महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,00,061

झुंज भाग ४

Views: 3977
9 Min Read

झुंज भाग ४ –

(झुंज – कथा रामशेजची)

खानाच्या तंबूत त्याच्या सह एकूण ६ जण मसलत करत होते. किल्लेदाराकडून आलेला निरोप खानाच्या अगदी जिव्हारी लागला होता. युद्ध तर अटळ होते. पण इतक्या दिवसात खानाला मराठ्यांच्या युद्धकलेची चांगलीच ओळख झालेली होती. आणि त्यामुळेच तो प्रत्येक गोष्ट सावधगिरीने करत होता. तसे पाहिले तर एका नजरेत भरणारा किल्ला घ्यायला कितीसा वेळ लागणार? त्यातून त्याच्या आजूबाजूला दऱ्याखोऱ्याही नाहीत. गडावर देखील काहीशे माणसे. शस्त्रसाठाही तिथे कितीसा असणार? आणि तरीही त्याचे मन काहीसे साशंक होते. म्हणूनच त्याने किल्ल्यावर चढाई करण्यापूर्वी आपल्या अधिकाऱ्यांशी मसलत करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक जण आपापले मत मांडत होता पण एकमत होत नव्हते. शेवटी बऱ्याच वेळाने एक हजाराच्या फौजेनिशी हजारीने किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर हल्ला चढवावा. आणि किल्ला ताब्यात घेऊन किल्लेदाराला कैद करून खानापुढे हजर करावे असे ठरले. खानालाही ही योजना पसंत पडली. एकतर त्याने दोन गोष्टी साध्य होणार होत्या. जे नुकसान होणार होते ते युद्धाच्या मानाने खूपच कमी असणार होते. आणि दुसरे म्हणजे ज्या किल्लेदाराने आपला हुकुम मानण्यास नकार दिला, त्याला कैद करून खानाचा अभिमान सुखावणार होता.

सकाळ झाली तसे हजारीने आपले सैन्य गोळा केले. जवळपास अडीचशे घोडेस्वार आणि साडेसातशे पायदळ गडाच्या पायथ्याशी जमा झाले. प्रत्येक जण हा कसलेला योद्धा होता. आजपर्यंतच्या अनेक लढायांमध्ये त्यांनी आपले शौर्य गाजवलेले होते. राजपुतांना पाणी पाजून आलेली सेना या छोट्याशा गडावर चाल करून जाणार होती. समोरासमोर लढाई सुरु झाल्यावर जास्तीत जास्त दोन तीन घटकेतच गड काबीज करून किल्लेदाराला खानापुढे हजर करू अशी शेखी हजारी मिरवत होता. स्वराज्यातील इतर गडांच्या तुलनेत या गडाची चढाई म्हणजे अगदीच किरकोळ म्हणता येण्यासारखी होती. चढणीचा रस्ता जरी लहान होता तरी चढण अगदीच अंगावर येणारी नव्हती.

सगळे सैन्य जमले आहे याची खात्री झाल्याबरोबर हजारीने सुरुवात केली.

“महान शहंशाह आलमगीर के सिपाहियो… आजतक आप जिस जंगमे उतरे हो, सिर्फ फतेह हासील की है, खुद आलमगीर शहंशाह को भी आपपर विश्वास है… और इसी विश्वास को आपको फिरसे साबित करना है… ये किला तो बहुत ही छोटासा है. आपके सामने ये आधे दिन भी टिक नही पायेगा… तो चलो, लेलो उसको अपने कब्जेमे. फेहेरावो उसपर चांदसितारा… काफिर किलेदार को जहन्नूम का रास्ता जो भी दिखायेगा उसे बादशहा खुद इनाम देंगे… अल्ला हु अकबर…” हजारीने केलेल्या वीरश्रीयुक्त भाषणाने प्रत्येक शिपायाच्या अंगावर मुठभर मास चढले. प्रत्येकाचे मन युद्धासाठी तयार झाले. आसमंतात ‘अल्ला हु अकबर’ चा स्वर निनादू लागला. मुघल सेनेच्या तुकडीने गडाच्या दिशेने कूच केले. हजार शिपायांचा तांडा छोट्याश्या किल्ल्याची धूळधाण करण्यासाठी सज्ज झाला होता. ‘अल्लाहु अकबर’च्या घोषणा गगनाला भिडत होत्या.

इकडे किल्ल्यावर मात्र अगदी पूर्ण शांतता पसरली होती. ना कोणता आवाज येत होता ना कोणती हालचाल दिसून येत होती. मुघल सैन्याचा प्रत्येक शिपाई वर पहात गड चढत होता. किल्ल्यावरून काहीच आवाज होत नसल्यामुळे किल्लेदार आणि किल्ल्यावरील सैन्य पुरते घाबरले असून लढाई न करताच किल्ला आपल्या ताब्यात येणार याची जवळपास खात्रीच प्रत्येक सैनिकाला झाली होती. आणि याच आनंदात त्यांचा गड चढण्याचा वेग वाढला. सगळीकडे अल्ला हु अकबरच्या घोषणेबरोबरच धुळीचे लोट आसमंत झाकोळून टाकत होते.

मुघल सैन्याच्या तुकडीने जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त डोंगर चढला आणि एकाएकी ‘हर हर महादेव’ चा जयघोष आसमंतात घुमला. हा जयघोष इतका मोठा होता की एक हजार माणसांच्या अल्ला हु अकबरच्या घोषणा देखील त्यापुढे कमजोर वाटू लागल्या. एकाएकी किल्ल्याच्या तटबंदीवर अनेक लोकं दिसू लागले. किल्लेदार घाबरून किल्ला आपल्या सुपूर्द करेल हा त्यांच्या मनातला विचार क्षणार्धात मावळला. काही वेळ होतो न होतो तोच ढगांचा गडगडाट व्हावा तसा आवाज ऐकू येऊ लागला. सोबत वरून धुळीचे लोळ पायथ्याच्या दिशेने झेपावू लागले. काय होते आहे हे लवकर हजारीच्या लक्षात देखील आले नाही. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेंव्हा वेळ निघून गेली होती. अनेक मोठमोठ्या शिळ्या त्यांच्या रोखाने गडगडत येत होत्या. त्यांचाच गडगडाट आसमंत भेदून राहिला होता. खानाच्या सैन्याला आता माघार घेणेही शक्य नव्हते. पुढे जावे तर वरून दगड धोंड्यांचा पाऊस. मागे फिरावे तर जागेचा आभाव. आणि पहिला धोंडा सर्वात पुढे असलेल्या शिपायांवर आदळला. ५/६ जण तर त्याखालीच चिरडले गेले. त्यांच्या तोंडून आवाजही फुटू शकला नाही. तो धोंडा मात्र त्याच्या मार्गात येणाऱ्या जवळपास पंचवीस तीस सैनिकांना स्वर्गाचा रस्ता दाखवूनच थांबला.

एकामागोमाग एक शिळा वरून खाली झेपावत होत्या. एक धोंडा चुकवावा तर दुसरा धोंडा समोर येत होता. त्याला चुकवावे तर त्याच्या धक्क्याने कोसळणारा सैनिक अंगावर येत होता. खानाच्या सैन्यात आता मात्र हाहाकार माजला. ‘अल्लाहू अकबर’ घोषणेची जागा किंकाळ्यांनी घेतली. जो तो वाट फुटेल तिकडे पळत सुटला. त्यातही कित्येक जण फक्त तोल सावरता आला नाही म्हणूनही आपला जीव गमावून बसले. सैन्याच्या या तुकडीचे नेतृत्व ज्या हजारीकडे होते तो तर कधीचाच आडवा झाला होता. जिकडे पाहावे तिकडे प्रेतांचा खच पडला होता. अगदी काही वेळातच खानाच्या १००० फौजेची पूर्ण वासलात लागली. आसमंत मुघल सैन्याच्या किंकाळ्या आणि गडावरील मराठा सैन्यःच्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या जयकाराने दणाणून गेला.

खानाचे सैन्य मागे फिरले हे जेव्हा किल्लेदाराने पाहिले त्यावेळेस त्याने लगेचच आपल्या लोकांना इशारा केला. त्याबरोबर गडावरून टाकण्यात येणाऱ्या दगडांचा पाऊस देखील पूर्णतः थांबविण्यात आला. गडावर एकच उत्साह संचारला होता.

चढाईवर गेलेल्या सैन्याच्या तुकडी मधील अगदी बोटांवर मोजता येतील इतकेच लोकं सुखरूप परतले. जवळपास साडेतीनशे लोक कायमचे जायबंदी झाले. चारएकशे लोकं प्राणास मुकले तर दोनशे लोकं किरकोळ जखमी होऊन परत फिरले. अडीचशे घोडेस्वारामधील एकही व्यक्ती सुखरूप नव्हता. बरेच जण तर त्यांच्याच घोड्यांच्या पायाखाली तुडवले गेले होते. जवळपास १०० घोडे कायमचे जायबंदी झाले होते. आणि उरलेल्या घोड्यांपैकी कित्येक वाट फुटेल तिकडे पळून गेले होते.

खानासाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. सगळ्यात जास्त संताप त्याला या गोष्टीचा होता की, आपली १००० लोकांची फौज जाऊनही किल्ल्यावरील एकाही माणसाला साधी जखमही करू शकली नव्हती. किल्ल्यावरील लोकांचे मनोधैर्य चौपट वाढले होते, तर खानाच्या फौजेचे मनोधैर्य निम्म्याने कमी झाले होते. त्यातही पोटार्थी सैनिक आणि स्वराज्याच्या ध्येयाने लढणारे सैनिक यात फरक होताच की. शेवटी पूर्ण पंधरा दिवसांचा आराम करून नंतर परत नव्या जोमाने किल्ल्यावर आक्रमण करण्याचे खानाने ठरवले. पण या दिवसात किल्ल्याला दिलेला वेढा मात्र अजूनच सक्त करण्यात आला.

इकडे गडावर मात्र आनंदी वातावरण होते. मुघल फौज कितीही संख्येत आली तरी आपण तिला तोलामोलाची टक्कर देऊ शकतो हे प्रत्येक व्यक्तीच्या मनावर पूर्ण ठसले होते. किल्लेदारही सगळ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत होता. त्याच बरोबर अगदी दिवस रात्र त्याचा किल्ल्यावर वावर होत होता. गेल्या पंधरा दिवसात खानाच्या फौजेने कोणत्याही प्रकारे आक्रमण केलेले नसले तरी त्याचा तळही हलला नव्हता. म्हणजेच आज ना उद्या परत आपल्यावर आक्रमण होणार हे किल्लेदाराला चांगलेच उमजले होते.

खानाच्या तंबूत रोजच खलबते होत होती. आक्रमणाच्या अनेक नवनवीन योजना समोर येत होत्या. पण त्यातील कोणतीच योजना खानाला भरवशाची वाटत नव्हती. आता तो चांगलाच सावध झाला होता. विचार करता करता त्याला एक योजना सुचली. १ हजाराची फौज एकाच बाजूने गेली आणि त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. एकाच वेळी कमी लोकांसह जर किल्ल्याच्या सगळ्याच बाजूने चढाई सुरु केली तर? नुकसानही कमी होईल आणि किल्ला काही वेळातच ताब्यात येईल. त्याचा विचार त्यालाच पसंत पडला. आपण आधीच हा विचार का केला नाही म्हणून तो स्वतःवरच चरफडला.

काही वेळातच फौजेचे मुख्य सेनानायक त्याच्या तंबूत हजर झाले. त्याने आपली योजना सगळ्यांना बोलून दाखवली. परिस्थितीचा विचार करता सगळ्यात योग्य अशीच ती योजना होती. फौज विखुरलेली असल्यामुळे आता वरून गडगडत येणारे दगड चुकवणे त्याच्या सैनिकांना सोपे जाणार होते. नुकसानही अगदीच कमी होणार होते. खान चांगलाच खुश झाला. पाहिजे तितकी सावधगिरी न बाळगल्यामुळे आपली एक हजाराची फौज हकनाक कमी झाली याची त्याच्या मनात असलेली खंत आता कुठल्या कुठे पळाली.

क्रमशः झुंज भाग ४.

मिलिंद जोशी, नाशिक…

झुंज भाग १

झुंज भाग 3

झुंज भाग 5

Leave a Comment