महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,711

झुंज भाग ३

By Discover Maharashtra Views: 3998 9 Min Read

झुंज भाग ३ –

(झुंज – कथा रामशेजची)

राजांचा खलिता मिळून जवळपास आठ दिवस झाले होते. शहाबुद्दीन खान येताना शक्य होईल तितकी धार्मिक स्थळे उध्वस्त करत येत होता. त्याबरोबरच गरीब जनतेचे धर्मांतर करण्यास त्याने सुरुवात केली होती. जे लोक आपला धर्म सोडत नव्हते त्यांच्यावर अनन्वित अत्याचार चालू झाले होते. त्याच्या या कामात कित्येक हिंदू सरदारही बादशहाचा रोष आपल्यावर येऊ नये म्हणून त्याला मदत करत होते. या सगळ्याच बातम्या किल्लेदाराकडे रोजच येत होत्या. शहाबुद्दीनखान किती क्रूर आणि उलट्या काळजाचा आहे याची माहिती किल्ल्यावरही येऊन धडकत होती. आपली जर अशी कीर्ती गुलशनाबाद प्रांतात पसरली तर आपल्या भीतीने तेथील किल्लेदार लढाई करण्याच्या फंदात न पडता किल्ले आपल्या स्वाधीन करतील असेच त्याला वाटत होते. आणि ह्याच कारणाने त्याने येताना अशा गोष्टी आरंभल्या होत्या.

किल्ल्यावरील लोकांमध्ये मात्र अशा बातम्या ऐकून भीतीऐवजी त्याच्याबद्दल राग उत्पन्न होत होता. शेवटी तो दिवस उजाडला. खानाचा तळ किल्ल्याच्या पायथ्याशी पडला. किल्ल्यावरून जिकडे नजर जाईल तिकडे हिरवे झेंडे आणि कापडी तंबू दिसू लागले. खानाने आणलेली दहा हजाराची फौज आणि वाटेत त्याला सामील झालेली दोन हजाराची फौज असा बारा हजाराचा फौजफाटा किल्ल्याच्या पायथ्याशी जमा झाला. आल्या आल्या खानाने किल्ल्याला वेढा दिला. त्यामागे उद्देश हाच होता की यामुळे किल्लेदारावर दबाव येईल आणि तो स्वतःहून किल्ला आपल्या सुपूर्द करेल.

किल्ल्याला वेढा देऊन दोन दिवस उलटून गेले पण किल्लेदाराचा कोणताही दूत खानाकडे येण्याचे चिन्ह दिसेना. शेवटी खानानेच आपला एक दूत किल्ल्यावर पाठवायचे ठरवले. त्यासाठी एका मराठी माणसाची नियुक्ती करण्यात आली. मराठी माणसाची नियुक्ती करण्यामागेही खानाचा कुटील हेतू होता. कोणताही मुसलमान अधिकारी पाठवला असता तर त्याच्यावर किल्लेदाराने कितपत विश्वास ठेवला असता हे सांगणे कठीण होते. जर दूत मराठी असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जाईल असेच त्याला वाटत होते. तसेच किल्लेदाराचे मन वळवण्याचा प्रयत्न फसला तरी दूत मराठी असल्याकारणाने त्याला कोणतीही इजा केल्याशिवाय परत पाठवले जाईल हेही खान चांगलेच जाणून होता. दूत जिंवत परत येणार म्हणजे किल्ल्यावर किती फौजफाटा आहे, आपल्याला किती प्रतिकार होऊ शकेल हे सगळेच त्याला समजणार होते.

तिसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस खानाचा दूत किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यासमोर उभा राहिला. शिरस्त्याप्रमाणे पहारेदाराने दरवाज्याच्या झडपेतून त्याला विचारले.

“कोन हाये?”

“म्या सरदारांचा दूत हाये. किल्लेदारास्नी भेटायचंय. खानसायबांनी निरोप धाडलाय किल्लेदारासाठी.” दूताने आपले येण्याचे कारण सांगितले. एकटाच कुणी दूत असेल तर त्याला बेलाशक आत घ्या असा किल्लेदाराने आपल्या पहारेकऱ्यांना आधीच हुकूम सोडला असल्याने महाद्वाराला लागून असलेला एक छोटा दरवाजा उघडला गेला आणि दुताला त्याचा घोडा बाहेरच ठेवून आत घेण्यात आले.

 

दूत जसा छोट्या दारातून आत आला, त्याच्याकडून हत्यारे काढून घेतली गेली. त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. त्याला एका घोड्यावर बसवण्यात आले आणि काही वेळातच त्याला किल्लेदारासमोर उभे करण्यात आले.

“डोळ्याची पट्टी काढा !” किल्लेदाराचा आवाज घुमला आणि दूताच्या डोळ्यावरील पट्टी उतरवली गेली. दूत एका काहीशा मोठ्या खोलीत उभा होता. खोलीच्या खिडक्यांवर पडदे टाकण्यात आले होते. समोरच किल्लेदार एका आसनावर बसला होता. त्याच्यापासून थोड्या दूर अंतरावर एक कारकून हाताची घडी घालून उभा होता. दोघेही दुताकडे रोखून पहात होते. दोघांच्या मनात काय विचार चालू आहे याचा काहीसा अंदाज घेण्याचा दूत प्रयत्न करत होता.

“बोल…! काय संदेश हाये?” किल्लेदाराने काहीसे दरडावून विचारले.

“जी…!” काहीसा भानावर येत दूताने आपल्या कमरेला खोचलेला खलिता किल्लेदारासमोर धरला. किल्लेदाराचा आवाज ऐकूनच त्याच्यापुढे बोलण्याची दूताची हिंमत झाली नाही. किल्लेदार जागेवरून मुळीच हलला नाही. अगदी चपळाईने कारकून पुढे आला. दूताच्या हातातील खलिता आपल्या हातात घेतला आणि तो आदबीने किल्लेदाराच्या सुपूर्द केला.

किल्लेदाराने खलिता हातात घेतला आणि नंतर काहीसा विचार करत परत कारकुनाच्या हाती देत त्यांनी त्यालाच तो वाचण्यास सांगितले. कारकुनाने खलिता मोठ्याने वाचण्यास सुरुवात केली.

————–

किलेदार रामसेज,

बादशहा सलामत, आलमगीर औरंगजेब के हुकुमसे जितने जल्द हो सके, किला सरदार शहाबुद्दीनखान के सुपूर्द करे | किलेपर जितने भी लोग है वो, बादशहा सलामत की रयत होगी | आजसे उनको बादशहा सलामत को लगान देनी होगी | इनमे जितने भी काफर होंगे उनको अलगसे जिझियाकर देना होगा | अगर कोई इसे देनेसे इन्कार करेगा तो उसे बगावत मानी जायेगी और उसका सर कलम किया जायेगा | लेकीन अगर कोई इस्लाम कबूल करता है तो उसे जिझिया देनेकी जरुरत नही है | महान शहनशहा आलमगीर उसको अपनी फौजमे शामिल करेंगे | अगर किलेदार किला देनेसे इन्कार करता है तो किलेपर हमला किया जायेगा | उसे माफी नही मिलेगी | उसका सर कलम करके किलेके दरवाजेपर लटकाया जाएगा | अगर किलेदार राजीख़ुशीसे किला सरदारके सुपूर्द करता है तो उसपर बादशहा सलामत की रहम होगी | उसे अच्छासा इनाम दिया जाएगा |

सरदार शहाबुद्दीन खान |

सिपेसालर शहंशाह आलमगीर औरंगजेब ||

—————–

कारकून जसजसा खलिता वाचत होता, किल्लेदाराचा चेहरा लाल होत होता. दूत मात्र आता मनातून घाबरला होता. खलिता वाचत असताना त्याने मान खाली घातली होती. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट फक्त एकच होती. किल्लेदार त्याच्याच धर्माचा होता. किमान त्याचा विचार करून तरी त्याला कोणतीही इजा झाल्याशिवाय तिथून बाहेर पडण्याची आशा होती. खलिता वाचून पूर्ण झाला आणि दूताने मान वर करून किल्लेदाराकडे पाहिले. किल्लेदाराच्या डोळ्यात अंगार फुलत होते. दुताला खानाने इतके पढवून पाठवले होते पण किल्लेदारापुढे बोलण्याची त्याची हिंमतच झाली नाही.

“ठिक हाये, तुज्या खानाला निरोप सांग. ज्ये काय करायचं असंल त्ये कर, पर ह्यो किल्लेदार जवर जित्ता हाये तवर किल्ल्यावर तुजी सावली सुदिक पडायची नाई. आन ह्ये बी सांग, तुज्या त्या बादशाला वळखत नाई आमी. आमचा राजा येकच हुता. शिवाजी राजा आन आता संबाजी राजा आमचा राजा हाये. जा… ह्योच निरोप दे खानाला.” इतके बोलून किल्लेदार उठून उभा राहिला.

“ए कोन हाय रे, याचे डोळे बांधा आन याला सलामत किल्ल्याच्या भायेर काढा. दगाबाजी करायला आमी काय बादशा नाई.” शेवटचे वाक्य किल्लेदाराने मुद्दामच उद्गारले होते. एकजण धावतपळत आत आला. त्याने दूताचे डोळे बांधले आणि त्याला सुखरूप किल्ल्यातून बाहेर पाठवले.

दूताने आणलेला निरोप ऐकून शहाबुद्दीन खान पुरता चवताळला. त्याने जितकी माहिती मिळवली होती त्यानुसार किल्ल्यावर जास्तीत जास्त ८०० माणसे होती. त्यातही मुलांचा, वृद्धांचा आणि महिलांचा समावेश. म्हणजे लढणारे सैनिक असतील तर ते पाचशेहून अधिक नसणार हाच त्याने मनाशी विचार केला. आणि त्या पाचशे लोकांच्या जीवावर किल्लेदार आपल्याला असा संदेश पाठवतो हेच मुळी त्याच्या डोक्यात शिरत नव्हते. आपल्या माणसांचा विचार न करणारा किल्लेदार नक्कीच वेडा असावा असा त्याचा समज झाला. वेड लागल्याशिवाय का कुणी बारा हजाराच्या फौजेशी फक्त ५०० लोक घेऊन लढाईची गोष्ट करेल? बरे १२ हजार फौजही कुणाची? तर ज्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत वाढवला त्या आलमगीर शहंशहाची. ५०/६० तोफा, मुबलक दारुगोळा आणि कसलेले शिपाई असलेली फौज कुठे आणि ५०० सैनिक कुठे. आणि म्हणुनच दूताने आणलेल्या संदेशावर विश्वास ठेवणे त्याला अवघड जात होते.

आजपर्यंत त्याने बादशहाच्या अनेक मोहिमेत हिरीरीने भाग घेतला होता. कित्तेक मोहिमा त्याने फत्ते केल्या होत्या. कित्येक जण तर त्याच्या क्रौयाच्या कथा ऐकूनच युद्ध न करता शरण आलेले होते. बघता बघता त्याचा चेहरा तापला.

“कौन है बाहर?” त्याने मोठ्याने आवाज दिला आणि एक शिपाई अगदी धावतपळत तंबूत आला.

“जाव जल्दी और मानेको बुलाव..!” त्याने हुकुम सोडला.

काही वेळातच त्याचा हेर त्याच्या पुढ्यात उभा होता.

“कितने लोग बताये तुमने किलेपर?” त्याने दरडावून विचारले. आडदांड शरीराचा संतापलेला खान त्याच्या हेराला मूर्तिमंत यमदूत भासला.

“सब मिलाकर ८०० लोग ही होंगे सरदार…!” हेराने घाबरत उत्तर दिले.

“और बताव…!”

“उनमे बुढे, बच्चे और औरतेभी है, किलेपर एक भी तोप नही है. आमनेसामने की लढाई होती है तो वो आधा दिन भी नही टिक पायेंगे.” हेराने जे आधी सांगितले होते तेच परत सांगितले. हे ऐकताना सरदाराची नजर हेरावर खिळली होती. हेर आपल्याशी खोटे तर बोलत नाहीना याचीच खान खात्री करून घेत होता.

“ठीक है, जाव…! और सिपाई को अंदर भेजो.” म्हणत खानाने त्याला आज्ञा दिली.

क्रमशः- झुंज भाग ३.

मिलिंद जोशी, नाशिक

झुंज भाग १

झुंज भाग २

झुंज भाग ४

Leave a Comment