आहेत हे समजत होते. जवळपास ८/१० धडांवर शिरेच नव्हती. ती दूर कुठेतरी जाऊन पडली होती. स्वतः सैय्यदशाचे शिरही गायब होते. त्याच्या पोशाखावरून त्याची ओळख पटली. आपण मराठ्यांच्या नजरेस पडलो तर आपल्याला देखील परत जाणे शक्य होणार नाही हा विचार करून तिघेही मुगल सैनिक आल्या पावली परत फिरले. गडावरून किल्लेदारासह त्याचे शिपाई त्या तिघांवर लक्ष ठेवून होते. किल्लेदाराचा हुकुम झाला असता तर तेही परत गेले नसते पण किल्लेदाराने मुद्दाम त्यांना जिवंत सोडले होते. जेणेकरून ही गोष्ट मुगलसैन्यात पसरली जाईल आणि मुगल सैन्याचे धैर्य आणखीन खचेल.
—————————————-
आपला सर्वात खास पराक्रमी योद्धा, सैय्यदशाला आलेला असा मृत्यू फतेहखानाच्या जिव्हारी लागला. खरे तर सैय्यदशाला मरण्याआधी तलवार काढण्याचीही संधी मिळाली नाही हेच मुळी त्याच्या पचनी पडत नव्हते. मुगल तुकडीच्या मागावर गेलेले तीनही शिपाई त्याच्या समोर मान खाली घालून उभे होते. त्याने परत त्यांना विचारले.
“क्या सब मारे गये?”
“जी हुजूर…” खाली मानेनेच तिघांमधील एक जण म्हणाला.
“सैय्यदशा के बारे में बताव…”
“हुजूर… जब हम वहां पहुचे, तो सैय्यदशा का जिसम पडा हुवा था. उनकी समशेर भी मियानमे ही थी. पर उनके जिसमपर सिर नही था…” काहीसे बिचकत त्याने सांगितले.
“अगर सिर नही था तो वो सैय्यदशा था या कोई और ये तुमको कैसे मालूम?” काहीसे संतापाने खानाने विचारले.
“हुजूर… उनके कपडोंसे…” त्याने उत्तर दिले आणि खान विचारमग्न झाला. सैय्यदशाने बरोबर घेतलेला प्रत्येक जण कसलेला योद्धा होता आणि युद्ध न करताच त्यांच्यावर ही वेळ आली होती.
मुगल सैन्यात जेव्हा ही बातमी समजली तेंव्हा त्यांच्यात हळूहळू कुजबुज सुरु झाली. प्रत्येक जण या घटनेला वेगवेगळे रंग देऊ लागला. त्यातच अनेक अफवाही निमार्ण झाल्या. कुणी म्हणत की गडावरील किल्लेदार जादुगार आहे. कुणी म्हणे त्याने भूत प्रसन्न करून घेतले आहे. मुगल सैन्यातील जे लोकं हिंदू होते त्यांनी याचा संबंध एकदम रामाशी जोडला होता. त्यांच्या मते स्वतः रामराया गडाचे राखण करतो आहे. याचा परिणाम असा झाला की मुगल सैन्यातील अनेक अधिकारी मोहिमेवर जाण्यास टाळाटाळ करू लागले. अनेक जण हे आपण माणसाशी लढू शकतो, भूतांशी नाही हे खाजगीत बोलू लागले.
रोज कोणती ना कोणती नवीन वावडी खानाच्या कानावर येऊ लागली. हे सगळे थांबवणे खूप गरजेचे झाले. एकदा का सैन्याने माघार घेतली तर एकटा खान काहीही करू शकणार नव्हता. शेवटी याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावायचे खानाने ठरवले.
परत एकदा सभा भरली. यावेळेस खानाने फक्त सगळ्यांचे ऐकून घ्यायचे ठरवले.
“हुजूर… गुस्ताखी माफ…” एका अधिकाऱ्याने काहीसे बिचकत सुरुवात केली.
“हां… बोलो… क्या बोलना है…”
“हुजूर… सब केहेते है…” इतके बोलून तो थांबला…
“हां… बोलो…”
“हुजूर… वो किलेदार है ना, उसने भूत को प्रसन्न किया है…” एका दमात त्याने वाक्य बोलून टाकले.
“क्या बकते हो?” खान संतापला.
“हुजूर… मै नही, बाकी सब बोलते है…” अधिकारी पुरता गडबडला.
“गधे है सब… भूत, जिन्न ऐसा कुछ नही होता… सब वहम है… इतना भी तुम्हे पता नही?” खान भडकला.
“गुस्ताखी माफ हुजूर… पर…” अधिकारी बोलायचे थांबला.
“पर क्या?”
“हुजूर… आप ही सोचो… हमने क्या क्या नही किया… पर हर बार हमारा ही नुकसान हुवा… सरदार शहाबुद्दीनखान ने इतना बडा दमदमा बनाया था… दोन दिन मे खाक हो गया… हम शामतक किलेकी दिवार तोडते है, सुबह वो वैसी की वैसी दिखाई देती है. हमारे तीनसौ लोग रात के अंधेरेमे वहां गये और उनको लडना भी नसीब नही हुवा. वो किलेदार तो रात के अंधेरेमे भी साफ साफ देखता है और हमपे हमला भी करता है. हमारे सात हजार सिपाही मरते है और उनका एक भी आदमी नही मरता… सबको पता है किलेपर एक भी तोप नही है पर तोप के गोले हमपर गिरते है. और उसकी आवाज भी नही आती. क्या ये कोई आम आदमी कर सकता है?”
अधिकाऱ्याचे बोल ऐकून खानही विचारात पडला. आतापर्यंतच्या सगळ्या घटना पाहिल्या तर त्या अविश्वसनीयच होत्या. कडव्या राजपुतांचे बंड मोडून काढणारा शहाबुद्दीन खान दोन वर्ष प्रयत्न करूनही यशस्वी झाला नव्हता. स्वतः फतेहखान देखील काही महिन्यांपासून किल्ला मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण परिणाम शून्यच.
“ठीक है… अब?” खानाचा स्वर मवाळ बनला.
“हुजूर… नासिकमे ऐसे बहोत मांत्रिक है… अगर उनकी मदत ली तो?” अधिकाऱ्याचा स्वर बदलला.
“लेकीन मुझे अबभी लगता है… भूत या जिन्न नही होते…” यावेळेस बोललेले खानाचे वाक्य अगदीच गुळमुळीत होते.
“हुजूर… इतना किया है तो ये भी करके देखते है…” दुसरा अधिकारी काहीसा शूर बनला.
“ये भी ठीक है… बुलाव फिर…” खानाने परवानगी दिली आणि सभा संपली.
दोन दिवस खान आणि तोफखाना दोन्ही शांतच होते. नेहमीप्रमाणे त्याचा शामियान्यात फेऱ्या घालण्याचा उद्योग चालू होता आणि तेवढ्यात हुजऱ्या आत आला. खानाला लवून कुर्निसात करत त्याने सैन्य अधिकारी भेटायला आल्याची वर्दी दिली.
“अंदर भेजो…” हुजऱ्याकडे लक्षही न देता खानाने हुकुम सोडला. काही वेळातच जवळपास तीन सैन्य अधिकारी आणि एक मांत्रिक खानापुढे हजर होते.
खानाने मांत्रिकाकडे निरखून पाहिले. काळी कफनी, गळ्यात कवड्यांच्या आणि पोवळ्यांच्या माळा, कपाळी काळे गंध आणि हातात मोरपिसांचा झाडू घेतलेला मांत्रिक उभा होता. मध्येच त्याचे डोळे फिरवणे, तोंडाने समजणार नाही असे काहीतरी बडबडणे आणि मधूनच हातवारे करणे चालू होते. त्याचा तो अवतार पाहूनच खानाचा पारा चढला. असे लोकं फक्त पैसे उकळतात इतकेच त्याला माहित होते. पण त्याने महत्प्रयासाने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले. ही गोष्ट त्याला स्वतःला जरी पटणारी नव्हती तरीही मुगल सैन्याच्या भीतीवर काही प्रमाणात मलमपट्टी ठरणार होती. आणि तोच विचार करून त्याने मांत्रिकाला बोलावले होते.
क्रमशः- झुंज भाग १०.
मिलिंद जोशी, नाशिक…