महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,35,489

झुंज भाग २०

By Discover Maharashtra Views: 4079 4 Min Read

झुंज भाग २० –

(झुंज – कथा रामशेजची)

संभाजी महाराज आपल्या तंबूत पुढच्या मोहिमेबद्दल विचार करत होते आणि तेवढ्यात हुजऱ्या आत आला. त्याने छत्रपतींना लवून मुजरा केला.

“महाराज… जासूद आलाय…” त्याने सांगितले.

“आत पाठव त्याला…” छत्रपतींनी हुकुम सोडला. जासुदाने आत येताच महाराजांना मुजरा केला.

“काय खबर?”

“महाराज… आपल्याच मानसांनं घात केला. सरदार नागोजी मानेनं फितुरी केली. त्यांच्या संग आजूक काई मराठे सरदारबी बादशाला फितूर झाले…” त्याने एका दमात खबर सांगितली.

“काय? स्वराज्याशी फितुरी? स्वधर्माशी बेईमानी? शिवशंभू…” छत्रपतींच्या चेहऱ्यावर क्रोध दिसू लागला.

“जी म्हाराज…” जासुदानं खाली मानेनेच होकार दिला.

“अजून काय खबर?” स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवत छत्रपतींनी विचारले.

“सरनौबत हंबीरराव आन सरदार संतांजी विजापूरकडं रवाना झाले. पन मिरज आन बेळगाववर मुगलांचा चांदसितारा फडकला.” त्यांने सांगितले आणि महाराज काहीसे विचारात पडले.

“ठीक आहे…” छत्रपतींनी जासूदाला निरोप दिला. सध्या त्यांना मिळणाऱ्या बातम्या बऱ्याचशा अशाच पद्धतीच्या होत्या. एक चांगली बातमी मिळाली की त्याबरोबर दोन वाईट बातम्या त्यांच्या कानावर पडत होत्या. एक तर त्यांना एक दिवसही व्यवस्थित आराम मिळत नव्हता. आणि त्यात या गोष्टींची भर. त्यांचे विचारचक्र जोराने फिरत होते आणि तेवढ्यात पुन्हा हुजऱ्या आत आला.

“रामशेजवरनं जासूद आलाय…” त्याने वर्दी दिली. रामशेजचं नांव ऐकलं आणि छत्रपतींचे मन काहीसे बेचैन झाले. गेल्या साडेतीन वर्षांपासून तेथला किल्लेदार अगदी तुटपुंज्या साधनानीशी बादशहाच्या हजारोंच्या मुगल सैन्याशी झुंजत होता. इतर कुणी किल्लेदार असता तर आतापर्यंत किल्ला मुगलांच्या ताब्यात गेला असता पण या पठ्ठ्याने अजूनही हिंमत सोडलेली नव्हती. आता मिळणारी बातमी चांगली की वाईट याचा मात्र त्यांना अंदाज लागेना.

“आत पाठव…” त्यांनी आपले मन काहीसे कठोर करून हुकुम केला.

“म्हाराजांचा विजय असो…” आलेल्या जासुदाने महाराजांना लवून मुजरा केला.

“काय खबर?”

“आनंदाची खबर हाये म्हाराज… मुगल सैन्याचा रामशेजचा येढा उठला…” त्याने अगदी आनंदाने सांगितले…

“आई भवानीमातेची कृपा…” म्हणत छत्रपतींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला.

“किल्लेदाराला आम्ही बोलावल्याचे सांगा…” असे म्हणत त्यांनी जासूदाला निरोप दिला.

जवळपास ५ दिवसांनी रामशेजचा किल्लेदार संभाजी महाराजांच्या छावणीत आला.

“या किल्लेदार… तुम्ही पराक्रमाची शर्थ केलीत… आम्ही खुश आहोत. आई भवानीचा आशीर्वाद आणि मोठ्या महाराजांचा मान तुम्ही राखलात. तुमची जितकी तारीफ करावी तितकी कमीच आहे…” छत्रपतींनी किल्लेदाराच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली.

“म्या भरून पावलो… आमच्यासाठी राजं देवाचा अवतार… त्योच आमच्यासाठी देव. आज देवाचा आशीर्वाद मिळाला आम्हास्नी… पन या समद्यात गडावरील हरेक मानसानं शिकस्त क्येली…” किल्लेदार म्हणाला आणि महाराजांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तसेही हल्ली असे आनंदाचे क्षण त्यांच्यासाठी दुर्मिळच झाले होते. काही दिवसांपूर्वीच काही महत्वाचे सरदार मुगलांना स्वतःच्या स्वार्थापायी मिळत असताना असे काही किल्लेदार मात्र स्वराज्याशी इमान राखून होते हीच गोष्ट राजांसाठी खूप अभिमानाची होती.

“किल्लेदार… तुमच्या या पराक्रमावर आम्ही बेहद खुश आहोत… आमच्याकडून तुम्हाला नजराणा तर मिळेलच पण तुमच्यावर आनखी मोठी जबाबदारी टाकण्याचा आमचा मानस आहे…” छत्रपतींनी सांगितले.

“आज्ञा म्हाराज… माज्यासाठी ह्योच मोठा नजराना हाये… हुकुम करा… मोहिमेवर रुजू होन्यास येका क्षनाचीबी देरी व्हायची नाई…” तलवारीच्या मुठीवर आपला हात ठेवत किल्लेदार उत्तरला.

“आम्हाला हीच अपेक्षा होती… १० दिवसांनी विजापूरकडे जायचे आहे… नागोजी माने फितूर झाले. आता तुम्हाला सरनौबत हंबीररावांना मदत करायची आहे…” छत्रपतींनी सांगितले आणि किल्लेदाराचा चेहरा उजळला. सरनौबत हंबीररांव मोहिते हे साक्षात राजाराम महाराजांचे सासरे. पराक्रमाच्या बाबतीत ते कितीतरी वरच्या बाजूला. त्यांच्या बरोबर असलेले सरदार देखील त्यांच्या तोडीचे. आणि त्यांच्या बरोबर आपल्याला युद्धावर जाता येणार यातच किल्लेदाराला स्वतःचा अभिमान वाटला.

“तुमच्या जागी आता रामशेजवर नवीन किल्लेदाराची आम्ही निवड करत आहोत. त्याच्या ताब्यात गडाच्या किल्ल्या द्या आणि तुम्ही तिकडूनच मोहिमेवर रुजू व्हा…” छत्रपतींनी किल्लेदाराला आज्ञा केली आणि त्यांचा निरोप घेऊन किल्लेदार रामशेजच्या वाटेला लागला.

क्रमशः- झुंज भाग २०.

मिलिंद जोशी, नाशिक…

झुंज भाग १

झुंज भाग 19

झुंज भाग 21

Leave a Comment